You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फणी: ओडिशात चक्रीवादळाशी झुंज देणाऱ्या मराठी IAS अधिकाऱ्यांची गोष्ट
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
फणी चक्रीवादळाने थैमान घातल्यानंतर ओडिशा राज्य प्रशासन सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देतंय. ओडिशामध्ये विविध भारतीय सेवेत साधारण 30-35 मराठी अधिकारी ही परिस्थिती कशी हाताळत आहेत?
ओडिशाला वादळं नवीन नाहीत. याआधीही किनारपट्टी असलेल्या या राज्याला फायलिन, तितलीसारख्या चक्रीवादळांचा तडाखा बसला आहे. या संकटाचा सामना करण्याची जबाबदारी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांवर असते.
ओडिशामध्ये रुजू झालेल्या मराठी अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वनसेवा अशा विविध सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या अंदाजे 30-35 आहे, असं ओडिशाचे एक IAS अधिकारी सांगतात.
ओडिशात जेव्हा चक्रीवादळ येतं तेव्हा मोठ्या प्रमाणात लोकांना तिथून सुरक्षितस्थळी हलवावं लागतं. तेव्हा स्थानिकांशी त्यांच्याच भाषेत संपर्क साधणं, हे आव्हान या अधिकाऱ्यांसमोर असतं.
भाषेबरोबरच सांस्कृतिक भिन्नता हा देखील मुद्दा आहे. मग अशा अडचणींवर मात करून हे अधिकारी नेमकं कसं काम करत आहेत?
एक मराठी अधिकारी म्हणून ओडिशात काम करताना कसं वाटतं, या प्रश्नाचं उत्तर देताना केओन्झारचे जिल्हाधिकारी आशिष ठाकरे सांगतात की "आम्ही भारतीय सेवेचे अधिकारी आहोत. त्यामुळे आमचं प्रशिक्षणच असं असतं की आम्ही ज्या ठिकाणी जातो तिथलेच बनतो. ओडिशात आल्यावर मी इथली भाषा शिकलो आणि इथली संस्कृती समजून घेतली."
"इथले लोकही मनमिळाऊ आहेत. त्यांनीदेखील आम्हाला स्वीकारलं. बाहेरच्या राज्यातून येऊन आम्ही काम करत आहोत, याचं लोकांना विशेष कौतुक वाटतं. 'आपलं घर सोडून, या ठिकाणी राहून हे लोक काम करत आहेत,' अशी भावना स्थानिकांमध्ये असते. त्यामुळे ते आमचा आदर करतात."
ओडिशाने कशी केली तयारी?
1999 मध्ये ओडिशात महाभयंकर चक्रीवादळ आलं होतं. त्या चक्रीवादळात 10,000 हून अधिक लोकांचे प्राण गेले होते. या घटनेपासून धडा घेऊन ओडिशाने योग्य पावलं उचलली आणि सध्या पूर असो वा चक्रीवादळ, त्यामध्ये मृतांची संख्या अत्यंत कमी आहे. हा आकडा शून्यवर नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.
20 वर्षांमध्ये हा फरक कसा पडला?
याबद्दल सांगताना ठाकरे सांगतात, "प्रत्येक वादळ किंवा घटना ही वेगळी असते. सद्यस्थितीबाबत सांगायचं झालं तर ओडिशाची कोणत्याही नैसर्गिक संकटावर मात करण्याची तयारी आहे. सरकारने IIT खरगपूरकडून 800 शिबिरांची स्थापना केली आहे."
"नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सध्या ओडिशात सशक्त प्रणाली कार्यरत आहे. अधिकाऱ्यांपासून ते स्वयंसेवकांपर्यंत सर्वांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यानुसार प्रत्येक जण काम करतो. या शिबिरात 500 ते 600 लोक राहू शकतात. त्याच ठिकाणी त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था केली जाते," ठाकरे सांगतात.
1999ला चक्रीवादळ आल्यानंतर ओडिशा राज्याने Odisha State Disaster Management Authorityची स्थापना केली. त्यानंतर अवघ्या 6 वर्षांनी राज्याने डिजास्टर मॅनेजमेंट अॅक्ट मंजूर केला.
'गरोदर महिलांची विशेष काळजी घेतली जाते'
चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर कसं काम चालतं, याबाबत ठाकरे सांगतात, "2013 साली माझं पोस्टिंग गंजाम येथे होतं. आम्हाला फायलीन वादळाची सूचना मिळाल्यानंतर आम्ही 24 तासांमध्ये साडेपाच लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. काहींना आम्ही आश्रयस्थळांमध्ये हलवलं तर काही ठिकाणी शाळांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था केली.
ते सांगतात की असं प्रत्येक शिबिर हे स्वयंपूर्ण असतं. तिथं मेडिकल किट, खाण्याची व्यवस्था असते, जनरेटरचीही सोय असते.
लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर आणि त्यांची व्यवस्था लावून दिल्यानंतर दुसरं काम असतं ते म्हणजे मार्ग मोकळा करणे. वादळानंतर झाडं पडतात. ती हलवावी लागतात.
ठाकरे सांगतात, "वादळाचा सामना करण्यासाठी एक परिपूर्ण प्रणाली ओडिशात कार्यरत आहे. किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पुरेसे शेल्टर्स आहेत, याची खात्री करून घेतली जाते. आमची SOP (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) तयार झालेली आहे.
"प्रत्येक वादळ हे नवं आव्हान घेऊन येतं त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. सर्वांत महत्त्वाची बाब असते ती म्हणजे नागरिकांचा जीव वाचवणं, त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं आणि त्यांची व्यवस्थितरीत्या काळजी घेणं. त्याच बरोबर गुरांना देखील सुरक्षित स्थळी हलवलं जातं."
"गरोदर महिलांची योग्य काळजी घेतली जाते. राज्यात 'ममता' नावाची योजना कार्यरत आहे. या योजनेनुसार राज्यातल्या गरोदर महिलांची माहिती आमच्याकडे असते. त्यानुसार या महिलांनी रुग्णालयात आधीच हलवलं जातं. फायलीनच्या वेळी 76 महिलांना रुग्णालयात पोहोचवण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांची सुरक्षितपणे डिलेव्हरी झाली होती," ठाकरे सांगतात.
लोकांचा सहभाग महत्त्वाचा
गेल्या 72 तासांमध्ये गंजाम जिल्हा प्रशासनाने तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे, असं गंजामचे जिल्हाधिकारी विजय कुलंगे सांगतात.
"आपत्ती निवारण ही कधीच एकाच अंगाने नसते. समाजातील सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. अधिकाऱ्यांपासून ते तलाठी, ग्रामसेवकापर्यंत सर्वांना प्रशिक्षण दिलं जातं. गावातल्या तरुणांना प्रशिक्षण दिलं जातं. हेच तरुण मग स्वयंसेवक म्हणून काम करतात.
"प्रशासनातर्फे वेळोवेळी मॉक ड्रील्स घेतल्या जातात. त्यामुळे यंत्रणा नेहमी कोणत्याही आव्हानासाठी सज्ज असते," कुलंगे सांगतात.
जेव्हा प्रशासनातील अधिकारी लोकांना घर रिकामं करायला सांगतात तेव्हा लोक आपलं घर सोडायला तयार होतात का, असं विचारलं असता कुलंगे सांगतात, "प्रत्येकाची आपल्या घरासोबत एक अटॅचमेंट असते. सुरुवातीला लोक पटकन घर सोडायला तयार नसतात, पण आता मात्र लोक तयार असतात. त्याचं कारण म्हणजे फायलीन, तितली, हुडहुड या वादळांच्या वेळी प्रशासनाने तत्परतेनं कामं केली.
"त्या कामाच्या अनुभवामुळे लोकांचा प्रशासनावर विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे आमचं काम सोपं झालं आहे, असंच म्हणावं लागेल. स्थानिक तरुण स्वयंसेवक हे लोकांना समजावून सांगण्याचं आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम करत असतात," कुलंगे सांगतात.
"जेव्हा हे लोक पाहतात की हे अधिकारी गेल्या 72 तासांपासून काम करत आहेत तेव्हा त्यांचा विश्वास बसतोच. आमचं फक्त एकच उद्दिष्ट असतं ते म्हणजे झिरो कॅज्युअल्टी आणि आम्ही त्याच दिशेनी काम करतो," असं कुलंगे सांगतात.
आपत्तीच्या काळात सर्वांची काळजी घेणं हे काम प्रशासन करतं, पण अशा परिस्थितीमध्ये सलग 72 तास काम करण्याची ऊर्जा प्रशासकीय अधिकाऱ्यांना कशी मिळते, असं विचारलं असता कुलंगे सांगतात, "लोकांनी आणि संपूर्ण सिस्टिमनं आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, त्यातून आम्हाला ऊर्जा मिळते. जेव्हा तुमच्या हाती खूप मोठ्या समुदायाचं नेतृत्व असतं, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी असते त्यातूनच आमच्यात एक उत्साह निर्माण होतो आणि आम्ही कामाला लागतो."
ओडिशाच्या आपत्ती व्यवस्थापनाचं कौतुक संयुक्त राष्ट्राने केलं आहे. आपत्ती निवारणाच्या क्षेत्रात ओडिशा हे राज्य ग्लोबल लीडर असल्याचं संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. 2015 साली ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा संयुक्त राष्ट्राने सत्कार केला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)