पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान वर्ल्डकप मॅच होणार? सचिन तेंडुलकर म्हणाला...

    • Author, पराग फाटक आणि जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पुलवामा मधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघानं आगामी विश्वचषकातील पाकिस्तानविरोधी सामन्यात खेळावं की नाही, यावरून क्रिकेटविश्वात चर्चा सुरू आहे.

इंग्लंडमध्ये होणार असलेल्या वर्ल्डकपदरम्यान 16 जून रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत आणि पाकिस्तान लढत होणार आहे. पण या सामन्यावर भारताने बहिष्कार घालावा, अशी भूमिका फिरकीपटू हरभजन सिंगने मांडली होती.

"पाकिस्तानबरोबर कोणत्याही स्वरूपाचे संबंध ठेवण्याची गरज नाही. वर्ल्डकपमध्ये आपण पाकिस्तानविरुद्ध खेळायला नको. देश आपल्या सगळ्यांसाठी पहिला प्राधान्य आहे. आपल्या सैन्यदलाच्या पाठिशी भक्कमपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे," असं हरभजननं म्हटलं होतं.

पण भारताचे माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या मते, पाकिस्तानविरुद्ध सामन्यातून माघार घेणं भारतासाठी तोट्याचं ठरू शकतं.

सचिन तेंडुलकरने एका ट्वीटद्वारे म्हटलं आहे की "पाकिस्तानला वर्ल्डकपच्या मैदानात नमवण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे. उगाच त्यांना दोन पॉइंट देणे त्यांना टूर्नामेंटमध्ये मदत केल्यासारखं असेल.

"पण माझ्यासाठी माझा देश सर्वांत आधी येतो. आणि जो देशाचा निर्णय असेल, मी त्याचीच साथ देईल."

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत गावस्कर म्हणतात, "भारतानं या सामन्यातून माघार घेतली तर कुणाचा फायदा होईल? मी उपांत्य आणि अंतिम सामन्याविषयी बोलत नाहीये. पण कोण जिंकेल? पाकिस्तान जिंकेल, कारण त्यांना दोन गुण मिळतील."

"मी देशासोबत आहे. सरकारनं पाकिस्तानविरोधात सामना न खेळण्याचं ठरवलं, देशवासीयांना आपण पाकिस्तानशी खेळू नये असं वाटत असेल, तर मी त्याबाजूनं आहे. मी भावना समजू शकतो, पण या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहायला हवं," असं ते म्हणतात.

भारतानं आजवर वनडे विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचा प्रत्येक सामना जिंकला आहे, याकडे लक्ष वेधत गावस्कर म्हणतात, की "आपण न खेळता त्यांना दोन गुण बहाल करण्याऐवजी पाकिस्तानला हरवून त्यांची स्पर्धेतली वाटचाल रोखता येईल. त्यापेक्षा द्विपक्षीय मालिकांमध्ये न खेळल्यानं पाकिस्तानला सर्वाधिक नुकसान होईल."

भारत-पाकिस्तान सामना का ठरतो महत्त्वाचा?

सीमेनजीकच्या क्षेत्रात हिंसाचाराच्या घटना वाढल्याने दोन्ही देशातले संबंध ताणले गेले आहेत. यामुळे 2013 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतात किंवा पाकिस्तान इथे द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही.

मात्र ICCतर्फे आयोजित स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळतात. याचाच भाग म्हणून ICC वनडे वर्ल्डकप, ट्वेन्टी-20 वर्ल्डकप तसंच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मुकाबला होतो.

भारत-पाकिस्तान सामन्याला पारंपरिक द्वंद्वाची पार्श्वभूमी असल्याने संयोजकांच्या दृष्टीने हा सामना फार महत्त्वाचा असतो. हा सामना हाऊसफुल्ल असतो. जगभर लाखो चाहते टीव्हीच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद लुटतात. या सामन्याभोवतीच्या अर्थकारणावर स्पर्धेचं यश-अपयश अवलंबून असतं.

भारताने ही लढत सोडल्यास जाहिरातदार, प्रक्षेपण कंपनी यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. चाहत्यांनाही एक अव्वल दर्जाचा मुकाबला पाहायला मिळणार नाही.

वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धची लढत सोडली तर...

ICCच्या नियमावलीनुसार, एखाद्या संघाने विशिष्ट सामन्यावर बहिष्कार घातला तर तो संघ पराभूत झाला, अशी नोंद होते. मात्र दोन्ही संघ आणि ICC यांच्यात सविस्तर बोलणी होऊन तोडगा निघाल्यास दोन्ही संघांना समान गुण विभागून दिले जातात.

याआधी वर्ल्डकपमध्ये एखाद्या संघाने दुसऱ्या एका विशिष्ट संघाविरुद्ध किंवा विशिष्ट ठिकाणी खेळण्यास नकार दिल्याची उदाहरणं आहेत.

1996 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघांनी सुरक्षिततेच्या मुद्यावरून श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी श्रीलंकेत नागरी युद्ध सुरू होतं. त्यावेळी श्रीलंकेला संपूर्ण गुण बहाल करण्यात आले होते.

