'राहुल गांधींनी काँग्रेसला वाऱ्यावर सोडलं कारण...' : दृष्टिकोन

    • Author, विनोद शर्मा
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

राहुल गांधी आता काँग्रेस अध्यक्ष नाहीत. बुधवारी चार पानी पत्राद्वारे त्यांनी हे जाहीर केलं आहे.

राहुल गांधींनी आपला राजीनामा जगजाहीर केलाय. आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये सांगितलं होतं. पण पक्षातले अनेक नेते त्यांना पदावर राहण्याची पुन्हा पुन्हा विनंती करत आहेत.

मुंबईत आपल्या राजीनाम्याबाबत बोलताना त्यांनी आता आपण आणखी 10 पट जोमानं लढणार आहोत, असं सांगितलं आहे. मी शेतकरी, कामगार आणि गरिबांच्या बरोबर आहे,

ही विचारांची लढाई आहे, ती पुढेही सुरू राहील, जशी गेल्या 5 वर्षांत सुरू होती तशीच ती पुढेही सुरू राहील, असं राहुल गांधी यांनी मुंबईत म्हटलं आहे.

कार्यकारी समिती ठरवणार पुढचं धोरण

राहुल गांधी ठाम आहेत. आणि आता ही गोष्ट जगजाहीर झाल्याने काँग्रेस पक्षाकडे आता नवीन नेत्याची निवड करण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही.

पण नेत्याची निवड कशी होणार हे येत्या काही काळातच समजू शकेल. काँग्रेसच्या पक्षघटनेनुसार अशा परिस्थितीममध्ये काँग्रेसचे सर्वांत ज्येष्ठ सरचिटणीस हंगामी अध्यक्ष म्हणून काम सांभाळतात.

सध्या मोतीलाल व्होरा काँग्रेसचे सर्वांत ज्येष्ठ सरचिटणीस आहेत. अशी शक्यता आहे ते लवकरच पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक बोलवतील आणि त्यामध्ये पक्षाचं पुढचं पाऊल ठरवण्यात येईल.

आपल्या चार पानी पत्रामध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की जोपर्यंत आपण सत्तेचा मोह सोडून एका मोठ्या विचाराने लढत नाही, तोपर्यंत प्रतिस्पर्ध्यांना हरवू शकणार नाही.

राहुल गांधींनी स्वतःला आणि पक्षातल्या नेत्यांना उद्देश्यून हे म्हटलेलं आहे. पण माझ्यासकट अनेकांचं असं म्हणणं आहे की पद सोडायचंच जर राहुल गांधींनी ठरवलेलं होतं तर उत्तराधिकारी निवडण्यात आल्यानंतर हे पद सोडणं ही त्यांची जबाबदारी होती.

मग या निवड प्रक्रियेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला नसता, तरी चाललं असतं. पण प्रवर्तक म्हणून ही निवड प्रक्रिया सुरू करून ते ती शेवटापर्यंत नेऊ शकले असते.

प्रश्न विवेक आणि निष्ठेचा आहे

आता परिस्थिती अशी आहे की नेहरू-गांधी कुटुंबातला कोणीही सदस्य नवीन नेत्याच्या निवडीमध्ये सक्रिय भूमिका बजावणार नाही. मग नवीन नेत्याची निवड ही सर्वसहमतीने होईल आणि तो पक्षातली एकजूट कायम ठेवेल, याची काय हमी?

हा मोठा प्रश्न आहे आणि राहुल गांधींनी याचं उत्तर द्यायला हवं होतं.

राजकारणात जय-पराजय होतच असतात. नेते पराभवाची जबाबदारीही स्वीकारतात. पण तसं करण्याचीही एक पद्धत असते. आणि एक भान बाळगायला लागतं. अशा प्रकारे पद सोडून जाणं योग्य नाही.

राहुल यांचं मन वळवण्याचे प्रयत्न अयशस्वी होणार, हे जर मान्य केलं तर अध्यक्ष म्हणून त्यांचा लहान कार्यकाळ संपल्याचं नक्की आहे. पण गेल्या काही काळामध्ये तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने त्यांच्याच नेतृत्त्वाखाली विजय मिळवला हे मान्य करायलाच हवं. सोबतच हे देखील लक्षात ठेवायला हवं की 2019च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा मोठा पराभव झाला.

लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव होण्याची दोन-तीन मोठी कारणं होती. एक म्हणजे भाजपने बालाकोट प्रकरण हे आपल्या बाजूने वळवून घेतलं. पण त्याचवेळी काँग्रेसने याविषयी ज्या शंका उपस्थित केल्या, त्या ते जनतेच्या गळी उतरवू शकले नाहीत.

राहुल गांधींनी याचा विचार करायला हवा होता. ही त्यांची चूक नाही का? पक्षाने त्यावेळी जे धोरण ठरवलं होतं, ते ठरवण्यात सर्वांत मोठी भूमिका पक्षाच्या अध्यक्षाचीच असते.

त्यांनी आपली चूक स्वीकारत राजीनामा दिला. पण पद सोडायच्या आधी त्यांनी पक्षाला अशा टप्प्यावर आणायला हवं होतं जिथे पक्षाला एक नेता असेल आणि रोजचं काम होत राहील आणि एक नवीन ध्येय घेऊन पक्ष पुढे वाटचाल करेल.

पण बदल घडवण्याची प्रक्रिया सुरू न करताच त्यांनी अर्ध्यातच पक्षाला वाऱ्यावर सोडलं.

मला वाटतं की हे पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही आणि येत्या काही महिन्यांमध्ये पक्षाला निवडणुकीला सामोरं जायचं आहे.

पण यामुळे राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून अपयशी ठरवण्यात यावं, याच्याशी मी सहमत नाही.

राजकारणात काळ बदलतो. कधी कधी खूपच लवकर बदल घडतात तर त्यामागे खूप मोठा खटाटोप असतो. कोणत्याही नेत्याला नगण्य ठरवणं योग्य नाही. अनेकदा बदल एका झटक्यात घडून येतात आणि असं घडल्याचं इतिहास अनेक ठिकाणी आढळतं.

बीबीसीचे प्रतिनिधी कुलदीप मिश्र यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)