You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमोल कोल्हे सतत आपल्या भूमिकांमध्येच असतात का? : शिरूर लोकसभा मतदारसंघ
- Author, हलिमाबी कुरेशी
- Role, बीबीसी मराठीसाठी
आधी शिवाजी महाराज आणि नंतर 'स्वराज्यसरक्षक संभाजी'च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते अमोल कोल्हे सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. अमोल कोल्हे पडद्याबाहेरही सतत आपल्या मालिकेतल्या भूमिकांमध्येच असतात, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने होत आहे. पण या आरोपाबद्दल त्यांना काय वाटतं?
"ज्या लोकांना या क्षेत्राची माहिती नाही तेच लोक हे आरोप करू शकतात," असं कोल्हेंनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. "कोणतीही भूमिका पडद्यावर साकारायची असेल तर त्या भूमिकेचा अभ्यास करावा लागतो. त्या व्यक्तिमत्त्वाचे विचार आणि संस्कार अंगीकारावे लागतात. तरच ती भूमिका पडद्यावर जिवंत होऊ शकते.
"ही गोष्ट खरी आहे की शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांच्या संस्कारावरच चालण्याचा माझा प्रयत्न असतो. जर त्यांचे संस्कारच माझ्या कृतीतून विरोधकांना दिसत असतील तर मी विरोधकांचे आभारच मानतो," असं कोल्हे बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले.
या मुलाखतीत त्यांनी मालिका ते राजकारण अशा विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. तसंच जर निवडून आल्यावर कोणती कामं त्यांना करावीशी वाटतील याबाबतही चर्चा केली.
अमोल कोल्हे यांनी प्रचाराला घोडा वापरला होता. काही लोकांचं म्हणणं आहे की हा शूटिंगचा घोडा होता आणि अमोल कोल्हे यांना घोड्याची काय आवश्यकता, असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "हा घोडा शूटिंगचा नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभरात मी अनेक गावांना भेटी देतो. चालताना मी लोकांना दिसणार नाही म्हणून मला घोड्यावर बसून प्रचार करा, असं कार्यकर्त्यांनी सुचवलं त्यामुळे मी घोड्यावर बसलो."
मालिकेतील भूमिकेचा फायदा?
चित्रपट किंवा मालिका म्हटलं की ग्लॅमर आलंच. तेव्हा या ग्लॅमरचा फायदा कोल्हेंना प्रचाराच्या वेळी होत आहे असा आरोप त्यांचे विरोधक करत आहे या आरोपाला उत्तर देताना कोल्हे म्हणाले, मी मालिकांच्या भूमिकांचा वापर करत आहे असं म्हणणं दुर्दैवी आहे.
"मी सुरवातीलाच माझा शिवाजी महाराजांच्या गेटअप मधला फोटो कुठेही, कोणत्याही फ्लेक्सवर लावू नका असं आवाहन केलेलं आहे. मालिका वेगळी, राजकारण वेगळं आहे. भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला पाहायला इतकी गर्दी होत नाही," कोल्हे सांगतात.
बैलगाडी शर्यत सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगताना ते म्हणाले, "बैलगाडी मालकांनी मला पाठिंबा दिला आहे. त्यांनी मला पाठिंबा मालिकेतल्या भूमिकेसाठी नाही तर मी त्यांच्यासाठी जी भूमिका घेतली आहे त्यासाठी दिला आहे. त्यामुळं मला मिळणारा प्रतिसाद विरोधकांसाठी पोटदुखी ठरत असेल तर त्याला मी काय करणार?," असं कोल्हे म्हणाले.
काय काम करणार?
अमोल कोल्हे निवडून आले तर ते सेलिब्रिटी असल्यामुळे सर्वसामान्य मतदारांसाठी उपलब्ध राहातील का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिलं, "स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका संपल्यावर मी अभिनय करणार नाही. लोकांसाठीच पूर्ण वेळ देईन. हा निर्णय मी कुणाच्या टीकेला घाबरून घेतलेला नाही तर पूर्ण विचारानंतर घेतला आहे .
"शिवसेनेचे शिवाजी आढळराव यांना जनतेनं तीनदा निवडून दिलं. त्यांनी केलेली कामं पाहिल्यावर असं लक्षात येतं की जी कामं पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आमदारांकडून केली जाऊ शकतात तीच कामं त्यांनी केली आहेत.
"आळंदी, शिवनेरी, वढू तुळापूर जोडून भक्ती-शक्ती कॉरिडोर निर्माण करू. त्यातून पर्यटनाला चालना मिळेल. पुणे-नगर, सोलापूर-पुणे या रस्त्यावर अपघात होतात त्यासाठी हायवेवर ट्रॉमा केअर सेंटर असावं असं मला वाटतं."
'कुणावरही वैयक्तिक आरोप करणार नाही'
प्रचारादरम्यान कोल्हेंच्या जातीचाही उल्लेख करण्यात आला. त्यावर कोल्हे म्हणाले "मी शिवरायांचा मावळा आहे आणि त्यांचं स्वराज्य हे अठरापगड जातींना एकत्र करूनच निर्माण झालेलं होतं." आपण कुणावरही वैयक्तिक आरोप करणार नाही असंही ते म्हणाले.
शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश का केला? असं विचारलं असता ते म्हणाले "गेल्या पाच वर्षांत बऱ्याचशा गोष्टी बदलल्या त्यामुळे त्या प्रश्नाची चर्चा आता करायची आवश्यकता नाही. शिवसेना पक्षप्रमुखांबद्दल अजूनही मनात आदर आहे."
भीमा कोरेगाव हे गाव शिरूर मतदारसंघात येतं. भीमा कोरेगावबद्दल बोलताना ते म्हणाले की जातीधर्माच्या नावावर फूट पाडली जाते. यात सर्वसामान्य तरुण भरडला जातो. सशक्त निकोप समाज घडवणं गरजेचं आहे असं कोल्हे म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)