गोव्यातलं असं गाव जे 11 महिने पाण्याखाली असतं...

    • Author, सुप्रिया व्होरा
    • Role, बीबीसी न्यूजसाठी

कुर्डी...गोव्यातलं एक छोटेखानी गाव. पण या गावाचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्यं आहे. वर्षातले 11 महिने हे गाव पाण्याखाली असतं.

जेव्हा पाणी ओसरतं तेव्हा बाहेर स्थायिक झालेले या गावातले लोक एका महिन्यासाठी का होईना आपल्या मूळ गावी येतात. गाव डोळे भरून पाहतात आणि पुन्हा आपापल्या वाटेनं परततात.

कुर्डी हे गाव पश्चिम घाटातल्या दोन टेकड्यांच्या मधोमधं वसलं आहे. या गावातून साळावली नदी वाहते. ही गोव्यातल्या महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे.

एकेकाळी हे गोव्यातलं गजबजलेलं गाव होतं. पण 1986 साली गावकऱ्यांना आपल्या गावातलं हे चैतन्य फार काळ टिकणारं नाही, याची कल्पना आली होती. गोव्यातलं पहिलं धरण याच वर्षी बांधलं गेलं आणि त्याचा परिणाम म्हणून कुर्डी पाण्याखाली गेलं.

पण दरवर्षी मे महिन्यात इथलं पाणी ओसरतं आणि मागे राहिलेल्या खुणा पुन्हा उघड होतात. भेगा पडलेल्या जमिनी, घरांचे-मंदिराचे अवशेष, पाण्याचे मोडके कालवे आणि मैलो न् मैल ओसाड पडलेली जमीन दिसायला लागते.

इथली जमीन खरं तर सुपीक. नारळ, काजू, आंब्याच्या बागा, भातशेतीवरच इथली बहुतांश कुटुंबं अवलंबून होती. कुर्डीची लोकवस्ती साधारणपणे तीन हजारांच्या आसपास होती. हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन अशा तिन्ही धर्मांचे लोक इथं राहत होते. प्रसिद्ध गायिका मोगुबाई कुर्डीकर यांचं हे जन्मगाव.

विकासासाठी कुर्डीचा त्याग

1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून स्वतंत्र झाला आणि कुर्डीचं चित्र हळूहळू बदलायला लागलं. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी गोव्याला भेट दिली आणि राज्यात बांधल्या जाणाऱ्या पहिल्या धरणाबद्दल सांगितलं. या धरणामुळं दक्षिण गोव्याला कसा फायदा होईल, याची माहिती दिली.

"धरणामुळं आमचं गाव पाण्याखाली जाईल, याची कल्पना त्यांनी आम्हाला दिली होती. मात्र आमच्या त्यागामुळे इतरांसाठी फायदेशीर ठरेल, असंही त्यांनी आम्हाला म्हटलं," 75 वर्षांचे गजानन कुर्डीकर सांगत होते. त्यांना मुख्यमंत्र्यांनी गावाला दिलेली भेट अंधुक आठवत होती.

कुर्डीकरांप्रमाणेच गावातील 600 कुटुंबांवर आसपासच्या गावांमध्ये जाऊन स्थायिक होण्याची वेळ आली. त्यांना जमीन आणि नुकसान भरपाई मात्र दिली गेली.

साळावली नदीवरचा हा प्रकल्प अतिशय महत्त्वाकांक्षी होता. साळावली जलसिंचन प्रकल्प असं त्याचं नामकरण करण्यात आलं होतं. या प्रकल्पामुळं पिण्यासाठी, सिंचनासाठी तसंच उद्योगधंद्यासाठी पाणी उपलब्ध होईल, असं आश्वासन दिलं गेलं.

कुर्डीकरांच्या आठवणी

"आम्ही कुर्डी सोडून आलो, तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं," इनाशिओ रॉड्रिगेज सांगत होते. 1982 साली कुर्डीमधून पहिल्यांदा बाहेर पडलेल्या मोजक्या कुटुंबीयांपैकी ते एक होते. स्वतःचं घर बांधून होईपर्यंत त्यांना सरकारनं दिलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यात राहावं लागलं. घर बांधण्यासाठी त्यांना जवळपास पाच वर्षं लागली.

गुरुचरण कुर्डीकर यांच्या कुटुंबीयांनी जेव्हा गाव सोडलं तेव्हा ते अवघे दहा वर्षांचे होते.

"सामान न्यायला आलेल्या ट्रकमध्ये आई-वडील गडबडीनं गोष्टी ठेवत असल्याचं मला आठवतंय. भाऊ आणि आजीसोबत मलाही ट्रकमध्येच बसवण्यात आलं. माझे आई-वडील स्कूटरवरून आले," अशी आठवण कुर्डीकर यांनी सांगितली.

त्यांच्या आई, ममता कुर्डीकर यांना मात्र तो दिवस अगदी स्पष्ट आठवतोय. "अगदी शेवटपर्यंत जी काही मोजकी कुटुंब उरली होती, त्यांच्यापैकी आम्ही एक होतो. आम्ही निघालो त्याच्या आदल्या रात्री खूप पाऊस पडत होता. आमच्या घरात पाणी शिरायला सुरूवात झाली होती. आम्हाला तातडीनं घर सोडायचं होत. सोबत पीठ घेऊनही निघता आलं नाही."

पण कुर्डीमधल्या लोकांना ज्या गावांमध्ये हलविण्यात आलं होतं, त्या गावांपर्यंत धरणाचं पाणी कधी पोहोचलंच नाही.

"दक्षिण गोव्यातील घराघरांत नळ येईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र तसं काही झालं नाही. आम्हाला धरणातून कधीच पिण्याचं पाणी कधीच मिळालं नाही," अशी आठवण गजानन कुर्डीकर यांनी सांगितली.

धरणाचं पाणी पोहोचलंच नाही

कुर्डीकर आता वेडेम या भागात राहतात. तिथे दोन मोठ्या विहिरी आहेत. मात्र एप्रिल आणि मे महिन्यात या विहिरी आटतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना टँकरसाठी अवलंबून रहावं लागतं.

जेव्हा पाणी मे महिन्यात कमी व्हायला लागतं तेव्हा कुर्डी गावातले लोक त्यांच्या घरी जातात.

इथला ख्रिश्चन समुदाय सणासाठी चॅपलमध्ये गोळा होतो आणि हिंदू लोक या महिन्यात मंदिरात जेवण ठेवतात.

गोव्यातील समाजशास्त्रज्ञ वर्षा फर्नांडिस सांगतात, "आता सामान बांधून तिथे जाणं अगदी सोपं झालं आहे."

"मात्र कुर्डी गावातल्या लोकांसाठी त्यांची ओळख त्यांची भूमीच आहे. त्या भूमीशी त्यांचे ऋणानुबंध होते. म्हणूनच कदाचित त्यांना ती स्पष्टपणे आठवते आणि ते वारंवार तिथे परत येतात."

(सुप्रिया वोहरा या गोव्यामधील स्वतंत्र पत्रकार आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)