भारत-पाकिस्तान यांच्यातली 2003ची ती वर्ल्ड कप मॅच अशी ऐतिहासिकच होती

    • Author, गुलशनकुमार वनकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

1 मार्च 2003. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी चौथ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये होत असलेल्या या वर्ल्डकपसाठी भारतात एवढी जय्यत तयारी मी पहिल्यांदाच पाहत होतो.

एक वेगळाच उत्साह होता तो... कदाचित असंही असावं की 1999च्या वर्ल्डकपच्या वेळी मी जेमतेम 7 वर्षांचा होतो, म्हणून काहीच आठवेना, कळेना. क्रिकेटची काहीतरी मोठी स्पर्धा आहे, एवढंच तेव्हा ठाऊक होतं.

2003चा वर्ल्डकप अनुभव मात्र वेगळा होता. केबल टीव्हीच्या ग्लॅमरमुळे वेगवेगळ्या खास अॅड्स आल्या होत्या. ओनिडा, पेप्सी, बजाज कॅलिबर 115 'हुडीबाबा' ते वीरेंद्र सेहवागच्या 'कर लो दुनिया मुठ्ठी में'सारख्या अॅड्समुळे तेव्हाच्या भाबड्या सोशल मीडियाविरहित जगात उत्साह शिगेला होता.

त्यावेळी एक वेगळी चुरस होती, जी आज क्रिकेटच्या नव्हे तर न्यूज चॅनल्सच्या 'वॉर रूम्स'मध्ये पाहायला मिळत आहे. 1999च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान उपविजेता होता तर विजेत्या ऑस्ट्रेलियाने यंदाच्या साखळी फेरीत भारताचा याच सेंच्युरियनच्या मैदानावर दारुण पराभव केला होता. म्हणून हा सामना फक्त मोठाच नव्हे तर भारतासाठी अटीतटीचाही होता.

तो दिवस होता महाशिवरात्रीचा, म्हणजे शाळेलाही सुटी. त्यामुळे परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी कधी नव्हे तशा निवांतपणात मॅच पाहता येणार होती, याचा आनंद होताच.

सेंच्युरियनमध्ये मॅच दिवसा होती, पण भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5च्या सुमारास सुरू होणार होती. त्यामुळे सकाळपासूनच टीव्ही चॅनल्सवर वेगळीच रणधुमाळी पाहायला मिळत होती.

नागपुरात मार्च सुरू झाला की उन्हाळ्याची चाहूल लागते. काही घरांमध्ये कूलरही लागले होते. आजही तापमान 30च्या आसपास आहेच. आणि तेव्हाही तेवढंच असावं.

म्हणून दिवसभर दंगामस्ती न करता संध्याकाळहून एकत्र मॅच पाहू या, असा मित्रांनी प्लॅन बनवला.

अखेर संध्याकाळी 5.30च्या सुमारास एका शेजारी राहणाऱ्या मावशींकडे आम्ही चार-पाच जण जमलो. त्यांच्याकडे का, तर त्यांनी नवीन टीव्ही घेतला होता, मस्त मोठावाला.

अखेर दोन्ही देशांचं राष्ट्रगीत सुरू झाले. आम्ही पोरं स्तब्ध उभे झालो. पण काही 'पोट्टे' बसूनच राहिले. असो!

मग थोड्या वेळाने पहिल्या ओवरसाठी झहीर खानने बॉल घेतला तेव्हा सेंच्युरियनचं मैदान दणाणून उठलं. समोर होते उजव्या-डाव्या बॅटिंग काँबिनेशनचे सलामीवीर सईद अनवर आणि तौफिक उमर.

जसजसा झहीरने रनअप घ्यायला सुरुवात केली तसतसा मैदनातला आवाज वाढतच गेला आणि पिचवर उडी मारताच "ओहSSSS!"... त्याने नो बॉल टाकला! आणि हे असंच सुरू राहिलं. कधी वाईड तर कधी बाय. पाकिस्तानच्या पहिल्या सात धावा एक्स्ट्रासमधून आल्या होत्या.

