Rafale: रफाल कागदपत्रं चोरीला नाही गेली: महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल #5मोठ्याबातम्या

आजच्या विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच मोठ्या बातम्या खालीलप्रमाणे:

1. रफाल फाईलची चोरी झालीच नाही

रफाल कराराशी संबंधित कागदपत्रांची चोरी झाल्याचा दावा सरकारने यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला होता. त्यावर टीकेची झोड उठली आणि दोन दिवसांनी "मी तसं बोललोच नाही," असा पवित्रा सरकारच्या वतीने अटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल यांनी घेतल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.

"रफाल कराराची कागदपत्रं चोरीला गेली असा माझ्या वक्तव्याचा अर्थ विरोधकांनी काढला आहे. पण तो चुकीचा आहे. ती कागदपत्रं चोरीला गेली, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही तर त्या कागदपत्रांची चोरून झेरॉक्स काढली गेली. हा माझ्या वक्तव्याचा मतितार्थ होता," असं ते म्हणाले.

2. नीरव मोदी इंग्लंडमध्ये सापडला

पंजाब नॅशनल बँकेचं जवळजवळ 1200 कोटी रुपयांचं कर्ज बुडवून भारतातून पलायन करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी अखेर लंडनमध्ये दिसला.

द टेलिग्राफ वृत्तपत्राच्या पत्रकारांना नीरव मोदी लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसला. टेलिग्राफ वृत्तपत्राच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हीडिओ ट्वीट करण्यात आला आहे.

"तुम्ही अजूनही हिऱ्यांचा व्यापार करता का? तुम्ही किती दिवस इंग्लंडमध्ये राहणार आहात?" असे काही प्रश्न या पत्रकाराने मोदीला विचारले. मात्र मोदींनी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला.

3. मराठा, कुणबी उमेदवारांना शासनाकडून UPSCसाठी मोफत प्रशिक्षण

मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगात (UPSC) टक्केवारी वाढावी, यासाठी राज्य शासनाची छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) विद्यावेतन देणार आहे. दिल्ली येथे UPSCच्या प्रशिक्षणासाठी होणारा खर्च शासन उचलणार असल्याची ही बातमी लोकमतने दिली आहे.

दिल्लीच्या नामांकित संस्थेत UPSCचं प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. यासाठी राज्यात 225 मराठा, कुणबी जागांसाठी सारथीकडून परीक्षा घेतली जाणार आहे. तसंच दरमहा 13 हजार रुपये विद्यावेतन दिलं जाईल, असंही या बातमीत म्हटलं आहे.

सन 2020 मध्ये होणाऱ्या UPSC पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी मराठा, कुणबी समाजातील उमेदवारांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. त्याकरिता 'सारथी-दिल्ली UPSC CET परीक्षा 2019' ही प्रवेश परीक्षा 31 मार्च रोजी घेण्यात येणार असल्याचं या बातमीत पुढे म्हटलं आहे.

4. काश्मीरच्या जवानाच्या अपहरणाची बातमी चुकीची - संरक्षण मंत्रालयाचं स्पष्टीकरण

भारतीय लष्कराच्या एका जवानाचे जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात त्याच्या घरातूनच अपहरण करण्यात आलं, अशी बातमी विविध वृत्तपंत्रांमध्ये आली आहे.

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार चार दहशतवाद्यांनी मोहम्मद यासिन भट यांचं घरात घुसून अपहरण केलं होतं. काश्मीरच्या मध्यवर्ती भागातील चादुरा परिसरातील काझिपोरा मध्ये राहणारे भट जम्मू-काश्मीर लाइट इन्फन्ट्रीमध्ये सेवेत असून तो 26 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत सुट्टीवर आहेत.

पण शनिवारी संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी एक ट्वीट करून या बातम्या चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं. "तो सुरक्षत आहे. कुठलेही तर्कवितर्क लावले जाऊ नयेत," असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

5. काश्मिरी तरुणांवरील हल्ले खेदजनक- मोदी

काश्मिरी तरुणांना झालेल्या मारहाणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या रॅलीदरम्यान मोदींनी नागरिकांना देशात एकतेचं वातावरण टिकवून ठेवण्याचं आवाहन केलं आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

ते म्हणाले, "लखनौमध्ये काही समाजकंटकांनी काश्मिरी तरुणांबरोबर केलेलं कृत्य निंदनीय आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्याविरोधात कडक कारवाई केली आहे. त्यामुळे मला सरकारचा अभिमान वाटतो. असे प्रकार व्हायला नको. त्यामुळे देशाची एकता धोक्यात येते."

"पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी करण्याचे खूप प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आज संपूर्ण जग पाकिस्तानवर दबाव टाकत आहे. परंतू आपल्याच देशातील काही लोक पाकिस्तानला सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत," असंही ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)