राहुल गांधी : काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी माझी, मी राजीनामा देतोय

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्याच्या जवळपास महिन्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे.

या आधीही त्यांनी अनेकदा राजीनामा देण्याची शिफारस केली होती. मात्र काँग्रेस नेत्यांनी एकमुखाने त्याला नकार दिला होता. आज मात्र राहुल गांधीनी राजीनामा देत राजीनाम्याचं पत्र ट्विटरवर टाकलं आहे.

महिनाभराच्या चर्चेनंतर आज राहुल गांधी यांनी अधिकृतपणे ट्विटरवर आपला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या चार पानी राजीनाम्यामध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.

त्याआधी, काँग्रेसच्या विद्यमान आणि माजी मुख्यमंत्र्यांबरोबर राहुल गांधी यांनी बैठक घेतली. बैठकीच्या सुरूवातीला राहुल गांधी यांनी आपण राजीनामा मागे घेत नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांवरही जोरदार टीका केली.

ते म्हणाले जर लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेतली असती तर काँग्रेसचे असे हाल झाले नसते.

राहुल गांधी यांनी 25 मे रोजीच लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा दिला होता.

तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेसमधले बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करत होते.

आपल्या राजीनाम्यात राहुल गांधी म्हणाले, "आपली मूल्यं आणि आदर्शांच्या माध्यमातून या सुंदर देशाची सेवा करणाऱ्या काँग्रेस पक्षात काम केल्याचा मला अभिमान आहे. आजपर्यंत मला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी देशाचा आणि पक्षाचा ऋणी राहीन."

काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने 2019 लोकसभा निवडणुकीतल्या पराभवासाठी मी जबाबदार आहे. त्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीसाठी हे महत्त्वपूर्ण आहे, असंही त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

"पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांनीही 2019 च्या निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घ्यावी."

त्यांनी लिहिलं, "माझ्या अनेक सहकाऱ्यांनी पुन्हा मी काँग्रेस अध्यक्ष व्हावे असा सल्ला दिला. मात्र सध्या कुणीतरी नव्या व्यक्तीने पक्षाचं नेतृत्व करणं आवश्यक आहे, पण मी त्या व्यक्तीची निवड करणं योग्य नसेल."

का दिला राहुल गांधींनी राजीनामा

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. यावेळी सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला फक्त 52 जागांवर समाधान मानावं लागलं.

इतकंच नाही तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतःचा बालेकिल्ला असणाऱ्या अमेठीतही हरले. हा पराभव राहुल यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.

यानंतर काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते राजीनामा देतील अशी त्यांची अपेक्षा होती मात्र असं काही झालं नाही.

जेष्ठ पत्रकार अपर्णा द्विवेदी म्हणतात की, मुळात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी या पराभवाची जबाबदारी घ्यावी आणि पक्षाच्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी राहुल यांची इच्छा होती.

पक्ष संघटनेत परिवर्तनाची गरज असल्याचं मत राहूल गांधी यांनी वारंवार व्यक्त केलं. हे परिवर्तन ते आपल्या राजीनाम्यापूर्वीच करणार होते.

"पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी दिलेले सगळे सल्ले राहुल यांनी ऐकले. त्यांनी सांगितेलेल्या उमेदवाराला पक्षानं तिकीट दिलं पण लोकसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार काहीच खास करू शकले नाही, अशी राहूल गांधी यांची तक्रार आहे," त्या पुढे सांगतात.

इतकं असूनही पक्षाचे नेते आपली पदं सोडायला तयार नाहीत.

पक्षाच्या तिकीटवाटपात घराणेशाहीचा मुद्दा महत्त्वाचा होता. राहुल गांधी यांनी याबाबत मुख्यमंत्री बैठकीत स्पष्टपणे मत मांडलं.

