राधाकृष्ण विखे पाटील: काँग्रेस पक्ष सोडून गेले तर पक्षावर काय परिणाम होईल?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

काँग्रेसमध्ये सध्या काय चाललंय याची मला कल्पना नाही. कारण काँग्रेस पक्षाशी माझा आता काहीही संबंध नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मुलगा सुजय विखे पाटील यांच्यापाठोपाठ तेही भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सध्या सुरू आहेच. त्यातच त्यांनी मंगळवारी जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला वेग आला आहे.

"विखे पाटील यांची सदिच्छा भेट होती. मात्र ते भाजपमध्ये येतील याबाबत त्यांनी स्वत:च सांगितलंय. तसंच त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील," असं या भेटीनंतर महाजन यांनी ABP माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

तर विखे पाटील यांनी या भेटीविषयी सांगताना म्हटलं की, "मी कुठली गोष्ट अंधारात करणार नाही. मी प्रवेश करणार आणि तुम्हाला सांगून करणार. मी सुजयच्या विजयानंतर गिरीश महाजनांचे आभार मानायला आलो होतो."

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप पक्षातील प्रवेशाविषयी आम्ही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना विचारलं. पण सध्या या विषयावर बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काँग्रेसवर काय परिणाम?

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे राज्यातील काँग्रेससमोर आव्हान उभं राहिलं, असं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात. त्यांच्या मते, "विखे पाटील भाजपमध्ये जाणार हे लोकसभा निकालाच्या दिवशीच स्पष्ट झालं होतं. कारण विखेंच्या नगरमध्ये भाजपला विजय मिळाला आहे. आता फक्त ते आज जाणार की उद्या की नंतर कधी हे स्पष्ट व्हायचं बाकी आहे.

"पण विखे भाजपमध्ये जाताना एकटे जाणार नाहीत, त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार घेऊन ते भाजपमध्ये जातील. हे आमदार काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. या अशा ठिकाणी काँग्रेसला नवीन उमेदवार शोधणं आणि तो विजयी होणं, आव्हानात्मक असणार आहे. राज्यातील काँग्रेसची स्थिती दयनीय असताना विखे यांनी भाजपमध्ये जाणं काँग्रेससाठी खेदाची बाब आहे," ते पुढे सांगतात.

एबीपी माझाच्या बातमीनुसार, मराठवाड्यातून एक आमदार, पश्चिम महाराष्ट्रातून एक आमदार, मुंबईतून एक आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत आहेत. कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार हे आमदार विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. आणखी दोन आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहेत.

राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या मते, "राधाकृष्ण विखे पाटील हे फार काही प्रभावी नेते नाहीत. पण ते ज्या भागातून येतात त्या अहमदनगर आणि शिर्डीमध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा झाला आहे. विखेंच्या भूमिकेमुळे तिथं काँग्रेस संपल्यात जमा आहे.

"विखेंच्या भाजपमध्ये जाण्यानं काँग्रेसच्या इमेजवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार आहेत. विखेंना भाजपकडून कृषी मंत्रिपद दिलं जाईल, अशी चर्चा आहे."

"राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्षात नेतेही उरणार नाहीत. कारण अशोक चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. सुशील कुमार शिंदेही निवडणूक हरले आहेत. नारायण राणे यांनी काँग्रेस सोडलं आहे.

"आता फक्त बाळासाहेब थोरात हा एकमेव चेहरा काँग्रेसकडे आहे. पण लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या भागात भाजपनं विजय मिळवल्यानं त्यांच्यासमोरही आव्हान उभं राहिलं आहे," असं ते पुढे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)