आमचे पोट्टे बिथरले. काही जण उठून गेले. म्हणे, 'काही नाही होणार इंडियाचं!'

पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. 11व्या ओवरमध्ये झहीरने तौफिक उमरचा त्रिफळा उडवला, तेव्हा लोकांना धीर आला, स्टेडियममध्ये आणि या रूममध्येही.

पण सईद अनवर थांबायचं नावच घेत नव्हता. बॉल टाकल्यावर जवागल श्रीनाथही कंबरेवर हात टेकवून त्याचा बॉल सीमेपार जाताना पाहत होता. एकीकडे नवा आलेला रझ्झाकही स्थिरावताना एकटदुकट बॉल हाणत होता.

तेवढ्यात अब्दुल रझ्झाकचा एक सुरेख झेल विकेटकिपर राहुल द्रविडने घेतला आणि अखेर आशिष नेहराचा चेहरा खुलला.

मग आला कर्णधार इंझमाम उल हक. इंझमाम आमच्या एका दूरच्या मामासारखा खूप आळशी होता. त्याच्या बॅटिंगमध्ये शक्ती होती, पण तो संथगतीने धावण्यासाठी आणि त्यामुळे रनआऊट होण्यासाठी कुख्यात होता.

आजच्या मॅचमध्ये काहीतरी खास होतं, कारण तेही पाहायला मिळालं. एका जवळच मारलेल्या बॉलवर बॅट्समन रझ्झाकने रन नाकारला आणि अर्धी पिच धावून आलेले इंझीभाई वेळेत परतू शकले नाहीत. हा त्यांचा कारकिर्दीतला 35वा रनआऊट होता. आमच्यासाठी हे अगदी 'मनोरंजन छप्पर फाडके!'

एकीकडे नियमितपणे बॅट्समन गाशा गुंडाळत असतानाच सलामीवीर सईद अनवरने मात्र आपलं शतक पूर्ण केलं. त्यामुळे आमचीही धाकधूक वाढली.

ड्रेसिंग रूममधून कॅप्टन वसीम अक्रमने हात उंचावून त्याला शाबासकी दिली. म्हणून काय कोण जाणे, त्याला उत्साह नडला आणि अवघ्या चार चेंडूत आशिष नेहराने त्याचा त्रिफळा उडवला.

नेहराबरोबरच आम्हीही सुटकेचा निःश्वास सोडला. आजूबाजूच्या घरांमधूनही एकाच क्षणी जोरदार आवाज आला. खूपच भारी वाटतं जेव्हा खूप सारे लोक असे समोर नसूनही एकाच गोष्टीवर आनंद साजरा करत असतात.

अखेर 50व्या षटकाअखेरीस कर्णधार वसीम अक्रमनेही थोडीफार फटकेबाजी केली आणि अखेर संघाचा आकडा 273 पर्यंत पोहोचवला.

मधला ब्रेक झाला आणि आम्ही सर्व पोट्टे सायकली घेऊन बाहेर पडलो, थोडे पाय मोकले करायला. एका मित्राच्या घरी गेलो तेव्हा त्याचे बाबा खूप आत्मविश्वासाने म्हणाले, "जिंकू रे, आपणच जिंकू. आज महाशिवरात्री आहे."

भारत पाकमधल्या क्रिकेट सामन्यात शंकराला का इंटरेस्ट असावा, हा प्रश्न तेव्हा पडला नव्हता, आज पडतो.

काका एवढं पॉझिटिव्ह बोलले, म्हणून उत्साहात आम्ही दुसऱ्या इनिंगसाठी पुन्हा त्या शेजारच्या मावशींकडे जाऊन बसलो.