महाराष्ट्रात काँग्रेसने 10 जागांवर विजयाचा दावा केला होता. पण त्यांना फक्त एका जागेवर विजय मिळाला. हा विजयी उमेदवारसुद्धा ऐनवेळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाला होता.

अशीच कहाणी इतर राज्यांचीही आहे. राजस्थानात जिथे काँग्रेसचं सरकार आहे, त्याठिकाणी पक्षाला लोकसभेची एकही जागा मिळाली नाही.

राहुल गांधींनी आपल्या 4 पानी राजीनाम्यात काय लिहिलं?

माझा संघर्ष फक्त सत्ता मिळवण्यासाठी नव्हता.

राजीनामा दिल्यानंतर लगेचच एक समिती बनवून नवीन अध्यक्ष निवडण्याचा सल्ला मी काँग्रेस कार्यकारिणीला मधल्या सहकाऱ्यांना दिला आहे. या समितीने नव्या अध्यक्षांचा शोध सुरू करावा. यासाठी मीसुद्धा मदत करेन आणि काँग्रेस पक्षातील नेतृत्व परिवर्तन सोप्या पद्धतीने होईल.

भाजपविरुद्ध माझ्या मनात कोणताच द्वेष नाही, पण भारताबाबतच्या त्यांच्या विचारांना माझ्यातला कण न कण विरोध करेल.

त्यांचे भारताविषयीचे विचार आहेत ते माझे नाहीत. भारताची व्याख्या माझ्यालेखी वेगळी आहे.

ही नवी लढाई नाही, ही लढाई हजारो वर्षांपासून लढली जातेय. ज्याठिकाणी त्यांना परकेपणा दिसतो तिथे मी समानता पाहतो. ज्याठिकाणी ते द्वेष पाहतात, त्याठिकाणी मी प्रेम पाहतो. ज्या गोष्टींना ते घाबरतात, त्यांना मी आपलं मानतो.

हाच सहिष्णुतेचा विचार माझ्या देशवासीयांच्या मनात काठोकाठ भरलेला आहे.

आपण याच विचारांचं सगळ्या ताकदीनिशी संरक्षण करू.

आपल्या देशाचा पाया, त्याची रचना बदलण्यासाठी देशावर तसंच आपल्या संविधानावर हल्ले करण्यात येत आहेत. मी या लढाईतून कोणत्याही प्रकारे माघार घेणार नाही. मी काँग्रेस पक्षाचा एक प्रामाणिक शिपाई आणि भारताला समर्पित पुत्र आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी देशाची सेवा आणि रक्षण करत राहीन.

आपण एक अवघड आणि प्रतिष्ठेची निवडणूक लढवली. आपला प्रचार भारताचे सगळे नागरिक, धर्म आणि समाजांच्या बंधुभाव, सहिष्णुता आणि सन्मानासाठी होता.

मी वैयक्तिकरित्या पंतप्रधान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांनी कब्जा केलेल्या इतर संस्थांविरुद्ध संघर्ष केला.

भारतावर प्रेम असल्यामुळे मी लढलो. ज्यांच्या पायावर भारत उभा आहे, त्या आदर्शांना वाचवण्यासाठी मी लढलो.

एक अशी वेळ होती ज्यावेळी मी पूर्णपणे एकटा उभा होतो आणि याचा मला अभिमान आहे. मी आपले कार्यकर्ते, पक्ष सदस्य, पुरूष आणि महिलांचं साहस आणि समर्पण यातून खूप काही शिकलो आहे. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि विनम्रता दाखवली.

पूर्णपणे स्वतंत्र आणि पारदर्शक निवडणुकांसाठी देशातील संस्थांनी निःपक्षपाती असणं अनिवार्य आहे.

स्वतंत्र माध्यमं, स्वतंत्र न्यायपालिका आणि एक पारदर्शक निवडणूक आयोग यांच्याशिवाय कोणतीही निवडणूक निःपक्षपाती होऊ शकत नाही. देशातील सगळ्या आर्थिक स्रोतांवर एकाच पक्षाचा कब्जा असताना कोणतीच निवडणूक स्वतंत्रपणे होऊ शकत नाही.

