लोकसभा निवडणूक 2019 : शिवसेना-भाजपने लातूर, उस्मानाबादच्या विद्यमान खासदारांचं तिकीट का कापलं?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षानं 22 मार्चला लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये राज्यातल्या 16 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. या यादीतील 14 जण हे विद्यमान खासदार आहेत. लातूरचे विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना मात्र भाजपनं तिकीट नाकारलं आहे. त्यांच्याऐवजी भाजपनं लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. तर शिवसेनेनंही उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं आहे.

सुनील गायकवाड यांना उमेदवारी नाही, कारण...

"गेल्या 5 वर्षांत गायकवाड यांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याशी त्यांचं पटलं नाही. पक्षांतर्गत मतभेद त्यांना भोवले आहेत. उमेदवारीसंदर्भात संभाजी निलंगेकर यांनी वजन वापरलं आणि त्यांच्याजवळच्या सुधाकर शृंगारे यांना तिकीट मिळवून दिलं," असं लातूरमधील ज्येष्ठ पत्रकार हरी तुगावकर सांगतात.

"काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबादमध्ये बैठक घेतली होती. त्यावेळी भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्यानं सुनील गायकवाड यांना तिकीट द्यावं, अशी भूमिका घेतली नाही. गायकवाड यांचे स्थानिक पातळीवर नीट संबंध नव्हते. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांचं व्यवस्थित समीकरण नव्हतं. यामुळे त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली," असं स्थानिक पत्रकार प्रदीप नणंदकर सांगतात.

"गायकवाड यांची संसदेतील उपस्थिती चांगली होती. त्यांनी जिल्ह्यातील छोटे-छोटे प्रश्न संसंदेत मांडले. पण स्थानिक नेत्यांशी त्यांचं जमलं नाही. याशिवाय त्यांनी स्वत:चा गटही स्थानिक पातळीवर तयार केला नाही, याचाही फटका त्यांना बसला," असं लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अशोक चिंचोले सांगतात.

सुनील गायकवाड काय म्हणतात?

"माझी संसदेतील कामगिरी खूप चांगली आहे, पण कामगिरीच्या आधारे तिकीट देण्यात आलेलं नाही. आमच्या जिल्ह्यात एक व्यक्ती म्हणजे एक पक्ष असं झालं आहे. पण मला वाटतं की, एखादा पक्ष जर व्यक्तिकेंद्रित झाला तर त्या पक्षाला काही अस्तित्व राहील किंवा तो टिकेल असं मला वाटत नाही," तिकीट नाकारण्यात आल्याबद्दल गायकवाड सांगतात.

"मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणात आलो. भाजप हाच माझा गट असं मी समजत आलो. परंतु स्थानिक पातळीवर गट-तट निर्माण केले नाही, हे माझं चुकलंच. मी गटबाजी केली नाही. 2009ला भाजपच जिल्ह्यातील अस्तित्व शून्य होतं. पण 2014ला मी खासदार झाल्यानंतर जिल्हा भाजपमय झाला," असं ते सांगतात.

तुमची पुढची भूमिका काय, यावर ते सांगतात, "मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करणार आहे. कामाच्या आधारावर तिकीट मिळेल असं मला वाटलं होतं, पण तसं झालं नाही."

"राखीव मतदारसंघातल्या उमेदवाराचे तिकीट का कापतात, हा माझा प्रश्न आहे. ओपन मतदारसंघात 3 लाखानं जरी पराभव झाला असला तरी तोच उमेदवार रीपिट असतो, पण राखीव मतदारसंघातला उमेदवार 3 लाखानं जिंकला असला तरी त्यांचं तिकीट कटतं, असं का होतं," असा प्रश्न ते उपस्थित करतात.

सुधाकर शृंगारे कोण आहेत?

"लातूर जिल्ह्यातील सुधाकर शृंगारे कंत्राटदार आहेत. त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालं आहे. त्यानंतर त्यांनी बीएससीचं शिक्षण मध्येच सोडून ते मुंबईला गेले. काही कालावधीनंतर त्यांनी लातूरला परत येतं कंत्राटदारीचा व्यवसाय सुरू केला.

