दृष्टिकोन - 133वा स्थापना दिन विशेष : राहुल गांधींच्या काँग्रेससमोर आव्हानांचा डोंगर

    • Author, कल्याणी शंकर
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

काँग्रेस 132 वर्षं जुना राजकीय पक्ष आहे. 1885साली 28 डिसेंबरला काँग्रेसचा पक्षाचा पाया घातला गेला. भारताच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचा मोठा वाटा आहे.

स्वातंत्र्यानंतर 60 वर्षं देशाच्या राजकारणाला काँग्रेसनंच आकार दिला आहे. पण 2014च्या निवडणुकीत हा पक्ष फक्त 44 जागा जिंकू शकला. संसदीय पक्षाचा दर्जा न मिळण्याइतकी या पक्षाची अवस्था बिकट झाली आहे.

काँग्रेससमोर मोठी समस्या

सध्या देशातल्या 29 राज्यांपैकी 19 राज्यांत भाजप आणि सहयोगी पक्षांचं सरकार आहे. तर काँग्रेसचं सरकार केवळ चार राज्यांत आणि एका केंद्रशासित प्रदेशात आहे.

पण नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. पण आज पक्षासमोर एक मोठा मुद्दा आ वासून उभा आहे.

तो म्हणजे भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत कोणत्याही प्रकारचा मोठा विरोध होऊ देत नाही. इतर ठिकाणी उलट परिस्थिती आहे. तिथं भाजप मोठे मुद्दे जनतेच्या समोर आणताना दिसतो. पण भाजपशासित राज्यात कोणतेही मोठे मुद्दे पुढे आणण्यात काँग्रेस अयशस्वी का होतं?

देशाच्या राजकारणात सगळ्यांत जुना पक्ष असलेला काँग्रेस पक्ष मोठे मुद्दे उचलण्यात मात्र सक्षम का नाही? याबद्दल 'बीबीसी'नं ज्येष्ठ पत्रकार कल्याणी शंकर यांच्याशी बातचीत केली.

काँग्रेस एक मोठा राजकीय पक्ष आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसचा मोठा वाटा आहे. काँग्रेसकडे महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे मोठे नेते होते. 1950 आणि 1960च्या दशकात तो एक मोठा पक्ष होता. पण इंदिरा गांधी आल्यावर 1967 साली त्यांचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात झाली. पण त्यावेळी 2014सारखी स्थिती झालेली नव्हती.

आज काँग्रेसचं सरकार फक्त पाच राज्यांत आहे. कर्नाटक, पंजाब, मिझोरम, मेघालय, आणि पुडुच्चेरी या राज्यांत काँग्रेसचं सरकार आहे. त्यात पंजाब आणि कर्नाटक हीच मोठी राज्ये आहेत. 2018 साली कर्नाटकमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीचे निकाल काय लागतील, हे आताच सांगता येणं कठीण आहे.

काँग्रेसला काय करावं लागेल?

गुजरात निवडणुकीत राहुल गांधी यांनी त्यांचं झुंजार रूप दाखवलं आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला. 2जी खटल्यात झालेला निर्णय काँग्रेससाठी उत्साहवर्धक आहे. राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांत देखील काँग्रेसनं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे काँग्रेस अस्तंगत होत आहे, असं मला अजिबात वाटत नाही.

काँग्रेस अजून जिवंत राहील. पण त्यासाठी नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधींना भरपूर कष्ट घ्यावे लागतील. त्यांच्या कार्यकर्त्यांना अगदी शुन्यातून सुरुवात करावी लागणार आहे.

त्यांना 24x7 नेता होण्याची गरज आहे. राहुल गांधींना कार्यकर्त्यांना भेटण्याची गरज आहे. 2018ची निवडणूक खूपच आव्हानात्मक आहे.

गुजरातकडून अपेक्षा

काँग्रेससाठी ही वेळ सध्या नक्कीच वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये कौतुकास्पद विजय मिळालेला नाही. 2019ला लोकसभा निवडणुका आहेत. या निवडणुका सहा महिने आधी होण्याचीसुद्धा शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीआधी आठ राज्यांत निवडणुका आहेत. त्यांतील काही राज्यांत काँग्रेसला यश मिळवणं आवश्यक आहे. तरच काँग्रेसला लोकसभा निवडणुकांत चांगलं यश मिळवता येऊ शकेल.

भाजपकडे मोठे नेते आहेत. त्यांची यंत्रणा उत्तम आहे. ते चांगलं मायक्रो मॅनेजमेंट करताना दिसतात. मागच्या 3 वर्षांत काँग्रेसचा आलेख खाली घसरत आहे. काँग्रेसकडे राज्यस्तरावरील मोठे नेते नाहीत. जे छोटे नेते आहेत, त्यांना मोठं करण्यासाठी पक्षाने काहीही प्रयत्न केलेले नाहीत.

पंजाबमध्ये अमरिंदर सिंग, कर्नाटकात सिद्धारमय्या असे मोठे नेते आहेत. अशा राज्यांत काँग्रेस भाजपाला फारसं पुढे येऊ देत नाही. जिथे काँग्रेसकडे स्थानिक नेते कमजोर आहेत, तिथं मात्र भाजप बळकट झाला आहे, असं चित्र दिसतं.

राहुल गांधीचं भविष्य

जेव्हा सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या, तेव्हाही काँग्रेसची अशीच स्थिती होती. खूप कमी राज्यांत काँग्रेसची सत्ता होती. केंद्रातसुद्धा काँग्रेसची सत्ता नव्हती. लोकसभेतसुद्धा त्यांचं जास्त संख्याबळ नव्हतं.

पण त्यांनी पचमढी आणि शिमला इथं चिंतन शिबिर घेतलं. त्यामुळे पक्षात उत्साह संचारला. त्यानंतर 2004साली सोनिया गांधींनी युपीएची स्थापना केली. पक्ष आणखी मजबूत केला. पुढे काँग्रेसप्रणित युपीए 10 वर्षं सत्तेत राहिलं.

आता सोनिया गांधी राजकारणापासून दूर झाल्या आहेत आणि काँग्रेसचा भार राहुल गांधींवर आहे. गुजरातेत त्यांनी मोदी आणि शहा या जोडगोळीचा ज्या पद्धतीनं सामना केला त्यामुळे काँग्रेसला आशेचा किरण दिसत आहे.

पण त्यांचं आणि पक्षाच भविष्य 2018मध्ये होत असलेल्या विविध राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावर अवलंबून असेल.

हेवाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)