You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा - अमोल कोल्हे #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा-अमोल कोल्हे
"माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा आहे," असं अभिनेते अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
छत्रपतींचा मावळा हीच माझी जात आहे, असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे. ते जुन्नरच्या दौऱ्यावर असताना बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नाही, तर मावळा म्हणून निवडणुकांच्या मैदानात उतरवत आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी केलं होतं. त्यावर उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी माझी जात विचारू नका मी शिवरायांचा मावळा आहे, असं म्हटलं आहे.
"सर्जिकल स्ट्राईक नेमका कधी झाला, ते माहित नाही पण पेट्रोल डिझेलची दरवाढ मात्र नक्की झाली," असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे.
अभिनेते अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
2. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव
सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार झाला असून विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
सोलापूर विद्यापीठाचं नाव आता 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर' असं करण्यात आलं आहे.
मात्र, त्यामुळे विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचं नाव देण्याचा विषय मागे पडला आहे. यासाठी शिव विरशैव संघटनेने राज्यभरात आंदोलन छेडलं होतं.
3. नांदेड, बारामती, माढासह 22 जागा द्या - वंचित बहुजन आघाडी
"भारिपने ज्या 22 जागा जाहीर केल्यात, त्या 22 जागा हव्यात," असं वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी म्हटलं आहे. टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
"भारिपने ज्या 22 जागा जाहीर केल्यात, त्या 22 जागा हव्यात. त्यात मागेपुढे होऊ शकतं, पण आम्हाला जास्तीत जास्त जागा हव्यात. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट होईल का माहित नाही. पण वंचित बहुजन आघाडीची जास्तीत जास्त जागांची मागणी आहे," असं वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीनंतर म्हटलं आहे.
"भारिपने मागितलेल्या 22 जागांमध्ये नांदेड, बारामती आणि माढा यांचाही समावेश आहे. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याची आमची मनापासून इच्छा आहे. त्यांना अजूनही विनंती करु. त्यांनी या तीन जागा मागितल्या आहेत, याचा अर्थ ते चर्चा करायला तयार आहेत. पक्षश्रेष्ठी ठरवतील की मोदी लाटेतही निवडून आलेल्या जागा सोडायच्या किंवा नाहीत," असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
4. 20 पैकी 15 प्रदूषित शहरं भारतात
जगभरातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांपैकी 15 शहरं भारतात असून गुरुग्राम, गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा आणि भिवाडी ही शहरं पहिल्या 6 प्रदूषित शहरांमध्ये आहेत. या यादीत दिल्ली ११व्या स्थानी आहे. तर राष्ट्रीय राजधानी परिसर (एनसीआर) हा जगभरातील सर्वाधिक प्रदूषित विभाग ठरला आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
ग्रीनपीस या पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनेच्या सहकार्यानं तयार करण्यात आलेल्या 'आयक्यूएअर एअर व्हिज्युअल २०१८ वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट'मध्ये ही बाब उघड झाली आहे. सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशातील ३ शहरांचाही समावेश आहे
5. IND vs AUS 2nd ODI : भारताचा 8 धावांनी विजय
भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 8 धावांनी मात केली आहे, टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारतानं 250 धावांपर्यंत मजल मारली.
त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाजवळ पोहोचला होता. मात्र शेवटच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज असताना विजय शंकरने दोन विकेट्स काढत ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांवर संपुष्टात आणला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)