अहमदनगरमध्ये सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप #5मोठ्याबातम्या

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे :

1. सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप

अहमदनगरमध्ये अखेर राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करून लोकसभेसाठी तयारी सुरु केली आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संग्राम जगताप यांच्या नावाची घोषणा केली. नगरच्या जागेवरून आघाडीमध्ये दीर्घकाळ वाद होता. या जागेवर लढण्याची सुजय विखे पाटील यांची इच्छा होती. मात्र राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी न सोडल्यामुळे सुजय यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

अहमदनगरच्या जागेसाठी अरुण जगताप आणि प्रशांत गडाख यांची नावं चर्चेत होती. एबीपी माझानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

2. ईशान्य भारतात भाजपाच्या 23 नेत्यांनी सोडला पक्ष

भारतीय जनता पार्टीच्या 23 नेत्यांनी 2 दिवसांमध्ये पक्ष सोडला आहे. अरुणाचल प्रदेशात भाजपाच्या 20 नेत्यांनी नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामध्ये 2 मंत्री आणि 6 आमदारांचा समावेश आहे. तरिही 60 सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे 40 आमदार आहेत.

त्रिपुरामध्ये भाजपा उपाध्यक्ष सुबल भौमिक यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर प्रकाश दास आणि देबाशिष सेन यांनीही भाजपाला रामराम केला आहे. हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3. नरेंद्र मोदींचा प्रचार वर्ध्यातून सुरू होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मार्च रोजी वर्धा येथून लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान सेवाग्रामला भेट देण्यार आहेत. या मतदारसंघामध्ये काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांना उमेदवारी दिली आहे.

वर्ध्यामध्ये भाजपाचा उमेदवार संसदीय समिती ठरवेल, असे मावळते खासदार रामदास तडस यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

4. प्रमोद सावंत यांनी जिंकले विश्वासमत

गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वासमतदर्शक ठराव जिंकला असून त्यांना 20 आमदारांनी पाठिंबा दिला आहे.

यामध्ये भाजपाचे 11, गोवा फॉरवर्डचे 3, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 3 आणि 3 अपक्षांचा समावेश आहे. विरोधीपक्षात असणाऱ्या काँग्रेसला 15 मते मिळाली आहेत.

उपसभापती मायकल लोबो यांनी सभागृहाचे संचालन केले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव विधानसभेने एकमताने मंजूर केला. द हिंदूने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले. आहे.

5. पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल

प्राप्तीकर विभागाने पॅन कार्डच्या नियमांमध्ये तीन मोठे बदल केले आहेत. एक एप्रिलपासून हे बदल होणार आहेत. पॅन आणि आधार जोडले नसल्यास आयकर कायदा 139 ए नुसार ते निष्क्रिय होणार आहे. आधार आणि पॅन जोडण्याची मर्यादा 31 मार्च 2019 आहे.

आर्थिक वर्षामध्ये 2.5 लाखांहून अधिक उलाढाल असल्यास पॅन कार्ड काढणे गरजेचे आहे. येत्या 31 मे पर्यंत पॅन कार्डसाठी अर्ज करता येईल. आता पॅन कार्डावर अर्जदाराचे नाव, आई-वडिलांचे नाव, जन्मतारिख, पॅन नंबरबरोबर क्यू आर कोडही असणार आहे. त्यामध्ये अर्जदाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरीसोबत इतर माहिती पॅन कार्डवर उपलब्ध होईल. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)