You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोकणातलं हे गिधाड हरियाणात ठरतंय 'विकी डोनर'
- Author, आरती कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोकणातल्या दापोलीजवळचा अंजर्ल्याचा किनारा. किनाऱ्यावरच्या उंचच उंच माडांवर पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची वसाहत होती. या गिधाडांचा विणीचा हंगाम, पक्ष्यांची पिल्लांना खायला घालण्याची लगबग आणि खाणं मिळवण्यासाठी पिल्लांचा कलकलाट यामुळे ही वसाहत सतत गजबजलेली असायची.
गिधाडांच्या या वस्तीत सुमारे 40 घरटी होती. याच वस्तीत उंच घरट्यांमध्ये जन्माला आलेली गिधाडांची दोन पिल्लं. ही पिल्लं साधारण एक-दोन महिन्यांत घरट्यांतून बाहेर पडून जमिनीवर उतरू लागली. आपल्या लांबरुंद पंखांच्या आईबापाकडे बघत हळूहळू उडायलाही शिकली.
इथल्या गिधाडांचं सर्वेक्षण करणारे 'सह्याद्री निसर्ग मित्र'चे भाऊ काटदरे आणि त्यांचे कार्यकर्ते याच क्षणाची वाट पाहत होते. जेव्हा ही दोन पिल्लं जमिनीवर उतरली तेव्हा त्यांच्यावर जाळं टाकून त्यांना पिंजऱ्यात पकडण्यात आलं.
त्यांना बॉक्समध्ये घालून विमानानं हरियाणातल्या पिंजौरला आणण्यात आलं. कशासाठी?
पिंजौरजवळच्या बीर शिकारगाह अभयारण्यात दाट झाडीनं वेढलेल्या वाटेनं गेलं की या जंगलात दडलेलं गिधाडांचं हे नवं घर समोर येतं.
बांबूनं शाकारलेल्या सिमेंट काँक्रीटच्या भिंतींच्या आड इतकी गिधाडं राहत असतील यावर खरंतर विश्वासच बसत नाही. पण तिथल्याच एका मॉनिटर रूममध्ये गेलं की सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रिकरणातली गिधाडांची एक मोठी वसाहतच समोर येते.
या ठिकाणी देशाच्या वेगवेगळ्या भागातून गिधाडांची पिल्लं प्रजननवाढीसाठी आणण्यात आली आहेत.
गिधाड... ! असं नुसतं म्हटलं तरी वखवखलेल्या नजरेनं मांसाचे लचके तोडणारे अक्राळविक्राळ पक्षी आपल्या डोळ्यासमोर येतात. गिधाडांची आपल्या मनातली प्रतिमा एखाद्या खलनायकाचीच आहे.
पण पिंजौरच्या गिधाड संवर्धन केंद्रात आपल्याला भेटतात, ती गिधाडांची वेगवेगळ्या वयाची लोभसवाणी पिल्लं आणि मायेनं त्यांची काळजी घेणारे आईबाप.
'जटायु'ला वाचवण्यासाठी
भारतामध्ये 1980च्या दशकात सुमारे 4 कोटी गिधाडं होती. पण आता मात्र त्यांची संख्या अवघ्या 30 हजारांवर आलीय. म्हणूनच देशभरात गिधाडांना नामशेष होण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून 2004 मध्ये हे केंद्र उभारण्यात आलं. 'जटायु संवर्धन केंद्र' असं नाव त्याला देण्यात आलंय. या नावाची ही पाटी पाहिली की आपल्याला थेट रामायणातले संदर्भ आठवतात.
रावणानं सीतेला पळवून नेलं तेव्हा मोठ्या पंखांच्या जटायूनं तिला रावणाच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न केला. या लढाईत जटायूचे पंख कापले गेले.
पण जेव्हा राम सीतेच्या शोधात निघाले तेव्हा याच जटायूनं त्यांना सीतेच्या अपहरणाची वर्दी दिली, अशी कथा सांगितली जाते. याच जटायूला वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप सध्या सुरू आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि हरियाणा सरकार यांनी एकत्रितरित्या 2004 मध्ये हे केंद्र सुरू केलं. बीएनएचएसचे संशोधक डॉ. विभु प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र उभारलं गेलंय.
हे केंद्र सुरू झालं तेव्हा सुरुवातीच्या काळात इथे फक्त एक गिधाड आणण्यात आलं होतं. पण आता इथे 259 मोठी गिधाडं आणि त्यांची 30 पिल्लं सुखात नांदतायत. आता टप्प्याटप्प्यानं या गिधाडांना जंगलात सोडण्यात येणार आहे.
गिधाडांच्या मृत्यूचं कारण काय?