2003 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने रॉबटे मुगाबे यांच्या प्रशासनाला विरोध म्हणून झिम्बाब्वेत खेळण्यास नकार दिला होता. त्याच स्पर्धेत न्यूझीलंडने केनियात खेळण्यास असमर्थतता व्यक्त केली होती. कट्टरतावादी संघटनेने केनियात बॉम्बहल्ल्याची धमकी दिली होती.

मात्र भारत आणि पाकिस्तान संघांनी अद्याप अशी भूमिका घेतलेली नाही.

16 जून रोजीची नियोजित लढत झाली नाही तर भारतीय संघांचं गुणांच्या बाबतीत नुकसान होऊ शकतं. प्रक्षेपण वाहिनी, जाहिरातदार यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. जगातल्या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या क्रिकेट लढतींमध्ये या मॅचचा समावेश होतो.

2015 वर्ल्डकपमधली भारत-पाकिस्तान लढत 28.8 कोटी चाहत्यांनी पाहिली होती. या मॅचच्या माध्यमातून 110 कोटींची कमाई झाल्याचा दावा विविध आस्थापनांनी केला होता.

कारगिल युद्ध आणि भारत-पाक लढाई

भारतानं पाकिस्तानशी क्रिकेट खेळावं की नाही, यावरून याआधीही अनेकदा चर्चा झाली आहे. पण 1999 साली कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देश विश्वचषकात आमने-सामने आले होते.

दोन देशांचं सैन्य युद्धात गुंतलेलं असतानाच 8 जून 1999 रोजी मॅन्चेस्टरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट विश्वचषकाच्या सुपर-6 फेरीचा सामना झाला होता.

त्याविषयी क्रिकेट समीक्षक प्रदीप मॅगझिन यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, की "त्यावेळीही असंच वातावरण होतं की कदाचित हा सामना रद्द केला जाईल. आयोजकांना चिंता होती की युद्धाचा परिणाम या सामन्यावर होईल, पण तरीही सामना खेळवण्यात आला."

भारतानं त्यावेळी 47 धावांनी विजय मिळवला होता, तर 27 धावांत पाच विकेट्स काढणारा भारताचा वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद सामनावीर ठरला होता.

काय आहे BCCIची भूमिका?

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) विश्वचषकातल्या भारत-पाकिस्तान सामन्याविषयी अजून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. पण ICCच्या आगामी बैठकीत भारत हा मुद्दा उपस्थित करू शकतो. 27 फेब्रुवारीपासून दुबईत ICCची बैठक होणार असून, BCCIचे CEO राहुल जोहरी त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

पण ICCकडे हा विषय नेला किंवा पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढण्याची मागणी केली, तरी भारताचं नुकसान होण्याची शक्यता सुनील गावस्करांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे.

"BCCI असा प्रयत्न करू शकते, पण त्यानं काही होणार नही. इतर देशांनीही त्याला मान्यता द्यायला हवी. इतर देश म्हणू शकतात, की हा त्यांचा आपसातला मुद्दा आहे, आणि त्यांनीच हा प्रश्न सोडवायला हवा. आम्ही त्यात पडू शकणार नाही."

सरकारच्या परवानगीशिवाय पाकिस्तानशी क्रिकेट सामने होणार नाहीत, असं IPLचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितलं. "एखादा देश दहशतवादाचं समर्थन करत असेल तर त्याचा खेळावरही परिणाम होतो. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. सरकारची अनुमती असल्याशिवाय पाकिस्तानशी क्रिकेट सामने आयोजित होऊ शकत नाहीत."

वर्ल्डकपमध्ये होणार असलेल्या भारत-पाकिस्तान लढतीविषयी मात्र शुक्ला यांनी ठोस उत्तर दिलं नाही. "वर्ल्डकपचं आता सांगता येणार नाही. वर्ल्कपमधील सामन्यासाठी अजून बरेच दिवस बाकी आहेत. काय होतंय ते पाहू या," असं त्यांनी सांगितलं.

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळायला नको, असं मुंबईस्थित क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे (CCI) सचिव सुरेश बाफना यांनी म्हटलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर CCIने पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांची तसबीरही झाकली आहे.

क्रिकेट पत्रकार अयाझ मेमन यांना वाटतं की, "जर पाकिस्तानकडून काही चांगला संकेत मिळाला आणि दोन देशांमधले संबंध थोडे सुधारले, तर सामना होऊ शकतो. पण सध्या जसं वातावरण देशात आहे, त्यामुळं विश्वचषकातल्या या सामन्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

"खेळाला शक्यतो राजकारणापासून दूर ठेवायला हवं, असं मला वाटतं, पण अनेकदा अशा घटना घडतात, जेव्हा राजकारण खेळापासून दूर ठेवता येत नाही," ते सांगतात.

वर्ल्डकपमध्ये भारताचं पारडं जड

वनडे वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान लढतींमध्ये भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. दडपणाच्या अशा या मुकाबल्यात भारतीय संघाने नेहमीच बाजी मारली आहे. 50 षटकांच्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या सहा लढतीत भारतीय संघच विजयी ठरला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)