लोकसभा निकाल: ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेची गरज नाही' - विश्लेषण

भारताच्या 17व्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एकट्या भाजपला या निवडणुकीत 300हून अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर काही प्रश्नांवर सर्वत्र चर्चा होणं स्वाभाविक आहे -

नरेंद्र मोदींच्या या विजयाचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल? मोदींसमोर पुढची 5 वर्षं काय आव्हानं असतील? आणि काँग्रेसने यापुढे काय करावं?

आम्हीही याच प्रश्नांना घेऊन शुक्रवारी बीबीसी मराठीवर एक विशेष चर्चा घडवून आणली. यात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर, पत्रकार स्मृती कोप्पीकर आणि जयदीप हर्डीकर तसंच बीबीसी इंडियाचे डिजिटल संपादक मिलिंद खांडेकर यांच्याशी संवाद साधला बीबीसी मराठीच्या विनायक गायकवाड यांनी.

याच चर्चतेून वरील प्रश्नांची ही काही उत्तरं समोर आली.

विधानसभा निवडणुकांवर परिणाम काय परिणाम होणार?

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सांगतात, "भाजपच्या जागा इतक्या वाढल्या आहेत की शिवसनेला महत्त्व द्यायची त्यांना गरज वाटणार नाही. यामुळे शिवसेनेला आता जे काही ताटात पडेल ते स्वीकारण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

"याशिवाय मराठी मतांच्या टक्क्याचा राज ठाकरे किती फायदा उचलतील, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. कारण शिवसेनेला बसणारा फटका हा राज ठाकरेंना फायद्याचा ठरणार आहे. याशिवाय वंचित बहुमत आघाडीला इतकी मतं मिळवायची होती की राज्यात त्यांना स्वतंत्र पक्षाचा दर्जा मिळेल. त्यामुळे आता या पक्षाच्या भूमिकेवर विधानसभेची गणितंही अवलंबून असतील," असंही निरीक्षण ते करतात.

राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्या मते, "आता ज्या प्रकारचं बहुमत भाजपला मिळालं आहे ते पाहिलं तर भाजपला विधानसभेच्या काळातच नाही तर इथून पुढच्या काळात शिवसनेची गरज संपलेली आहे. हे शिवसेना, जनता दल युनायटेड या सगळ्या घटक पक्षांना लागू होतं.

"भाजपला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि बिहार पादाक्रांत करायचे असतील तर प्रादेशिक मित्र खच्ची झाले पाहिजे, अशी भाजपची व्यूहरचना आहे. आणि त्याची पहिली टेस्ट महाराष्ट्र विधानसभेच्या वेळी लागेल. एकतर भाजप शिवसेनेला बाजूला ठेवेल, अन्यथा भाजपच्या अटींवर सेनेला निवडणूक लढवावी लागेल."

मोदींना हे यश का मिळालं?

मोदींना मिळालेल्या यशाचं विश्लेषण करताना पळशीकर सांगतात, "मतदारांना मोदींबद्दल जो विश्वास होता आणि मोदी काहीतरी करू शकतात, हा विश्वास होता. यामधून मग जी भाजपची पारंपरिक मतपेढी नाही, त्याऐवजी कितीतरी मतं भाजपला मिळाली आहे. भाजपनं 3 वर्षांपूर्वी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यासाठी संघटनेवर भर देण्यात आला, त्या संघटनात्मक ताकदीचा मोदींच्या विजयात फार मोठा वाटा आहे.

"दुसरं म्हणजे UPAच्या तुलनेत भाजपनं दावा केला की, आमच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचताहेत. हे काही प्रमाणात का होईना लोकांना पटलं. त्यामुळे मोदींचं नेतृत्व हा या यशातील सगळ्यांत मोठा घटक आहे," ते पुढे सांगतात.

गिरीश कुबेर यांच्या मते, "भारतीय मानसिकतेला पौरुषत्वाचा आविष्कार दाखवणारा नेता नेहमीच आवडत आला आहे. त्यामुळे मोदींचं गारूड आहे. मोदींनी योजना यशस्वी झाल्यात, हे लोकांना निवडणुकीच्या तोंडावर पटवून दाखवलं. तिसरं म्हणजे मी चांगला असताना माझ्यासमोर तितक्या जवळपास जाणारा कुणीही नाही, याची त्यांनी उत्तम पेरणी लोकांच्या मनात केली. या तीन गोष्टींमुळे भाजपला यश मिळालं असं म्हणता येईल."

ज्येष्ठ पत्रकार स्मृती कोप्पीकर यांच्या मते, "2014मध्ये मोदी सत्तेत आले तेव्हा त्यांनी विकासाचा मुद्दा घेतला होता. पण नरेंद्र मोदी आणि भाजप या निवडणुकीत विकासाबदद्ल बोलले नाही. विकासाच्या बेसिसवर त्यांनी मतं मागितली नाही.

