कोल्हापूरकरांना भीक नको, संभाजीराजेंची विनोद तावडेंवर टीका : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) कोल्हापूरकरांना भीक नको, संभाजीराजेंची तावडेंवर टीका

कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रस्त्यावर फिरून मदत गोळा करणाऱ्या सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यावर खासदार संभाजीराजे यांनी टीका केलीय. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही, अशा शब्दात ट्वीट करत संभाजीराजेंनी तावडेंवर निशाणा साधला. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिलीय.

"स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव काय? हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही," असं ट्वीट खासदार संभाजीराजेंनी केलंय.

त्यात त्यांनी विनोद तावडे यांनाही टॅग केलं आहे. त्यामुळे संभाजीराजेंच्या ट्वीटची सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा झाली.

कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यात पूर आल्यानंतर सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईतील बोरिवलीत 11 ऑगस्टला भाजपकडून मदतफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात विनोद तावडे हातात डबा घेऊन रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडून पैसे गोळा करत होते. यातून गोळा झालेला निधी पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवला जाणार होता.

2) पूरग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ, सोबत तीनपट नुकसानभरपाई : मुख्यमंत्री

सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचं एक हेक्टर मर्यादेपर्यंतच्या पिकासाठीचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्याचसोबत, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं नाही, त्यांना शासकीय नुकसनाभरपाईच्या तिप्पट रक्कम दिली जाईल, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.

घरांची पडझड झाली असल्यास पंतप्रधान आवास योजनेतून नवी घरं बांधून दिली जाणार आहेत. घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण भागात 24 हजार आणि शहरी भागात 36 हजार रूपये दिले जातील.

जुलै ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांना कशी आणि किती मदत द्यावी, यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली.

3) सत्ता द्या, भूमिपुत्रांना 75 टक्के नोकऱ्या देण्याचा कायदा करू : अजित पवार

राज्यात सत्ता आल्यास भूमिपुत्रांसाठी कायदा करणार असून, एखादा कारखाना सुरू झाल्यास स्थानिकांना 75 टक्के नोकऱ्या दिल्या जातील, असं आश्वासन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलं आहे. पैठणमधील शिवस्वराज्य यात्रेत ते बोलत होते. एबीपी माझानं ही बातमी दिली.

भूमिपुत्रांना 75 टक्के नोकऱ्या दिल्याशिवाय एखादा कारखान चालणारच नाही, असा कायदाच करू, असंही अजित पवार म्हणाले.

कुठंही कारखाना काढा, मदत करू, सवलती देऊ, प्रोत्साहन देऊ, पण स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. 25 टक्के बाहेरचे घ्या, पण 75 टक्के स्थानिक घ्यायला पाहिजे, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.

4) आरक्षणावर चर्चा व्हावी : मोहन भागवत

आरक्षणाचं समर्थन करणारे आणि आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांमध्ये सुसंवाद व्हायला हवा, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात व्यक्त केलं. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

आरक्षणासंदर्भात आधीही बोललो होतो. मात्र, त्यावेळी गदारोळ होत, विषय मूळ मुद्द्यापासून भरकटला होता, अशी खंत भागवतांनी व्यक्त केली.

"आरक्षणावर बोलल्यास अनेकांकडून टोकाच्या प्रतिक्रिया येतात. मात्र, या विषयावर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांचे विचार काय आहेत, याबाबत सुसंवाद व्हायला हवा," असं भागवत म्हणाले.

5) मंदावलेली अर्थव्यवस्था चिंताजनक, सुधारणांची गरज : रघुराम राजन

भारतातील मंदावलेली आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक असून, यावर तातडीने उपाय करण्याची गरज आहे. नव्या सुधारणांची आवश्यकता आहे, असं रिझर्व्ह बँकेची माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिलीय.

जीडीपीची आकडेवारी काढण्यासाठी स्वतंत्र गटाची नेमणूक व्हावी. जीडीपीची आकडेवारी चुकीची नसल्याची खात्री व्हायला हवी. कारण चुकीच्या आकडेवारीतून चुकीचं धोरण आणि चुकीची कृती घडते, असं रघुराम राजन म्हणाले.

बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसह खासगी क्षेत्रात उर्जेच्या स्वरुपात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या सुधारणा कराव्या लागतील, असं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)