वर्ल्ड कप 2019 : नाराज आणि दुर्लक्षित अंबाती रायुडूची अनपेक्षित निवृत्ती

वर्ल्ड कपसाठी पंधरा सदस्यीय संघात स्थान न मिळालेल्या मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने अनपेक्षितपणे निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. इमेलच्या माध्यमातून रायुडूने आपला निर्णय बीसीसीआयला कळवला.

चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कप संघाचा रायुडू भाग होता. 2015 ते 2019 या कालावधीत रायुडूचं प्रदर्शन चांगलं झालं होतं. मात्र वर्ल्ड कपआधीच्या काही मालिकांमध्ये रायुडूची कामगिरी खालावली. आयपीएल स्पर्धेत त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.

रायुडूने 55 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व करताना 47च्या सरासरीने 1694 धावा केल्या आहेत. 124 ही रायुडूची सर्वोच्च वनडे खेळी आहे. वनडे करिअरमध्ये रायुडूने तीन शतकं आणि दहा अर्धशतकं झळकावली आहेत.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 97 मॅचेसमध्ये रायुडूने 45.56च्या सरासरीने 6151 धावा केल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रायुडूच्या नावावर 16 शतकं आणि 34 अर्धशतकं आहेत.

2004 मध्ये रायुडूने भारताच्या U19 संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं.

निवड समितीने रायुडूच्या तुलनेत अष्टपैलू विजय शंकरच्या नावाला पसंती दिली. विजय थ्री डायमेन्शल प्लेयर असल्याचं निवडसमितीने म्हटलं होतं.

या प्रकाराने नाराज रायुडूने 'वर्ल्डकपचा आनंद लुटण्यासाठी थ्रीडी गॉगल्सची ऑर्डर दिली आहे', असं सूचक ट्वीट केलं होतं.

रायुडूने कोणावरही टीका केली नव्हती. कोणाचंही नाव घेतले नव्हतं. मात्र जे म्हणायचं आहे ते सूचक शब्दांत व्यक्त केलं होतं.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड झाली. त्यामध्ये रायुडूचा समावेश नव्हता. पण वर्ल्ड कपसाठीच्या राखीव खेळाडूंमध्ये रायुडूचा समावेश होता. राखीव खेळाडूंमध्ये अंबाती रायुडू, अक्षर पटेल, इशांत शर्मा आणि ऋषभ पंत यांचा समावेश होता.

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर अंबाती रायुडूचं नाव चर्चेत होतं. मात्र निवड समितीने विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतच्या नावाला पसंती दिली.

अष्टपैलू विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर रायुडूला वर्ल्ड कप संघात स्थान मिळेल अशी शक्यता होती. मात्र निवड समितीने एकही वनडे न खेळलेल्या मयांक अगरवालची निवड केली.

यानंतर आईसलँड क्रिकेटने अंबातीला त्यांच्यांकडून खेळण्याची ऑफर दिली होती. या ऑफरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

वर्ल्ड कपसाठी अंबाती रायुडूला वगळल्यानंतर माजी खेळाडू गौतम गंभीरने निवडसमितीवर जोरदार टीका केली होती. "रायुडूला संघाबाहेर ठेवण्याबाबत माजी खेळाडू गौतम गंभीरने परखड शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. ''केवळ तीन डावांत खराब खेळ झाल्याने अंबाती रायुडू वर्ल्डकप संघाच्या बाहेर होणं खूपच दुर्देवी आहे. वनडे क्रिकेटमध्ये 48चं अव्हरेज असणाऱ्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवणं खूपच वाईट आहे. अंबाती फक्त 33 वर्षांचा आहे. अन्य कुणापेक्षाही रायुडूला संघाबाहेर करणं खूपच वेदनादायी आहे. 2007 वर्ल्डकपवेळी मीही अशाच परिस्थितीतून गेलो होतो. निवडसमितीने माझी निवड केली नाही. त्यावेळी किती वाईट वाटतं हे मी समजू शकतो. क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही युवा खेळाडूसाठी वर्ल्डकप संघाचा भाग होणं हेच स्वप्न असतं. त्यामुळेच रायुडूसाठी मला वाईट वाटतं आहे'', अशा शब्दांत गंभीरने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकपनंतर 12 खेळाडू वनडेत चौथ्या क्रमांकावर खेळले आहेत. अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, मनोज तिवारी, विराट कोहली, लोकेश राहुल, केदार जाधव, ऋषभ पंत हे चौथ्या क्रमांकावर खेळले आहेत. यांच्यापैकी रायुडूची कामगिरी सगळ्यात चांगली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर लगेचच सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेतही रायुडूची कामगिरी सर्वसाधारण राहिली आहे. मात्र कोहली-शास्त्री जोडीचा पाठिंबा रायुडूची लंडनवारी पक्की करू शकतो, असं म्हटलं जात होतं.

चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये रायुडू टीम इंडियाचा भाग होता. वर्ल्डकप खेळण्याचा अनुभव रायुडूच्या पारड्यात होता. मात्र यंदा रायुडूची वर्ल्डकपवारी हुकली आहे.

अंबातीने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)