Ayodhya Dispute: न्या. खलीफुल्ला, श्रीराम पंचू आणि श्री श्री रविशंकर कोण आहेत?

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा वाद मध्यस्थाच्या मार्फत सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती खलीफुल्ला हे या समितीचे प्रमुख असतील. तर सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे मध्यस्थाची भूमिका बजावतील.

तीन सदस्यीय समितीला पुढच्या आठ आठवड्यात आपला रिपोर्ट सुप्रीम कोर्टासमोर सादर करावा लागणार आहे. तसंच समितीतील सदस्यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी जी काही चर्चा होईल ती गोपनीय ठेवण्याचा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

मध्यस्थीसाठी आणखी काही लोकांची गरज असेल तर समिती तशी मागणी करू शकते. त्यांना परवानगी देण्यात येईल, पण या तोडगा समितीचे हे तीन प्रमुख सदस्य असतील. विशेष म्हणजे हे तिघेही दक्षिण भारताशी संबंधीत आहेत.

कोण आहेत न्या.खलीफुल्ला?

न्या.खलीफुल्ला यांचं पूर्ण नाव फकीर मोहम्मद इब्राहीम खलीफुल्ला असं आहे. 67 वर्षांचे न्या. खलीफुल्ला यांचा जन्म 23 जुलै 1951 मध्ये तामिळनाडूतील कराइकुडी इथं झाला.

1975 पासून ते वकिलीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. 2000 साली त्यांची मद्रास हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 2011 मध्ये त्यांना जम्मू काश्मीर हायकोर्टात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. सप्टेंबर 2011 पासून ते जम्मू काश्मीर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत होते.

2 एप्रिल 2012 मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश सरोश होमी कपाडिया यांनी त्यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केलं. 22 जुलै 2016 ला ते सुप्रीम कोर्टातून निवृत्त झाले.

आज कोर्टाने त्यांना राम मंदिर प्रकरणी मध्यस्थांच्या समितीचं प्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे.

श्रीराम पंचू

श्रीराम पंचू यांची सुप्रीम कोर्टाने रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात मध्यस्थ म्हणून नेमणूक केली आहे. एकूण तीन मध्यस्थांपैकी ते एक आहेत.

श्रीराम पंचू हे व्यावसायिक वकील आणि मध्यस्थ आहेत. पंचू हे मध्यस्थीमध्ये तज्ज्ञ आहेत आणि ते 'मीडिएशन चेंबर' या फर्मचे प्रमुख आहेत. जी प्रकरणं मध्यस्थीनं किंवा सामंजस्याने सोडवता येणं शक्य आहेत, त्यासाठी मध्यस्थ पुरवण्याचं काम त्यांची संस्था करते. या संस्थेचं मुख्यालय चेन्नईत आहे.

इंटरनॅशनल मीडिएशन इंस्टिट्यूटच्या (IMI) संचालक मंडळातही त्यांचा समावेश आहे. पंचू यांनी देशात प्रथमच कोर्ट अनेक्सड मेडियेशन सेंटरची स्थापना केली होती. ज्या दोन पक्षकारांमध्ये कायदेशीर वाद आहेत, त्यांच्यात मध्यस्थी करून तो वाद समोपचाराने मिटवण्यासाठी कोर्ट अनेक्स्ड मीडिएशनचा वापर होतो.

दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून त्यांना हे सांगितलं जातं की तुमचं म्हणणं कायद्याच्या कक्षेत कुठं बसतं. काही कायदे समजण्यास किचकट असतील तर ते पक्षकारांना समजावून सांगून एका मुद्द्यावर समन्वय घडवून आणण्याचं काम मध्यस्थामार्फत केलं जातं. कोर्ट अनेक्स्ड मेडियेशन सेंटर हा भारताच्या कायदा व्यवस्थेतला एक महत्त्वाचा घटक समजला जातो.

पंचू यांनी आतापर्यंत अनेक किचकट प्रकरणांमध्ये मध्यस्थी केली आहे. कंपन्या किंवा करारात असलेल्या वादांमध्ये त्यांनी मध्यस्थी करून ते सोडवले आहेत, असं WhosWhoLegal वेबसाइटवर म्हटलं आहे. कायदा क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींची माहिती या वेबसाइटवर असते.

कार्पोरेट क्षेत्रातले वाद, बौद्धिक संपदा हक्क कायदा, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे व्यावसायिक वाद या प्रकरणांत त्यांनी मध्यस्थी केली आहे.

आसाम आणि नागालॅंड या दोन राज्यात 500 स्क्वेअर किलोमीटरच्या जागेचा वाद होता. तेव्हाही सुप्रीम कोर्टाने त्यांची या वादात त्यांची मध्यस्थ म्हणून नेमणूक केली होती. मुंबई येथे पारशी समुदायासंबंधित एका प्रकरणात त्यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली होती.

मध्यस्थी या विषयावर त्यांनी दोन पुस्तकं देखील लिहिली आहेत. "Settle for more" आणि "Mediation - Practice and Law". त्यांची दोन्ही पुस्तकं ही कायद्याच्या अभ्यास करणाऱ्या, विशेषतः मध्यस्थीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहेत, असं WhosWhoLegal वेबसाईटवर लिहिलं आहे.

त्यांच्या कामगिरीची दखल सुप्रीम कोर्टाने घेतल्याचा उल्लेख वेबसाइटवर आहे.

श्री श्री रविशंकर?

आध्यात्मिक गुरू म्हणून ओळख असलेले श्री श्री रविशंकर 'आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेचे प्रणेते आहेत. 1981 पासून श्री श्री रविशंकर सामाजिक कार्यात आणि विशेषत: तणावमुक्त जीवनासाठीच्या योग तंत्रासाठी काम करत आहेत.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अधिकृत वेबसाईटनुसार भारतासह पाकिस्तान, इराक आणि जगभरातील 150 हून अधिक देशांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचा पसारा आहे.

62 वर्षांच्या श्री श्री रविशंकर यांचा जन्म तामिळनाडूतल्या पापनासममध्ये 13 मे 1956 रोजी झाला.

श्री श्री रविंशकर हे हिंदुत्वाच्या बाजूनं झुकलेले असल्याचं बोललं जातं, तसंच राम मंदिर व्हावं यासाठीही ते आग्रही असल्याचं याआधीच्या वक्तव्यांवरून दिसतं.

दिल्लीत यमुनेकाठी घेतलेल्या वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल हा कार्यक्रम घेतल्यामुळे ते वादात आले होते. याप्रकरणी 2016 साली राष्ट्रीय हरित लवादानं आर्ट ऑफ लिव्हिंगला दंडही ठोठावला होता.

मलाला युसुफजाईला मिळालेल्या नोबेल पुरस्कारावरही त्यांनी नाराजी व्यक्त केल्यावरून वाद झाला होता. शिवाय समलैंगिकता ही प्रवृत्ती आहे, ती नंतर बदलता येते, असंही विधान केल्यावरून ते वादात सापडले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)