You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फणी चक्रीवादळ : आतापर्यंत 3 लोकांचा मृत्यू, 10 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं
बंगालच्या खाडीकडून आलेलं फणी चक्रीवादळ ओडीशाच्या किनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता धडकलं आहे.
हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकलं तेव्हा त्याच्या वाऱ्याचा वेग ताशी 165 से 175 किलोमीटर एवढा होता.
सकाळी साधारण 10.30 वाजता हे चक्रीवादळ ओडिशाच्या मुख्य भूभागाकडं सरकलं, असं भारतीय हवामान खात्यानं सांगितलं.
हे वादळ उत्तर पूर्व भागाकडे सरकताना काही तासानंतर त्याचा वेग कमी होत गेला आहे.
फणी चक्रीवादळामुळे आतापर्यंत 3 लोकांचा मृत्यू झाल्याचं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं (NDRF) सांगितलं आहे.
या चक्रीवादळामुळे किनाऱ्यालगतच्या 10 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे, असं विशेष मदतकार्य अधिकारी बिश्नुपद सेठी यांनी सांगितलं आहे.
"पूर्व किनाऱ्याला धडकल्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर आणि ईशान्य दिशेला सरकेल. तसंच सध्या त्याचा वेग हा ताशी 130-140 किमी एवढा झाला आहे," असं भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त संचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी बीबीसीला सांगितलं आहे.
हे चक्रीवादळ रात्रभर ओडिशामध्ये राहील तर उद्या सकाळी म्हणजे शनिवारी ते पश्चिम बंगालकडे सरकेल. त्यावेळी त्याचा वेग ताशी 90 ते 100 किमी एवढा राहिल, असं मोहापात्रा म्हणाले.
चक्रीवादळाचा धोका अजूनही कमी झाला नाही. कारण वीजेचे खांब पडण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.
हवामान विभागाने फणी चक्रीवादळाचं केलेल्या योग्य अनुमानाचं मोहापात्रा यांनी कौतूक केलं आहे.
चक्रीवादळाचा धोका सगळ्यात जास्त कुठं आहे?
ओडिशामधल्या उत्तर किनाऱ्यावरचे जिल्हे भद्रक, जलासौर, मयूरभंज, जगतसिंहपूर या ठिकाणी वाऱ्याची गती ताशी 100 ते 130 किमी राहणार आहे. त्याचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. चक्रीवादळ शांत होत नाही तोपर्यंत लोकांनी घराबाहेर येऊ नये असं सांगण्यात आलं आहे.
सावधानतेचा इशारा म्हणून भूवनेश्वर विमानतळ मध्यत्रीपासून बंद करण्यात आला आहे. तसंच ओडिशा सरकारने पूर्व किनाऱ्यावरील दोन महत्त्वाच्या बंदरातलं कामकाज थांबवलं आहे.
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्येही हाय अलर्ट देण्यात आला आहे.
आतापर्यंत 10 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचं अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं आहे. फणीच्या मार्गात असणाऱ्या पुरी शहरात जवळपास एक लाख लोक राहातात. पुरीमध्ये 858 वर्षं जुनं जगन्नाथाचे मंदिर असून त्याचंही नुकसान होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
गेल्या तीन दशकांमध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यावर येणारे हे चौथं चक्रीवादळ आहे.
2017 आली आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे 200 लोकांचे प्राण गेले होते आणि शेकडो लोकांना विस्थापित व्हावं लागलं होतं. तसंच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आलेल्या एका चक्रीवादळामुळे हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं होतं.
कोणत्या परिसराला तडाखा बसेल?
फणी शनिवारी बांगलादेशच्या चितगाँवच्या दिशेने सरकेल. या चक्रीवादळामुळे मोठ्या लाटा आल्यामुळे बांगलादेशात पूरस्थिती येण्याची शक्यताही वर्तवली आहे.
बांगलादेशातील कॉक्स बझार या किनारी शहरामध्ये लाखो रोहिंग्या राहात असून त्यांनाही सावधगिरीचा आदेश देण्यात आला आहे. हे रोहिंग्या बांबू आणि प्लास्टिकच्या झोपड्यांमध्ये राहात आहेत.
थोडं अधिक संरक्षण मिळावं यासाठी चक्रीवादळाचा हंगाम पाहून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस अँड रेड क्रिसेंट सोसायटीने रोहिंग्यांना फेब्रुवारी महिन्यात ताडपत्रीचं वाटप केलं होतं.
कशी केली भारताने तयारी?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 850 आश्रय छावण्या तयार केल्या असून त्यामध्ये 10 लाख लोकांना आश्रय देता येईल. NDRF, तटरक्षक दल, नौदल तैनात करण्यात आलं आहे. विशाखापट्टणम आणि चेन्नईजवळ पाणबुडे आणि डॉक्टरांसह दोन जहाजे सज्ज ठेवण्यात आली आहेत.
किनारी प्रदेशातील 81 रेल्वेगाड्या रद्द केल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे.
या निवडणुकीच्या कालावधीत सरकारी अधिकारी मदतकार्यात भाग घेऊ शकतात, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
गेल्या महिन्याभरापासून देशात मतदान प्रक्रिया सुरू आहे. आता निवडणुकांचा अगदी मधला कार्यकाळ सुरू आहे. मे महिन्यात इतरत्र मतदान होत असलं तरी ओडिशामधील मतदान प्रक्रिया आधीच संपली आहे. मात्र झालेल्या मतदानाच्या मतपेट्या सुरक्षित राहाव्यात, म्हणून स्ट्राँगरूम्सचं संरक्षण वाढवण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)