काही वेळानं दुसरी इनिंग सुरू झाली आणि आता खरंच देव मैदानावर प्रकटला. MRFची बॅट हातात आणि हेलमेटवर BCCIचं चिन्ह आणि त्याखाली तिरंगा.

त्याच्याबरोबर 'कर लो दुनिया मुठ्ठी में' फेम सेहवाग. विरुद्ध टोकाला होता डावखुरा फास्ट बॉलर कॅप्टन अक्रम. चुरस आता रंगणार होती.

सचिन तेंडुलकरने अक्रमचे पहिले दोन बॉल संयमाने डिफेंड केले, पण तिसरा बॉल ऑफ-स्टंपवर आला नि सचिनने त्याला पंच करून सीमेपार धाडला. पहिल्याच ओवरमध्ये भारताच्या खात्यात 9 धावा होत्या. "अरे माहोल!" आम्ही उत्साहात ओरडलो.

याच सामन्यात खरं युद्ध पाहायला मिळालं ते सचिन आणि 'रावळपिंडी एक्स्प्रेस' शोएब अख्तर यांच्यात. शोएब म्हणजे बिबट्यासारखा सुपरफास्ट. त्याच्या रनअपचा वेग कधीकधी त्याच्या बॉलच्या वेगापेक्षा जास्त वाटायचा आणि आम्ही बच्चे कंपनी तर त्याच्या बॉलिंगला जाम घाबरायचो.

पण सचिन त्याचा मारासुद्धा धुडकावून लावत होता. ऑफ स्टंपच्या ही खूप बाहेर आलेल्या एका बाउंसरवर तर सचिनने थेट सिक्स मारला. हे पाहिल्यावर कळलं की त्याला देव का म्हणतात.

दुसऱ्या टोकाला असलेला वीरेंद्र सेहवागही सैराट फटकेबाजी करत होता. पण लवकरच तो एका सुमार फटक्यामुळे माघारी गेला.

सेहवाग गेला आणि कॅप्टन सौरव गांगुली आला. पण त्यालाही वकारने सेटल होऊ दिलं नाही.

यानंतर लगेच आलेला एक सुवर्ण क्षण पाकिस्तानने गमावला, जेव्हा सचिनचा एक झेल मिडऑफला असलेल्या रझ्झाकने सोडला.

"ओहSSSSS!!!" आसपासच्या दहा घरांमधून जोरात आवाज आला. हीच चूक पाकिस्तानला पुढे महागात पडणार होती.

तेव्हा सचिन जरा खऱ्या मूडमध्ये आला. त्याची फटकेबाजी तेव्हा डोळ्याचे पारणे फेडणारी होती, आम्हा सर्वांसाठीच तेव्हा तो आयडल होता. कारण हेच ते वय असतं जेव्हा तुम्ही आईबाबांकडे क्रिकेट किटसाठी हट्ट करता, कोचिंग लावून देण्यासाठी विनवण्या करता, म्हणजे क्रिकेटज्वर चढण्याचंच वय.

दुसऱ्या टोकाला मोहम्मद कैफ होता. मग या गोड जोडीने पाकिस्तानच्या तेजतर्रार बॉलर्सना चांगलंच झोडपलं.

भारताने 170 रन केले तेव्हा सचिन त्याच्या कुख्यात 'नर्व्हस नाइंटीज'मध्ये होता. झंझावतासारखा खेळणारा सचिन 90 पासून शतक गाठेस्तोवर अतिसावधगिरीने खेळतो आणि कधीकधी भीतभीत आऊट होतो, असं समीक्षकांचं म्हणणं होतं.

98वी धाव घेताना सचिनला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याच्या पायात गोळे येऊ लागले होते. त्यामुळे आमच्याही मनात वेगळीच धाकधूक होती. पुढे उभाही कोण होता तर 'रावळपिंडी एक्स्प्रेस'.

मग सचिनने परिपक्वता दाखवली आणि अशा महत्त्वाच्या क्षणी त्याने सेहवागला रनर म्हणून बोलावणं धाडलं. पण नशिबाची इनिंग इथवरच होती.