गिधाडांच्या संवर्धनावर काम करणारे डॉ. विभु प्रकाश सांगतात, "राजस्थानमधल्या भरतपूर अभयारण्यात शिकारी पक्ष्यांवर संशोधन करत असताना गिधाडांची संख्या कमी होतेय हे माझ्या लक्षात आलं. भरतपूरमध्ये आधी 300च्या वर पांढऱ्या पाठीची गिधाडं होती. पण 2000 सालच्या सुमाराला ही गिधाडं आणि त्यांची घरटी दिसेनाशी झाली."
राजस्थानसोबतच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा राज्यांतूनही गिधाडं कमी झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मेलेल्या जनावरांच्या सांगाड्याजवळ मरून पडलेली गिधाडं आढळू लागली.
ही गिधाडं कुठल्यातरी विचित्र आजाराने मरत होती, पण त्याचं नेमकं कारण सापडत नव्हतं. त्यामुळे वन्यजीव संशोधक चिंतेत होते.
डॉ. विभु प्रकाश यांच्या मते, याआधीही पक्ष्यांच्या प्रजाती दुर्मीळ झाल्या आहेत. पण इतक्या मोठ्या संख्येनं असलेली गिधाडं नाहीशी होण्याचा वेग प्रचंड होता. 2007 मध्ये त्यांच्या संख्येत 99.9 टक्के एवढी घट झाली. सुमारे 4 कोटीपैकी फक्त एक लाख गिधाडं उरली, पण आता तर ही संख्या 30 हजारपर्यंत खाली उतरली आहे.
अनेक वर्षांच्या सर्वेक्षणानंतर, गिधाडांचा मृत्यू हा डायक्लोफिनॅक या जनावरांच्या औषधांमुळे होतो हे निष्पन्न झालं. याआधी भारतात पाळीव जनावरांच्या इलाजासाठी डायक्लोफिनॅकचा सर्रास वापर व्हायचा. डायक्लोफिनॅक वापरून इलाज केलेल्या जनावराचा जर तीन दिवसांत मृत्यू ओढवला आणि हे मांस गिधाडाने खाल्लं तर ही गिधाडंही मरून पडायची.
'डायक्लोफिनॅक'वर बंदी
हे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारनं 2016 मये डायक्लोफिनॅकच्या वापरावर पूर्णपणे बंदी आणली. त्याजागी मिलोक्सीकॅम नावाचं औषध वापरात आणलं गेलं. पण त्यावेळी झालेली गिधाडांची हानी भरून काढण्यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न केले जातायत.
पिंजौरमधल्या गिधाडांच्या संवर्धन केंद्रात काम करणारे वन्यजीव संशोधक मंदार कुलकर्णी सांगतात, "गिधाडं हे सामाजिक पक्षी आहेत. ते नेहमीच समूहानं राहतात. डोंगरदऱ्यांच्या प्रदेशात उंचावर तरंगत आपलं खाद्य शोधायचं आणि आपल्या सहकाऱ्यांना बोलावून त्या खाद्याचा फडशा पाडायचा, अशी त्यांची सवय आहे. गिधाडांना खूप दूरवरून त्यांचं खाद्य शोधता येतं."
गिधाडांच्या या सवयी लक्षात घेऊन गिधाड संवर्धन केंद्रात तशा सोयी करण्यात आल्या आहेत. या गिधाडांना बंदिस्त पिंजऱ्यांमध्ये ठेवण्यात आलं आहे. इथे आणलेली काही गिधाडं मुळात जंगली आहेत. त्यासोबतच इथे ज्या गिधाडांचा जन्म झालाय त्यांनाही पुन्हा जंगलात सोडणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. त्यामुळे या गिधाडांचा माणसांशी संपर्क टाळला जातो.
मंदार सांगतात, "आम्ही या गिधाडांना 30 ते 40 च्या संख्येनं एकत्र ठेवतो आणि मग नैसर्गिक पद्धतीनेच त्यांचं प्रजनन होऊ देतो. गिधाडांचे नर आणि मादी एकमेकांना शोधतात आणि जोडी जमवतात. त्यांच्यासाठी घरटी बनवण्याचं सामान एका छोट्या खिडकीतून टाकलं जातं. यातलीच एखादी फांदी उचलून नर गिधाड मादीला 'प्रपोज' करतं. मादीला हे गिफ्ट आवडलं की त्यांची जोडी जमते आणि एकदा जोडी जमली की ती आयुष्यभर टिकते ! '
गिधाडं काहीही खातात, असा आपला समज आहे. पण हे पक्षी मेलेल्या जनावराचं सडकं मांस खात नाहीत. त्यासाठीच इथे त्यांच्या खाण्याची जय्यत तयारी करण्यात आलीय. या गिधाडांसाठी आठवड्याला 60 बकऱ्यांचं उपलब्ध केलं जातं. पिंजऱ्यातल्या छोटयाशा खिडकीतून खाणं आत टाकलं की गिधाडं ते उचलून घेऊन पिल्लांना भरवतात.
