You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विदर्भाच्या रणजी करंडक विजयाची 9 वैशिष्ट्यं
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
फैझ फझलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भ संघाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. नागपूरच्या जामठा मैदानावर तुल्यबळ सौराष्ट्रला 78 धावांनी नमवत विदर्भने बाजी मारली.
विदर्भच्या विजयाची ही नऊ वैशिष्ट्यं
- विदर्भने गेल्या वर्षी दिल्लीला हरवत जेतेपदाची कमाई केली होती. विदर्भाच्या या वाटचालीचं कौतुक झालं. मात्र त्याचवेळी ते एका हंगामाचा चमत्कार ठरू नयेत अशी चर्चा सोशल मीडियावर होती. विदर्भने सातत्यपूर्ण खेळ करत आम्ही एका हंगामाचा चमत्कार नाही हे सिद्ध केलं.
- रणजी क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे धावांची टांकसाळ उघडणारा वसिम जाफर यंदाही विदर्भसाठी रनमशीन ठरला. वसिमने यंदा रणजी स्पर्धेत खेळताना 11,000 धावांचा टप्पा पूर्ण केला. वसिमने 4 शतकं आणि 2 अर्धशतकांसह यंदाच्या हंगामात हजार धावांचा टप्पाही गाठला. चाळिशीतही धावांची भूक असणाऱ्या वसिमने फिट राहण्याकरता आहारात बदल केलं. जंक फूडला पूर्णत: सोडणाऱ्या वसिमने संध्याकाळी सहानंतर खाणं बंद केलं. वसिम जाफरने रणजी करंडक स्पर्धेच्या दहा अंतिम लढती खेळल्या आहेत आणि दहाही सामन्यांमध्ये जाफरच्या संघाने जेतेपद पटकावलं आहे.
- डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने फिरकीच्या बळावर विदर्भच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. अंतिम लढतीत टीम इंडियाचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावात बाद करत आदित्यने सामन्याचं पारडं विदर्भच्या दिशेने झुकवलं.
- विदर्भने यंदा तीन सामन्यांमध्ये डावाने विजय मिळव वर्चस्व सिद्ध केलं. रणजी करंडक स्पर्धेची 41 जेतेपदं नावावर असणाऱ्या बलाढ्य मुंबई संघाला डावाच्या फरकाने चीतपट करत विदर्भने सर्वसमावेशक खेळाचा प्रत्यय घडवला.
- विदर्भने यंदाच्या रणजी हंगामात एकही सामना गमावला नाही. विदर्भने एकूण सामने खेळले. यापैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला तर पाच सामने अनिर्णित राहिले.
- यंदाच्या हंगामात विदर्भाची सलामीची लढत महाराष्ट्र संघाविरुद्ध होती. गहुंजे येथील मैदानावर झालेल्या लढतीत महाराष्ट्राच्या 343 धावांसमोर खेळताना विदर्भचा पहिला डाव 120 धावांतच गडगडला होता. गतविजेत्या विदर्भ संघावर फॉओऑनची नामुष्की ओढवली. मात्र दुसऱ्या डावात 500 धावांची मजल मारत विदर्भने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.
- टीम इंडियासाठी खेळत असल्याने उमेश यादव यंदाच्या हंगामातील बहुतांश लढती खेळू शकला नाही. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यांनंतर उमेश मायदेशी परतला. विश्रांती न घेता तो विदर्भसाठी खेळण्यासाठी उतरला. उमेशने उत्तराखंडविरुद्ध 9 विकेट्स घेत विदर्भला शानदार विजय मिळवून दिला. उपांत्य फेरीत केरळविरुद्धच्या निर्णायक लढतीत, गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर उमेशने 12 विकेट्स पटकावत एकहाती सामन्याचं पारडं फिरवलं.
- विकेटकीपर अक्षय वाडकरने यंदाच्या हंगामात तीन शतकं आणि एका अर्धशतकासह उपयुक्तता सिद्ध केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत अक्षयने फलंदाजीत जबरदस्त मेहनत करत संघाची फलंदाजी मजबूत केली.
- चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार टेस्ट मिळून 31 तास खेळपट्टीवर ठाण मांडला होता. चेतेश्वर पुजाराने मॅरेथॉन खेळी साकारत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना जेरीस आणलं होतं. पुजाराच्या दिमाखदार खेळाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियात पहिलावहिला कसोटी मालिका विजय साकारला.
- या दौऱ्यानंतर पुजारा झटपट मायदेशी परतला. उपांत्य लढतीत त्याने कर्नाटकविरुद्ध शतकी खेळी साकारत सौराष्ट्रला विजय मिळवून दिला. अंतिम लढतीत विदर्भने पुजाराला निरुत्तर केलं. विदर्भने पुजारासाठी खास डावपेच आखले. याचा परिणाम म्हणजे पुजारा पहिल्या डावात एक धाव केली तर दुसऱ्या डावात तर तो भोपळाही फोडू शकला नाही. ऑस्ट्रेलियापेक्षा चोख अभ्यास करत विदर्भने सौराष्ट्रच्या प्रमुख अस्त्राला निष्प्रभ केलं.
जेतेपदापर्यंतचा प्रवास
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)