शोएबच्या एका घाणाघाती बाउंसरला सचिन नियंत्रित नाही करू शकला आणि ऐन बॅटची पालथी बाजू लागून बॉल वर उसळला. युनूस खाननेही हा झेल अप्रतिमरीत्या टिपला आणि शतकापासून दोन धावा दूर सचिन आणि त्याच्यासाठी एकही रन न धावता सेहवाग पॅव्हिलिअनमध्ये परतले.

पण तोवर सामना बऱ्यापैकी भारताच्या पारड्यात होता, म्हणजे 133 बॉलमध्ये 97 धावांची गरज होती. आणि दुसऱ्या टोकाला साक्षात 'द वॉल'अर्थात राहुल द्रविड होता.

लक्ष्यापासून दोन धावा दूर असताना युवराज सिंगने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं तर आणि अखेर द्रविडने एका उंच बॉलला पुल करत वियजी चौकार हाणला.

रात्रीचे 10.30 वाजले असतील साधारण. पण सर्व घरांमध्ये घोळक्याने भरलेले फॅन्स त्या रात्री जल्लोष करत घराबाहेर आले. मग आम्ही पोरं सगळे पुन्हा सायकली काढून मोहल्ल्यात हिंडायला लागलो.

रुसून आधीच उठून गेलेल्या मित्रांच्या घरी जाऊन त्यांना बाहेर बोलावून जल्लोष करू लागलो. 11 वर्षांचं कारटं म्हणून तेव्हा भारताने पाकिस्तानवर क्रिकेट सामन्यात विजय मिळवला, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.

त्यातल्या त्यात, शतक झळकावणाऱ्या अन्वरला वगळून विजयी पाळी खेळलेल्या सचिनला 'मॅन ऑफ द मॅच' देण्यात आलं, ते तर अगदीच 'एक नंबर' झालं.

अर्थातच नंतर भारताची विजयी घोडदौड फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने रोखली आणि सचिनला गोल्डन बॅटवर समाधान मानावं लागलं. मला आठवतं मी खूप ढसाढसा रडलो होतो तेव्हा.

भारत पाकिस्तानमधले सामने हाय-व्होल्टेज असायचे, असा तो एक काळ होता. शारजाह किंवा त्यापूर्वीच्या अनेक सामन्यांत या पारंपरिक प्रतिस्पर्धींमध्ये वेगळं द्वंद नक्कीच पाहायला मिळालं होतं. पण भारत पाकिस्तानमधल्या आजवरच्या काही सर्वांत रोमहर्षक सामन्यांपैकी हा सामना नक्कीच एक होता.

आजही या पारंपरिक प्रतिस्पर्धींमधले सामने तितकेच महत्त्वाचे असतात. पण तेव्हाची अटीतटीची स्पर्धा आज पाहायला मिळत नाही.

या वर्ल्डकपनंतर लगेच भारत-पाकिस्तान यांच्यात 'फ्रेंडशिप सीरिज'सुद्धा झाली होती. एकदा भारताने पाकिस्तानचा ऐतिहासिक दौरा केला होता आणि त्यानंतर पाकिस्तानचा संघ भारतात आला होता.

पण तेव्हापासून सामने एका तटस्थ ठिकाणीच झाले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही देशांमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. अशा परिस्थितीत 16 जूनला नियोजित भारत-पाक वर्ल्डकप सामन्यावरही अनिश्चिततेचं सावट आहे.

आज सचिन, गांगुलीसह त्या काळचे अनेक खेळाडू प्रार्थना करत आहेत की हा तणाव निवळावा, दोन्ही देशांनी शस्त्रास्त्र टाकून बॅट-बॉल उचलावे आणि एकमेकांना युद्धभूमीत नाही तर क्रिकेटच्या मैदानात आव्हान द्यावं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)