आपण 2019 च्या निवडणुकीत एका राजकीय पक्षाचा सामना तर केलाच, पण सोबतच आपण भारत सरकारच्या संपूर्ण यंत्रणेविरुद्ध लढाई लढली. प्रत्येक संस्थेला विरोधी पक्षांच्या विरोधात वापरण्यात आलं. भारताच्या ज्या संस्थांच्या निःपक्षपातीपणाबद्दल कौतुक केलं जायचं, त्या संस्था आता निःपक्षपाती राहिल्या नाहीत.

देशातील सगळ्या संस्थांवर कब्जा करण्याचा RSS चा उद्देश आता पूर्ण झाला आहे. आपल्या लोकशाहीला मौलिक स्वरूपात कमजोर करण्यात आलं आहे. भारताचं भविष्य ठरवणाऱ्या निवडणुका आता केवळ औपचारिकता राहतील का, असा धोका आता निर्माण झाला आहे.

ते सत्तेवर असल्यामुळे भारताला पराकोटीची हिंसा आणि त्रास सहन करावा लागेल. शेतकरी, बेरोजगार, तरूण, महिला, आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकांना सगळ्यात जास्त नुकसान सहन करावं लागेल.

देशाची अर्थव्यवस्था आणि बांधणीवर याचा परिणाम होईल.

पंतप्रधानांच्या या विजयाचा अर्थ ते भ्रष्टाचाराच्या आरोपांतून मुक्त झाले असा नाही. कुणी कितीही पैसा खर्च करू देत, कितीही प्रपोगंडा करू देत, सत्याचा प्रकाश कुणीच लपवू शकत नाही. भारताच्या संस्थांना मिळवण्यासाठी आणि त्यांना पुनर्जिवित करण्यासाठी संपूर्ण भारताला एक व्हावे लागेल आणि काँग्रेस पक्षच या संस्थांना पुन्हा उभं करेल.

हे महत्त्वाचं काम करण्यासाठी काँग्रेस पक्षाला स्वतःमध्ये आमुलाग्र बदल करावे लागतील. आज भाजप भारताच्या नागरिकांचा आवाज सुनियोजित पद्धतीनं दाबत आहे. या आवाजांचं संरक्षण करणं काँग्रेस पक्षाचं कर्तव्य आहे.

भारतात कधीच फक्त एक आवाज नव्हता आणि नसेल. भारत हा नेहमीच अनेक आवाजांचा संगम राहिला आहे.

ज्यांनी माझ्या पाठिंब्यासाठी संदेश आणि पत्रं पाठवली, अशा भारतात आणि परदेशात राहणाऱ्या हजारो भारतीयांचे आभार. मी संपूर्ण ताकदीनं काँग्रेस पक्षाच्या आदर्शांसाठी लढत राहीन.

जेव्हा-जेव्हा पक्षाला माझी सेवा, माझ्या कोणत्याही प्रकारच्या सल्ल्याची गरज भासेल, त्यावेळी मी उपस्थित असेन. काँग्रेसच्या विचारधारेला पाठिंबा देणाऱ्या आणि विशेषतः पक्षाचे कार्यकर्त्यांबाबत मला प्रेम आहे. मला आपल्या भविष्याबाबतही आस्था आहे.

भारतात बलवान लोक सत्तेला चिकटून असतात,. अशीच पद्धत आजवर रूढ झाली आहे. कोणालाही सत्तेचा त्याग करायचा नाही. मात्र सत्तेचा मोह सोडल्याशिवाय आणि एका विचारधारेची लढाई लढल्याशिवाय आपण विरोधकांना हरवू शकत नाही. मी एक काँग्रेसी म्हणून जन्मलो होतो, हा पक्ष नेहमी माझ्या सोबत होता. हीच माझी जीवनरेखा आहे आणि नेहमीच असेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)