"सगळा प्रचार भावनिक मुद्द्यांवर होता. आणि लोकांनी त्यांना मतं दिली. याशिवाय काही योजना त्यांनी काही लोकांपर्यंत तरी पोहोचवल्या. त्यामुळे काही प्रमाणात योजना, काही प्रमाणात राष्ट्रवाद या गोष्टी या विजयामागे आहेत."

मोदींसमोरची आव्हानं काय?

मोदींसमोरील आव्हानांविषयी बीबीसी भारतीय भाषांचे डिजिटल एडिटर मिलिंद खांडेकर सांगतात, "या नवीन टर्ममध्ये मोदींचं नवीन रूप पाहायला मिळेल, असं मला वाटत नाही. कारण मी 2002पासून त्यांचं राजकारण पाहात आलोय. 2014 ते 2019चे मोदी फार नम्र मोदी आहेत.

"गोहत्या करणारे लोक गुंड आहेत, असं मोदींनी सार्वजनिकरीत्या म्हटलं, पण पक्षाची भूमिका वेगळी होती. त्यामुळे गेल्या 5 वर्षांत मोदींचा पाहायला मिळालेला मुखवटा वेगळा आहे, आणि जेव्हा ते प्रचाराला जातात तेव्हा त्यांचा वेगळाच म्हणजे खरा मुखवटा समोर येतो.

"याशिवाय मोदी आणि संघाला देशात जो सांस्कृतिक अजेंडा वाढवायचा आहे, तो आणखी जोरात वाढेल, यात काही शंका नाही," असं खांडेकर यांना वाटतं.

"मोदी आणि शहा यावेळेला अधिक आक्रमक होतील कारण मजबूत विरोधी पक्ष याही वेळेस नाहीयेत," असं मत पत्रकार जयदीप हर्डीकर यांचं होतं.

"मोदींच्या व्यक्तिमत्व अशाप्रकारच्या आक्रमकतेमधून घडलेलं आहे, कठोरतेतून घडलेलं आहे. त्यामुळे मोदी मवाळ होतील, असं म्हणणं व्यर्थ आहे," असं सुहास पळशीकर सांगतात.

गिरीश कुबेर यांच्या मते, "मोदींसमोरील सगळी आव्हानं आर्थिक आहेत. मोदी सरकारची 5 वर्षं पाहिली तर यांच्या सरकारला आर्थिक दिशाच नाही, असं 100 टक्के म्हणता येऊ शकतं, ते पुढे सांगतात."

काँग्रेसकडे खंबीर नेतृत्वाचा अभाव?

काँग्रेसच्या पक्षबांधणीकडे लक्ष वेधत जयदीप हर्डीकर सांगतात, "देशात यंदा 11 ते 12 लाख पोलिंग बूथ होते. या सर्व ठिकाणी राहुल गांधी एकटे जाऊ शकत नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांची गरज असते.

"तुम्ही कशासाठी आणि कुणासाठी राजकारण करत आहात, यावर काँग्रेसनं विचार करणं गरजेचं आहे. कारण त्याची वेळ आली आहे. काँग्रेसकडे तशी संधी आहे. त्यांनी कार्यक्रम, संघटना आणि धोरण यांना नव्याने परिभाषित करावं लागणार आहे."

मिलिंद खांडेकर यांच्या मते, "काँग्रेस म्हणतं आम्ही सेक्युलर आहोत. पण ते मंदिरात जाताना दिसून येतात. त्यामुळे आपण भाजपपेक्षा कसे वेगळे आहोत, हे काँग्रेसच्या लोकांना स्पष्टपणे पटवून द्यावं लागणार आहे."

हिंदुत्वाचा मुद्दा भारतीय राजकारणात सामान्य झाला आहे का, याविषयी सुहास पळशीकर सांगतात, "हिंदू राष्ट्रवादाची भारतात सुरुवात होऊन 100 वर्षं झाली आहे. आज अशी परिस्थिती आली आहे की जर या देशात हिंदू बहुसंख्य असतील तर त्यांचं राज्य असण्यात काय वाईट आहे, असा भोळाभाबडा प्रश्न विचारला जातो. त्यातून हिंदुत्वाची राजकारण सामान्य झालंय. लालकृष्ण आडवाणींनी या गोष्टींची सुरुवात केली होती आणि गेल्या 30 वर्षांपासून हे हिंदुत्वाचं राजकारण यशस्वी ठरताना दिसून येत आहे."

(शब्दांकन - श्रीकांत बंगाळे)

पाहा बीबीसी मराठीचं निवडणूक निकालांचं दिवसभर चाललेलं विशेष कव्हरेज -

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)