वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसला 40 जागांची ऑफर : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. वंचित काँग्रेससाठी 40 जागा सोडणार

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 40 जागा सोडण्याची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 248 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

काँग्रेसला मंजूर असेल तर त्यांनी 10 दिवसांत उत्तर द्यावं अशी भूमिका वंचितने घेतली आहे. वंचित आघाडीतर्फे आण्णाराव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी ही भूमिका जाहीर केली आहे.

वंचितने ही ऑफर दिलेली असताना रिपाइं गवई गटाने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. महाआघाडीत किमान 10 जागा मिळाव्यात अन्यथा स्वबळावर 50 जागा लढवू असा इशारा राजेंद्र गवई यांनी दिला आहे.

वंचित आघाडीशी चर्चा करण्याची जबाबदारी काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे दिली आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

2. दोन आठवड्यांमध्ये 39 शेतकऱ्यांची आत्महत्या

दुष्काळाची होरपळ आणि पावसाला झालेला उशीर यामुळे मराठवाड्यातल्या 39 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पेरण्यांची चिंता आणि आर्थिक आघाडी सावरण्यासठी कर्ज आणि सावकारी ओझ्याखाली दबलेले शेतकरी ऐन पावसाळ्यातही आत्महत्या करत आहेत.

गेल्या 14 दिवसांमध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 39 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. यापैकी सर्वांत जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये झाल्या आहेत.

बीडमध्ये 9, औरंगाबादमध्ये 7, नांदेडमध्ये 6 आणि जालना जिल्ह्यातील 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जानेवारी ते 30 जून 2019 या कालावधीमध्ये 434 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

3. हॅकर मनिष भंगाळेचा खडसेंना इशारा

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मनिष भंगाळेचं नाव सभागृहात घेतल्यानंतर मनिष भंगाळे पुन्हा एकदा अवतरला आहे. मी अजूनही जिवंत आहे, मी तुमच्याकडे वळेन असा त्यानं ट्वीटरवर इशारा दिला आहे.

सभागृहातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांपैकी कोणीही नाही, पण बाहेरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केले. दाऊदच्या बायकोशी मी बोलत असल्याचे संबंध जोडले गेले. दाऊदला सोडून तिला नाथाभाऊशी का बोलावं वाटलं, हे मला कळलंच नाही, असं खडसे म्हणाले होते.

मनिष भंगाळे या हॅकरने माझ्यावर आरोप केले होते. त्यानंतर तो कुठे गायब झाला असा प्रश्न त्यांनी विचारला होता. हाच व्हीडिओ ट्वीट करत भंगाळेने इशारा दिला आहे. एबीपी माझाने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

4. शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त

मुंबई-पुणे मार्गावरील शिवनेरी आणि अश्वमेध बसच्या तिकिटांमध्ये 80 ते 120 रुपयांची कपात करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. सोमवार 8 जुलैपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

एसटी महामंडळाने 14 जून 2018 रोजी सर्व प्रकारच्या तिकिटांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर प्रवासी अस्वमेध, शिवनेरीकडून खासगी वाहनांकडे वळत होते. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे या महत्त्वाच्या मार्गासह अन्य सात मार्गांवरील भाडं कमी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

सध्या मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या सात मार्गांवर शिवनेरीच्या दिवसभरात 435 फेऱ्या चालवल्या जातात. तिकीटदराच्या कपातीमुळे प्रवासी पुन्हा एसटीकडे येतील असा विश्वास महामंडळाने व्यक्त केले आहे. हे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केलं आहे.

5. सर्वोच्च न्यायालयाची निकालपत्रे आता मराठीतही

सर्वोच्च न्यायालयाची निकालपत्रे आता मराठीसह निवडक प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध होणार आहे. इंग्रजी न येणाऱ्या पक्षकारांना निकालाचा अर्थ कळावा यासाठी ही सोय केली जाणार आहे.

इंग्रजी निकालपत्रांचे प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी न्यायालयाच्या स्वतःच्या आयटी विभागाने सॉफ्टवेअर विकसित केलं असून त्यानुसार भाषांतरित निकालपत्रं प्रसिद्ध करण्यास सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी मंजुरीही दिली आहे.

पहिल्या टप्प्यात असमिया, हिंदी, कन्नड, मराठी, उडिया आणि तेलगू भाषांमध्ये ही निकालपत्रं प्रसिद्ध होतील. जुलै महिन्याच्या अखेरीपासून ही सेवा सुरु होईल असे लोकमतने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)