लोकसभा निवडणूक : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील स्वाभिमानीचे उमेदवार; संजयकाकांना 'फाईट' देणार का?

    • Author, स्वाती पाटील राजगोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूर

सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली आहे. यानिमित्ताने वसंतदादा पाटील यांच्या घरण्याला बंड पासून रोखण्यास काँग्रेसला यश आलं आहे, शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगलीची जागाही देता आली आहे. सांगलीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी ही लढत होईल.

विशाल पाटील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. त्याचे मोठे भाऊ प्रतीक पाटील काँग्रेसचे दोन वेळा खासदार आणि केंद्रात मंत्री होते. सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची चिन्हं दिसू लागताच काही दिवसांपूर्वीच प्रतीक यांनी काँग्रेसला सोडण्याची घोषणा केली, तसेच विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. वसंतदादांच्या वारसदारांचे बंड शमवण्यासाठी काँग्रेसच्या पातळीवर प्रयत्न सुरू झाले. माजी मंत्री सतेज पाटील यांनी प्रतीक पाटील तसेच राजू शेट्टी यांच्याशी दोन दिवसांपूर्वी चर्चा केली होती. त्यातून हा तोडगा निघाला.

हातकणंगले हा मतदारसंघ यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आला असून तेथून शेट्टी निवडणूक लढवणार आहेत.

तर सांगली हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ पहिल्यांदाच दुसऱ्या पक्षाला जात आहे.

ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे म्हणाले, "पलूस-कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांची जागा सोडली तर जिल्ह्यात काँग्रेसची फारशी चांगली स्थिती नाही. ही निवडणूक काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवली गेली असती तर सांगलीत पुन्हा एकदा पक्ष म्हणून काँग्रेस रुजण्यासाठी संधी मिळाली असती. पण ती संधी आता स्वाभिमानीला मिळाली आहे."

काँग्रेस पक्षाचा जरी तोटा झाला असला तरी विशाल पाटील यांना मोठं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची संधी आहे. काँग्रेस, वसंतदादा गट आणि स्वाभिमानी असं एकत्रितरीत्या विशाल भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण करू शकताता, असं ते सांगतात.

36 वर्षीय विशाल यांची राजकीय कारकिर्द वसंतदादा दूध संघाचे अध्यक्ष म्हणून झाली. त्यांनी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक आहेत.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या मते विशाल पाटील यांनी स्वाभिमानीचं पाठबळ मिळाल्याने सांगलीतील निवडणूक चुरशीची होईल. "स्वाभिमानीला विशाल यांच्या रूपाने स्थानिक उमेदवार मिळाला आहे. विशाल यांची वैयक्तिक ताकद मर्यादित आहे. पण त्यांनी बंड केलं असतं तर वसंतदादा गटाची मते त्यांना मिळून भाजपला लाभ झाला असता. हे आता टळलं आहे."

सांगलीत लक्षवेधी

सांगली जिल्ह्यातील राजकारण वसंतदादा पाटील समर्थक गट आणि त्यांच्या विरोधातील गट अशा दोन प्रवाहांत विभागलेलं आहे. त्याचे पडसाद सगळ्यांचं निवडणुकांत दिसतात. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले संजयकाका पाटील राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार होते. जिल्ह्यातील त्यांची ओळख दिवंगत आर. आर. पाटील यांचे कडवे विरोधक अशी होती.

त्यांनी प्रतीक पाटील यांचा मोठा पराभव करत खासदारकी जिंकली. संजयकाका यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्वतःचा गट तयार केला आहे, ही त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. पण हे करत असताना त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दुखवलं आहे, अशी माहिती सांगलीतील राजकीय क्षेत्रांतील जाणकारांनी दिली.

गुंतागुंतीचे राजकारण

सांगलीतील राजकारणाला बरेच कंगोरे आहेत. सांगलीतील बराच भाग दुष्काळी आहे. पाण्याच प्रश्न सांगलीत नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. सांगलीच्या एकूण राजकारणात मराठा, धनगर आणि जैन समाजाची मतं नेहमीच महत्त्वाची ठरत आली आहेत. त्यांचो मोट बांधून ही मतं आपल्या बाजूला पडतील किंवा त्यात विभागणी कशी होईल, याचं राजकारणही महत्त्वाचं ठरणार आहे, अशी माहिती काँग्रेसशी संबंधित एका जाणकाराने दिली.

जयंत पाटील आणि चंद्रकांतदादा पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जिल्ह्यातील हा मतदारसंघ आहे. जयंत पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्या वारसदारांच्या राजकारणाला मोठा विरोध केला होता, हा इतिहास आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी अंतर्गत राजकारणात एकेकाळी संजयकाका पाटील त्यांच्या जवळचे मानले जात होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे गटतट सोबत घेणं हे विशाल पाटील यांच्या समोरील आव्हान असणार आहे.

तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा असणार आहे. हे दोन्ही नेते या मतदारसंघात काय पेरणी करतात, यावर बरंचस चित्र अवलंबून असेल, असा सूर जिल्ह्यात आहे.

"संजयकाका यांच्या विरोधात नाराजीचा सूर होता, पण त्यांच्या व्यतिरिक्त निवडून येईल असा उमेदवार भाजपकडे नव्हता. संजय पाटील यांना उमेदवारी दिली नसती तर त्यांनी बंडखोरी केली असती, ही भाजपला उमेदवारी दिली आहे," अशी माहिती सांगलीतील पत्रकार शिवराज काटकर यांनी दिली.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)