"2016मध्ये लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते वडवळ नागनाथ गटातून भाजपकडून निवडून आले. यानंतर त्यांनी जिल्ह्यातील संपर्क वाढवत विविध कार्यक्रमांना हजेरी लावत संपर्क वाढवला. त्यामुळे लोकसभेसाठी हा चांगला उमेदवार आहे, अशी सामान्यांत त्यांची प्रतिमा तयार झाली," असं नणंदकर सांगतात.

असा आहे लातूर मतदारसंघ

लातूरमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर, अहमदपूर, नांदेड जिल्ह्यातील लोहा यांचा समावेश होतो.

1980 ते 1999 पर्यंत काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर लातूरमधून लोकसभेवर निवडून आले.

2004मध्ये लातूरचे सध्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या आई रूपाताई पाटील निलंगेकर भाजपकडून निवडून आल्या.

2009मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर विलासराव देशमुख यांनी तेथून काँग्रेसच्या जयवंत आवळे यांना निवडून आणलं.

त्यानंतर 2014मध्ये भाजपचे सुनील गायकवाड यांनी बाजी मारली. ते जवळपास 2 लाख इतक्या मताधिक्यानं निवडून आले होते, असं स्थानिक पत्रकार सांगतात.

उस्मानाबादमधून रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापलं

शिवसेनेनं 22 मार्चला राज्यातील लोकसभेच्या 21 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. शिवसेनेकडून उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

यामागचं कारण विचारल्यावर उस्मानाबादमधील ज्येष्ठ पत्रकार देविदास पाठक सांगतात, "एकतर उस्मानाबादमध्ये शिवसेनेची प्रत्येक निवडणुकीत उमेदवार बदलण्याची परंपरा आहे. याशिवाय गायकवाड यांच्याबाबतीत स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. खासदार झाल्यापासून त्यांचा जनतेशी संपर्क कमी झाल्याची तक्रार शिवसेना पक्षप्रमुखांकडे करण्यात आली होती. खरं तर त्यांनी उस्मानाबादचे प्रश्न संसदेत उपस्थित केले पण ते जनमाणसापर्यंत पोहोचले नाहीत."

दिव्य मराठीचे पत्रकार उपेंद्र काटके यांच्या मते, "गायकवाड यांनी कामं केली नाहीत, असा आरोप त्यांच्यावर होतो. पण, वास्तविक पाहता त्यांनी मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी खर्च केला. पण गेल्या दीड-दोन वर्षांत ते नॉट-रिचेबल होते आणि मग यामुळे त्यांच्याबाबत सामान्य माणसांत नाराजी होती."

यामागे तानाजी सावंत यांच्या गटाची भूमिका महत्त्वाची असल्याचंही काटके सांगतात.

"उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे दोन गट आहेत. एक खासदार रवींद्र गायकवाड यांचा, तर दुसरा विधानपरिषदेतील आमदार तानाजी सावंत यांचा. पंढरपूर येथे शिवसेनेचा मेळावा नुकताच पार पडला. यावेळी तानाजी सावंत आणि उद्धव ठाकरे या दोघांचीच भाषणं झाली. उमेदवारीबाबत सावंत गट प्रभावी ठरला आणि गायकवाड यांची उमेदवारी नाकारण्यात आली," असं ते पुढे सांगतात.

रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर त्यांचं नाव देशभर चर्चेत आलं होतं.

तिकीट नाकारण्यामागे हेही कारण असू शकतं का, यावर काटके सांगतात, "एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर रवींद्र गायकवाड यांच्या नावाची देशभर चर्चा झाली होती. पण या बाबीचा तिकीट वाटपावर काही परिणाम झाला असेल असं वाटत नाही."

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 2004 पर्यंत राखीव होता. 2009मध्ये तेथून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील निवडून आले होते. त्यानंतर 2014मध्ये शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी तेथून विजय मिळवला होता.

रवींद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)