'सांगलीचा निर्णय प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांना विश्वासात घेऊनच होणार'

    • Author, स्वाती पाटील-राजगोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूर

माजी मंत्री प्रतीक पाटील आणि त्यांचे बंधू विशाल यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसच्या पातळीवर सुरू झाले आहेत.

सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याच्या मुद्द्यावरून सांगली काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यातूनच प्रतीक पाटील यांनी काँग्रेस सोडण्याची घोषणा दोनच दिवसांपूर्वी केली. तर विशाल यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे मातब्बर नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक आणि विशाल यांनी काँग्रेसपासून फारकत घेणं, काँग्रेससाठी नामुष्की ठरेल, असं पक्षातील नेत्यांना वाटतं. यातूनच त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.

सतेज पाटील यांनी मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. इचलकरंजीत ही बैठक झाली.

यासंदर्भात सतेज पाटील यांनी बीबीसीला सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, "सांगलीतील निर्णय प्रतीक पाटील यांना विश्वासात घेऊनच होईल. यासाठी दोन दिवसांची मुदत द्यावी, अशी विनंती आम्ही शेट्टी यांच्याकडे केली आहे."

सतेज पाटील म्हणाले, "पक्षश्रेष्ठींनी हातकणंगले आणि सांगली या दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा या निर्णयाबाबत सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा करणार आहोत."

लोकशाहीत भावना व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेऊ, असं ते म्हणाले.

सांगलीत काँग्रेसची ताकद मोठी आहे ही ताकद घेऊनच निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

त्यांची सविस्तर मुलाखत तुम्ही इथं पाहू शकता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)