कुठून आली जंगली गिधाडं ?
पिंजौरच्या प्रजनन केंद्रात सकाळच्या वेळी त्यांच्या खाण्यापिण्याची मोठी धावपळ असते. प्रत्येक गिधाडाच्या हालचाली, सवयी, त्यांची तब्येत, विणीचे हंगाम या सगळ्यावर नजर ठेवण्यासाठी वन्यजीव संशोधक, व्हेटर्नरी डॉक्टर आणि वन्यजीव कार्यकर्त्यांची फौज तैनात आहे.
गिधाडं दरवर्षी विणीच्या हंगामात फक्त एकच अंडं घालतात. या अंड्यातून पिल्लू बाहेर येणं, ते मोठं होऊन उडायला शिकणं हा एक कसोटीचा काळ असतो. या काळात पिल्लांना आणि गिधाडांना कोणताही संसर्ग होऊ नये किंवा आजार होऊ नये यासाठी खूप काळजी घ्यावी लागते, कारण याच गिधाडांना पुढे निसर्गात सोडायचं आहे.
याआधी याच केंद्रातून 'हिमालयीन ग्रिफन' या प्रजातीच्या तीन गिधाडांना जंगलात सोडण्यात यश आलं आहे. गिधाडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया मोठी रंजक आहे. हरियाणामधलं हे अभयारण्य आधी राजा-महाराजांच्या शिकारीसाठी राखून ठेवलेलं जंगल होतं. त्यामुळे हे जंगल पक्ष्यांना अनुकूल आहे.
जंगली गिधाडांना पिंजऱ्यातल्या गिधाडांकडे आकर्षित करण्यासाठी तिथं जवळच मेलेल्या जनावरांचे सांगाडे आणून ठेवले जातात. या भक्ष्याचा माग काढत जंगली गिधाडं बरोब्बर इथे येतात!
सकाळच्या वेळी 11 च्या सुमाराला उन चढत गेलं की या केंद्रातल्या पिंजऱ्यांच्या वर जंगली गिधाडांचा थवाही विहरताना दिसतो तेव्हा याची खात्री पटते.
इथं आलेल्या जंगली गिधाडांच्या थव्याकडे बघत विभु प्रकाश सांगतात, "ही गिधाडं इथे आली की त्याचा फायदा घेऊन आम्ही आमच्या प्रजनन केंद्रातल्या गिधाडांचा आणि या गिधाडांचा संपर्क येऊ देतो. गिधाडांच्या पिंजऱ्याचं दार उघडून आम्ही बाहेरच्या गिधाडांना आत येऊ देतो. ज्या गिधाडांना जंगलात सोडायचं आहे त्यांना अशा प्रकारे जंगली गिधाडांच्या थव्यात मिसळू दिलं जातं. काही दिवस ही प्रक्रिया सुरू ठेवली की या गिधाडांचा एक थवा तयार होतो आणि जंगली गिधाडांच्या मागोमाग इथली गिधाडंही उडून जातात."
इतकी वर्षं बंद पिंजऱ्यात असलेली ही गिधाडं पंख फैलावून उडू कशी शकतात? डॉ. विभु प्रकाश यांच्या मते, जंगलात उडणं, भक्ष्य शोधणं ही त्यांची नैसर्गिक प्रेरणा आहे. बंदिस्त पिंजऱ्यात जन्माला आलेलं पिल्लूही हे विसरू शकत नाही.
गिधाडं अशी घेणार भरारी
याच नैसर्गिक प्रेरणेनं या संवर्धन केंद्रातल्या काही गिधाडांना आता जंगलात सोडण्यात येणार आहे. इथली गिधाडं जंगलात तगू शकतात की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या पाठीवर एक छोटंसं यंत्र लावलं जाईल.
हे यंत्र रेडिओ सिग्नलच्या मदतीनं गिधाडांचा ठावठिकाणा सांगू शकेल. तसंच त्यांचा आणखी अभ्यास करणं शक्य होणार आहे.
इथे वाढलेली गिधाडांची ही पिल्लं जेव्हा आकाशात भरारी घेतील तेव्हा या प्रकल्पाचा उद्देश खऱ्या अर्थानं सफल होईल, असं इथल्या संशोधकांना वाटतं.
पिंजौरच्या गिधाड संवर्धन केंद्रातून बाहेर पडताना जाळीमधून आकाशात उडण्याच्या प्रतीक्षेत असलेली गिधाडं दिसत राहतात. त्यांना भेटायला आलेल्या जंगली गिधाडांचा एक थवा आभाळात विहरत असतो. एक दिवस त्यांच्यासोबतच ही गिधाडंही आभाळात उंच उडतील, हा विश्वास आपल्याही मनात पक्का होतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)