रवींद्र जडेजानं मला चुकीचं ठरवलं-संजय मांजरेकरांकडून कौतुक

'जडेजाने अफलातून सर्वांगीण खेळाच्या जोरावर मला सर्व आघाड्यांवर चुकीचं ठरवलं,' या शब्दांत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रवींद्र जडेजाचं कौतुक केलं.

काही दिवसांपूर्वीच संजय मांजरेकर यांनी जडेजावर टीका केली होती. जडेजानंही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांच्यातील या वाद-प्रतिवादाच्या पार्श्वभूमीवर मांजरेकर यांनी सेमी फायनलनंतर जडेजाची स्तुती केली.

संजय मांजरेकर यांनी म्हटलं, की आज बॅटिंग करताना जडेजाचं रूप वेगळंच होतं. गेल्या चाळीस इनिंग्जमध्ये त्याचा सर्वोत्तम स्कोअर तीसच्या आसपास होता. मात्र आज त्याने शानदार खेळी केली.

अर्धशतकानंतर खास शैलीतील सेलिब्रेशनवेळी जडेजा तुम्हाला शोधत होता यावर मांजरेकर म्हणाले, 'हो, त्यासाठी मी माफी मागतो. त्यावेळी तो मला कॉमेंट्री बॉक्समध्ये शोधत होता, परंतु मी तिथे नव्हतो. मी जेवायला गेलो होतो'.

सेमी फायनलच्या लढतीत टीम इंडियाची टॉप ऑर्डर गडगडलेली असताना रवींद्र जडेजाने 77 धावांची झुंजार खेळी केली. गोलंदाजी करताना जडेजाने 10 ओव्हर्समध्ये फक्त 34 धावा देत एक विकेट मिळवली. जडेजाने 2 कॅच आणि एक रनआऊट करत आपली उपयुक्तता सिद्ध केली.

मांजरेकर-जडेजामधली खडाजंगी

काही दिवसांपूर्वी संजय मांजरेकर आणि टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा यांच्यात ट्विटरवर खडाजंगी झाली.

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर रवींद्र जडेजाला अंतिम संघात घ्यावं अशी चर्चा सुरू होती. हाच प्रश्न मांजरेकर यांना विचारल्यावर त्यांनी म्हटलं, "बिट्स अँड पीसेस प्लेयर्सचा (थोडी बॅटिंग-थोडी बॉलिंग करणारे खेळाडू) मी चाहता नाही. वनडे क्रिकेटमध्ये जडेजाची भूमिका अशीच काहीशी आहे. टेस्ट मॅचेसमध्ये जडेजा स्पेशालिस्ट बॉलर म्हणून खेळतो. पण वनडेत मी संघात स्पेशालिस्ट बॅट्समन किंवा स्पेशालिस्ट स्पिनरला पसंती देईन".

जडेजाने या टीकेला ट्वीटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. जडेजानं म्हटलं, "काहीही झालं तरी तुमच्यापेक्षा दुप्पट मॅचेस मी खेळल्या आहेत. मी अजूनही खेळतो आहे. कारकीर्दीत यशस्वी ठरलेल्या व्यक्तींचा आदर करायला शिका. तुमचा शाब्दिक वाचाळपणा खूप ऐकून घेतला."

जडेजाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे ट्वीट करण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर 'संजू मंजू' हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

संजय मांजरेकर वर्ल्ड कपसाठीच्या कॉमेंट्री पॅनेलचा भाग आहेत. याआधी टीम इंडियावर टीका केल्याप्रकरणी हर्षा भोगले यांच्यावर टीका झाली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)