You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमोल कोल्हे यांचा शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश, 'शरद पवार यांच्याबरोबर अखंडपणे काम करणार'
शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत आज राष्ट्रवादीचं 'घड्याळ' हाती बांधलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा दोन्ही भूमिका साकाणारे कोल्हे आज घराघरात पोहोचलेले आहेत.
मुंबईमध्ये पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये डॉ. अमोल कोल्हेंच्या पक्ष प्रवेशाची घोषणा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार तसंच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
"आज देशाच्या राजकारणात फार मोठी अस्वस्थता आहे. तरुणाईला योग्य दिशेची गरज आहे. ही जाणीव शरद पवारांसारख्या नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करावे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे," अशी भावना डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. कोल्हे यांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवाजी महाराजांच्या विचाराचं बोट धरून चालणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी शिवसेना प्रवेशावेळी दिली होती.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या पक्ष प्रवेशावेळी बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं, की "डॉ. कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज कसे होते, हे मांडलं. त्यांच्या प्रवेशामुळं पक्षाला मोठा फायदा होईल."
"शिवसेनेचे सुसंस्कृत नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करायला मिळाले. आणि आता शरद पवारांसोबत काम करणार आहे," असं ते म्हणाले.
"लहानपणी मी शरद पवार साहेबांची छबी बघण्यासाठी त्यांच्या गाडीमागे धावायचो. परंतु. आज त्यांच्याच पक्षाचं काम करायला मिळत आहे. यापुढे पक्षाचे काम अखंडपणे सुरू राहणार आहे," असे पुढे म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांचं पक्षात स्वागत करताना त्यांना पक्षाचं चिन्ह 'घड्याळ' आणि मफलर भेट म्हणून दिले.
बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण, नंदुरबार भाजपचे नेते यश पाटील, किशोर पाटील, भाजप डॉक्टर सेलचे हर्षल पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)