लोकसभा : सनातनशी संबंधांवरून काँग्रेसचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार बांदिवडेकर अडचणीत

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

काँग्रेसनं रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघासाठी नविनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. नविनचंद्र यांचा सनातन संस्थेशी संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तर काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या प्रकरणी चौकशी करून योग्य निर्णय घेऊ, असं म्हटलं आहे.

कट्टरतावादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असणाऱ्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात नविनचंद्र सहभागी झाले होते, असा आरोप आहे. कट्टरतावादी कारवाया करणार असल्याच्या संशयांवरून काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित वैभव राऊतला ATSनं अटक केली. वैभव राऊतच्या नालासोपारा इथल्या घरातून 22 गावठी बाँब आणि जिलेटिनच्या कांड्या सापडल्या, असं ATSनं म्हटलं होतं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसला उमेदवार बदलण्यासाठी विनंती केली आहे. त्यांनी ट्वीट करून ही मागणी केली आहे.

"वैभव राऊत ज्या संस्थेशी संबंधित आहे, तिच्यावर दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येचा आरोप आहे. आणि या संस्थेशी संबंधित व्यक्तीला उमेदवारी मिळत असेल तर हे भावी राजकारणाला घातक आहे. केवळ मतांचं राजकारण असेल तर या राजकारणाला काही अर्थ उरत नाही. काँग्रेसनं हा उमेदवार बदलावा ही माझी वैयक्तिक मागणी आहे. सनातनशी संबंधित माणूस धर्मनिरपेक्ष असेल असं मला कधीच वाटत नाही," असंही त्यांनी म्हटलंय.

यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर चव्हाण यांनी ट्वीट करणारा खुलासा केला आहे. ते म्हणाले, " रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार बांदिवडेकर यांचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचं वृत्त काही वाहिन्यांनी दिलं आहे. काँग्रेस सनातनसारख्या कट्टरतावादी विचारांच्या विरोधात आहे. या प्रकरणी चौकशी करून पक्ष त्यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेईल."

"वैभव राऊतच्या आईला आणि बायकोला पोलिसांनी डांबून ठेवलं, म्हणून समाज चिडला होता. समाजामुळे बांदिवडेकर तिथं गेले होते. वैभव राऊतला कायद्य़ानं काहीही शिक्षा झाली तर त्यावर मला काही आक्षेप नसेल, असंही त्यांनी म्हटलं आहे," असं काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

नविनचंद्र बांदिवडेकर काय म्हणतात?

"हे प्रकरण 5 ते 6 महिन्यांपूर्वीचं आहे. मी एका समाजाचा नेता आहे. अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. वैभव राऊत आमच्या समाजाचा मुलगा आहे आणि तो गौरक्षक म्हणून प्रसिद्ध आहे. गौरक्षक म्हणून तो नालासोपाऱ्यात लढा देतो. अचानक एक दिवशी एटीएसवाले त्याच्या घरी छापा मारतात आणि टेररिस्ट म्हणून त्याला अटक करतात. ज्यावेळी आम्ही त्याच्या घरी गेलो तेव्हा आम्हाला कळलं की, एटीएसवाल्यांनी कारवाई केली तेव्हा ते पहाटे 3 वाजता आले. चौकशीदरम्यान त्याची आई आणि पत्नीला एका रुममध्ये डांबून ठेवलं. ही सगळी कारवाई करताना त्यांच्याकडे एकही महिला कॉन्स्टेबल नव्हती. आमच्या आई-बहिणीवर कुणी असा अन्याय करणार असेल, तर तो आम्ही कसा सहन करणार?" नविनचंद्र या प्रकरणाविषयी सांगतात.

"वैभव राऊतच्या समर्थनार्थ ज्यावेळी मोर्चा झाला, त्यावेळी समाजाचा एक नेता म्हणून मी तिथं गेलो आणि सहभाग नोंदवला. हा आमच्या समाजाचा मुलगा आहे, एक गौरक्षक आहे आणि हा कुठल्याही अशा प्रकरणात नसणार या भूमिकेनं आम्ही यात सहभाग घेतला. काँग्रेस पक्षात मी 2005मध्ये प्रवेश केला आणि 2008मध्ये मी राजकारण सोडलं आणि समाजकार्य करत राहिलो. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मला दीड महिन्यांपूर्वी विचारण्यात आलं आणि मी तयारी दर्शवली," ते पुढे सांगतात.

पण सनातनशी तुमचा संबंध आहे, अशी चर्चा सुरू आहे, यावर ते सांगतात, "माझा सनातन संस्थेशी काडीमात्र संबंध नाही. केवळ तो समाजाचा घटक म्हणून त्याची पाठराखण करण्यासाठी आम्ही सनातनच्या व्यासपीठावर गेलो."

