लोकसभा 2019 : रणजितसिंह मोहिते पाटील विचारतात 'राष्ट्रवादीनं आम्हाला का डावललं?'

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

'राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानं विजयदादांना का डावललं याचं उत्तर आम्हालाच अजून मिळालं नाही' असं म्हणत बंड करून भाजपावासी झालेले त्यांचे पुत्र आणि 'राष्ट्रवादी'चे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 'समोरून उत्तर तर येऊ द्या, मग मी बोलतो' असं म्हणत 'राष्ट्रवादी'लाच आव्हान दिलं आहे.

भाजपात प्रवेश केल्यानंतर 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी 'राष्ट्रवादी'लाच प्रश्न विचारले आहेत. पण त्यांच्या या निर्णयामागच्या राजकीय गणितांच्या प्रश्नांना थेट उत्तरं न देता मोहिते पाटील पिता-पुत्र पुढे नेमकं काय करणार याबद्दलची संदिग्धता कायम ठेवली आहे.

"राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांची विजयदादांबाबतची भूमिका नेमकी काय होती. पक्षाची इच्छा काय होती? पक्षानं दोन याद्या जाहीर केल्या होत्या ना? त्यांना खुलासा करू द्या की. आम्हाला विचारलं होतं की नव्हतं हे एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला विचारा ना," रणजितसिंह या मुलाखतीत म्हणतात.

याचा अर्थ मोहिते पाटलांना माढ्याच्या उमेदवारीबद्दल विचारलं गेलं नव्हतं का? किंवा विजयदादांनी निवडणूक लढवायला पक्षात कोणाचा विरोध होता का?

"ते आम्ही म्हणतोय की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानं ही भूमिका स्पष्ट करावी. मी न बोललेलंच बरं. त्यांनीच जाहीर करावं. दोन याद्या जाहीर केल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानं, त्यात विजयसिंह मोहिते पाटीलांना का डावललं? उमेदवारी देणारच होतो, वा देणारच नव्हतो, काही तरी सांगायला पाहिजे ना? एवढे मोठे नेते होते पक्षाचे, राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, अशा माणसाचं नाव यादीत नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी पहिल्यांदा दिलं पाहिजे ना?" रणजितसिंह प्रतिप्रश्न करतात.

दरम्यान 'राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रणजितसिंह पाटील यांच्या डावललं गेल्याच्या आरोपांना चुकीचं म्हटलंय

मोहिते पाटलांसाठी माढ्यामध्ये परिस्थिती बिकट होती?

ज्या माढा लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये शरद पवार निवडून गेले, तो मतदारसंघ यंदा 'राष्ट्रवादी'च्या फुटीचं कारण बनला आणि पश्चिम महाराष्ट्रातलं एक महत्वाचं राजकीय घराण्याच्या बाहेर पडण्याला निमित्त ठरला. विजयसिंह मोहिते पाटील २०१४ मध्ये तिथून खासदार म्हणून निवडून आले, पण यंदा त्यांच्यासाठी या मतदारसंघात स्थिती चांगली नाही अशी चर्चा सुरु झाली.

शरद पवारांना लढण्यासाठी आग्रह सुरु झाला आणि राज्यसभेचे खासदार असलेले पवार आपला निर्णय बदलून पुन्हा लोकसभेची निवडणूक माढ्यातून लढवायला तयारही झाले. अर्थात पुढे माढ्यातली नाराजी आणि पार्थ पवार यांची उमेदवारी यामुळे पवारांनाच न लढण्याचा निर्णय घ्यावा लागला, पण यंदा मोहिते पाटलांसाठी माढ्यामध्ये परिस्थिती बिकट होती का? जिंकण्याची १०० टक्के खात्री नव्हती का?

"२०१४ पेक्षा परिस्थिती बिकट होती का?" रणजितसिंह विचारतात. "त्यावेळेसही पक्षांतर्गत कोणी काय काय केलं याची चर्चाही झाली आहे. २०१४ पेक्षा तरी यंदा परिस्थिती खराब नाही आहे ना? त्यावेळचं तसं ते वातावरण, त्यावेळेसची तशी ती लाट, त्यावेळेस प्रतिस्पर्धी असलेल्या सदाभाऊंनी केलेलं काम, केलेलं जन आंदोलन असं सगळं होतं. त्यासारखी परिस्थिती तर यंदा वाईट नाही आहे. त्यामुळे यंदा एवढी सगळी चांगली स्थिती असतांनाही आम्हीच पक्ष सोडतोय, असं का झालं याचं उत्तर आम्हालाच मिळालं नाही आहे," मोहिते पाटील म्हणतात. विजयसिंग मोहिते पाटील यंदा स्वत: निवडणूक लढवायला तयार होते का की रणजितसिंह यांनी यंदा लढावं अशी त्यांची इच्छा होती?

"१०० टक्के त्यांची तयारी होती. वयानं एवढे आहेत पण एकदम फिट एण्ड फाईन आहेत. पक्षानं याचा खुलासा केला पाहिजे की त्यांना उमेदवारी का दिली नाही. आणि कोणत्याही वडीलांची ही इच्छाही असते की आपल्या मुलानं आपलं काम पुढे न्यावं. व्यवहार, बिझनेस, शेती सगळंच," रणजितसिंह या मुलाखतीत म्हणतात.

पण 'राष्ट्रवादी'त त्यांना नेमकं कोणी डावललं, कोणी त्यांना श्रेय मिळू दिलं नाही याबद्दल पक्ष बदलल्यानंतरही स्पष्ट बोलायला का तयार नाही आहात असं विचारल्यावर रणजितसिंह म्हणतात, "मला समोरून उत्तर येऊ द्या ना, मग मी विस्तारानं बोलतो. मी पहिल्यांदा आरोप करणार नाही."

'भाजपा' तर्फे ते माढ्यातून निवडणूक लढवायला इच्छुक आहे का यावर अद्याप काही असा निर्णय न झाल्याचं आणि पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायला तयार असल्याचं ते या मुलाखतीत म्हणतात.

'रणजितसिंह यांच्या नावाला स्थानिक पातळीवर विरोध'

पण 'राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रणजितसिंह पाटील यांच्या डावललं गेल्याच्या आरोपांना चुकीचं म्हटलंय. 'बीबीसी मराठी'शी बोलतांना जयंत पाटील म्हणाले, "जेव्हा आमची पहिली यादी जाहीर झाली तेव्हा पवार साहेबांनीच माढ्यातून निवडणूक लढवावी असं ठरत होतं. दुस-या यादीच्या वेळेस त्यांनी तिथून न लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आम्ही विजयदादांनाच लढवण्याची विनंती केली होती.

"पण काही कारणांसाठी ते यंदा निवडणूक लढवायला तयार नव्हते आणि त्यांनी रणजितसिंह यांचं नाव सुचवलं. पण रणजितसिंह यांच्या नावाला स्थानिक पातळीवर विरोध होता, त्यामुळे निर्णय होत नव्हता. पण त्यानंतर काही दिवस आम्हाला कोणालाच विजयदादांचा संपर्क होत नव्हता. त्यांनी फोनच बंद केला होता. नंतर आम्हाला रणजितसिंह यांनी भाजपात प्रवेश केल्याची बातमी समजली."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)