राधाकृष्ण विखे-पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत कारण...

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी, अहमदनगर

काँग्रेसचे नेते आणि विधासभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार नाहीत, असा खुलासा त्यांचे पुत्र आणि दक्षिण नगरमधील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगरमध्ये सभा होणार आहे. या सभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अटकळ होती. पण राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे बडे नेते आहेत, ते भाजपमध्ये येणार नाहीत, असा निर्वाळा सुजय यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना दिला.

सुजय म्हणाले, "माझ्या वडिलांचा विरोध हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. निवडणूक वैयक्तिक होत चालली होती. मला वैयक्तिक पातळीवर विरोध सुरू होता. ते लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला. जेवढं शक्य तेवढं वैयक्तिक पातळीवर सहभाग घेत आहेत. पण त्यांचा भाजपशी काही संबंध नाही."

१ एप्रिलला राधाकृष्ण विखे पाटील पहिल्यांदाच बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत मौन सोडलं. या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसमधील नेत्यांवर तोफ डागली. सुजय यांच्या प्रचारात ते उघड उतरल्याचे चित्र अहमदनगरमध्ये आहे. त्यातच अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा निश्चित झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली.

११ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या तयारीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहभाग घेतला. काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये आले असताना राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या स्वागताला उपस्थित होते, त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती.

चर्चा का? 

सुजय विखे-पाटील यांच्या प्रवेशानंतर अहमदनगरमध्ये आघाडीचा प्रचार करणार नाही, अशी जाहीर भूमिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली.

काँग्रेसमध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याचं त्यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना त्यांनी सातत्याने लक्ष्य केलं आहे.

सुजय विखे-पाटील यांच्या विरोधात बंडखोरीची घोषणा करणाऱ्या भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची त्यांनी स्वतः भेट घेतली होती.

'गडबडीत निर्णय नको'

विधानसभा निवडणूक आणि आमदारकीचा राजीनामा यात ६ महिन्यांचा कालावधी असेल तर पोटनिवडणूक लागू शकते. भाजपमध्ये प्रवेश केला तर राधाकृष्ण विखे पाटील यांना पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, असं मत राजकीय क्षेत्रातील जाणकारांचं आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीची कामगिरी कशी होते, हे पाहून ते निर्णय घेऊ शकतील, आताच प्रवेश केला तर घाईगडबडीत घेतलेला निर्णय ठरेल, असा मतप्रवाह विखे पाटील समर्थकांत आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)