सनातनच्या विचारांशी सहमत आहात का, यावर ते सांगतात, "सनातनच्या विचारांशी मी अजिबात सहमत नाही. सर्व जाती धर्मांत माझे मित्र आहेत आणि मी धर्मनिरपेक्षता मानणारा माणूस आहे."

काँग्रेसनं तुमच्या जागी दुसऱ्या कुणाला उमेदवारी द्यावी, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे, यावर ते सांगतात, "जितेंद्र आव्हाड यांनी माझा सनातनशी संबंध आहे, हे सिद्ध करून दाखवावं आणि मगच बोलावं."

तुम्ही सनातनच्या मोर्चात सहभागी झाला होता, याची तुम्ही काँग्रेसला कल्पना दिली होती का? यावर ते म्हणतात, "मी ज्यावेळी सहभागी झालो त्यावेळी असा काही विचारही माझ्या मनात आला नव्हता. उमेदवारी देताना मला तसा प्रश्न विचारण्यात आला असता तर मी नक्कीच सांगितलं असतं."

ज्याच्या घरी स्फोटकं सापडली त्या वैभव राऊतला तुमचा अजूनही पाठिंबा आहे का, यावर ते सांगतात, "हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. कोर्टानं त्याला गुन्हेगार म्हणून शिक्षा ठोठावली तर आम्हाला ते मान्य असेल."

मग आता तुमच्यावर होणाऱ्या आरोंपाविषयी काय सांगाल, यावर ते म्हणतात, "मला काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. माझ्या कॅरेक्टला डाग लावायची कुणाची ताकद नाही, त्यामुळे हे असले प्रकार सुरू आहेत."

मतदारसंघात परिणाम?

''नविनचंद्र बांदिवडेकर हे भंडारी समाजाचे नेते आहेत. त्यांच्या सनातनच्या व्यासपीठावर जाणं हा काही फार मोठा विषय आहे, असं मला वाटत नाही. ते सनातनचे साधक आहेत किंवा त्यांच्यासाठी एखादा आश्रम चालवतात, हेसुद्धा ऐकिवात नाही. त्यामुळे याचा निवडणुकीत काही परिणाम होईल, असं वाटत नाही. कारण ते सनातनचे म्हणून ओळखले जात नाहीत'',असं स्थानिक पत्रकार विजय शेट्टी सांगतात.

ते पुढे म्हणतात, ''मी अनेक वर्षांपासून इथे पत्रकार म्हणून काम करतोय. त्यांचा सनातनशी संबंध आहे, हे मला स्वत:लाच मीडियाच्या माध्यमातून कळालं. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या प्रतिमेवर अथवा मतदानावर याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही''.

''नविनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही. सनातनच्या कोणत्याही कार्यात त्यांचा सहभाग नाही. बांदिवडेकर सनातनची विचारधारा आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात आहेत आणि हा विरोध पुढेही कायम राहील,'' असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी माध्यमांनी सांगितलं आहे.

वैभव राऊत कोण आहे?

वैभव राऊत सनातन संस्थेशी संलग्न असल्याचा हिंदू गोवंश रक्षा समितीचे कार्यकर्ता आहे. "वैभव राऊत हा एक धडाडीचा गोरक्षक असून ते 'हिंदू गोवंश रक्षा समिती' या गोरक्षण करणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होता. तो हिंदू जनजागृती समितीच्या सर्व हिंदू संघटनांच्या एकत्रीकरणातून केल्या जाणार्‍या हिंदू संघटनाच्या उपक्रमांमध्ये, तसेच आंदोलनांमध्ये सहभागी होत असो; मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याचा कोणत्याही उपक्रमात सहभाग नव्हता," असं हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी म्हटलं आहे. हिंदू जनजागृती समिती सनातन संस्थेशी संबंधित आहे.

"वैभव राऊत गोरक्षक होता. त्याच्याविरुद्धच्या आधीच्या आरोपांच्या प्रती माझ्या हाती आल्या आहेत. प्रत्येकवेळी वैभव राऊतला जिल्हा सोडून देण्याचा हुकूम देण्यात आला होता. बकरी ईदच्या दिवशी गाई रस्त्यावर कापल्या जात होत्या. त्यामुळे भावना दुखावल्या जातात. त्यामुळे वैभव राऊतने विरोध केला. विरोध केला तर आम्ही तुम्हाला चिरडून टाकू अशी राज्यकर्त्यांची भूमिका आहे. नालासोपाऱ्यात त्याचे नऊ सहकारी गोरक्षक आहेत. आठ-नऊ जणांचं जीवन उदध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ATS त्यांच्या मागे लागले आहे. गोमाफियाकडून ATS पैसे घेत असल्याचा आरोप आहे," असं आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी कोर्टाबाहेर म्हटलं होतं.

पुनाळेकर सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत. "वैभव राऊत सनातनचा कार्यकर्ता नाही. तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे आणि त्याला शक्य ती मदत आम्ही करू" असंही त्यांनी म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)