You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुलवामा: भारताने पाकिस्तानविरुद्धचा वर्ल्डकप सामना नाही खेळला तर...
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जर तुम्ही भारतीय माध्यमांमधल्या हेडलाइन्स वाचल्या असतील तर भारत-पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी मँचेस्टरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप सामन्यावर भारत कदाचित बहिष्कार टाकेल, असं जाणवू शकेल.
काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात 40 जवानांचा मृत्यू झाल्यानंतर असा विरोध केला जात आहे. पाकिस्तानातील जैश ए महम्मद कट्टरपंथी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर बंदी घालण्यात यावी यासाठी भारत आयोजकांवर दबाव आणत असल्याचंही सांगण्यात येत आहे. हे असंच होईल, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
या 46 दिवस चालणाऱ्या स्पर्धेला भारताच्या विनंतीवरून इतर 8 देशांचे संघ का धोक्यात आणतील किंवा त्यांचे पाकिस्तानशी असणारे क्रीडा संबंध धोक्यात आणतील, असा प्रश्न आहे.
भारतात क्रिकेटचं नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी "क्रिकेट खेळणाऱ्या देशांनी दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या देशाशी संबंध तोडावेत, यासाठी प्रयत्न केले जातील," असं म्हटलं आहे.
16 जूनच्या सामन्याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही, असंही या पदाधिकाऱ्याने सांगितलं.
पुलवामा हल्ल्यामुळं भारतात निर्माण झालेला संताप आणि उद्रेकामुळं नरेंद्र मोदी सरकारवर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी दबाव वाढत आहे. दक्षिण आशियातील या दोन अण्वस्त्रधारी देशांमधील क्रिकेट संबंधांवर राजकीय संबंधांचा नेहमीच परिणाम राहिला आहे.
मुंबईत 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. त्यापूर्वीही दोन्ही देशांनी एकमेकांशी क्रिकेट न खेळण्याची अनेकदा वेळ येऊन गेली आहे.
उदाहरणार्थ, दीर्घकाळ शत्रुत्वाच्या कालखंडानंतर 18 वर्षांनी 1978मध्ये दोन्ही देशांमधलं क्रिकेट सुरू झालं. जगातील सर्वांत लाभदायक क्रिकेट स्पर्धा मानल्या जाणाऱ्या इंडियन प्रिमिअर लीगमधून पाकिस्तानी खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आलं आहे.
जॉर्ज ऑरवेलनं अशा प्रकारच्या खेळांना 'वॉर मायनस शूटिंग' असं संबोधलं होतं. सध्या भारत आणि पाकिस्तानमधलं शत्रुत्व पाहिलं तर त्याचं वर्णन अनेक जण 'वॉर मायनस मिसाइल' असं करतील.
यापूर्वीही भारत-पाकिस्तान यांमधील खेळ देशभक्ती आणि अंधराष्ट्रीयतेने भारल्याचं दिसून आलं आहे. पूर्वी उजव्या विचारांच्या लोकांकडून दिल्लीमधील खेळपट्टीही उखडण्यात आली होती.
अहमदाबाद मधील एका सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंना हेल्मेट घालून क्षेत्ररक्षण करावं लागलं होतं तर कराचीच्या स्टेडियममध्ये एकदा जाळपोळही झाली होती.
'A Corner of Foreign Field' या भारतीय क्रिकेटवरील पुस्तकात लेखक रामचंद्र गुहा लिहितात, "1947च्या पूर्वी आणि त्यानंतरही हिंदू आणि मुस्लीम यांच्यामध्ये असणाऱ्या मतभेदांची सावली नेहमीच खेळाच्या मैदानांवर पडली आहे."
जूनमध्ये नियोजित वर अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. सामन्यांच्या 25 हजार तिकिटांसाठी जवळपास 5 लाख क्रीडाप्रेमींनी मागणी नोंदवली आहे. अंतिम सामना पाहाण्यासाठी 2 लाख 70 हजार लोकांनी तिकिटाची मागणी केली आहे.
"ही स्पर्धा म्हणजे कदाचित जगातील सर्वांत मोठी क्रीडा स्पर्धा असावी," असं मत स्पर्धेचे संचालक स्टीव्ह एल्वर्दी यांनी सांगितलं.
पाकिस्तानविरोधात न खेळल्यामुळं गुण गेले तरी भारताला फारसा फरक पडणार नाही, असं सामन्यावर बहिष्कार घालणाऱ्यांचं म्हणणं आहे. पण सचिन तेंडुलकर, सुनील गावसकरसह अनेकांनी स्पष्ट केलं आहे की सामना न खेळणं, हे पाकिस्तानला उगाच दोन गुण देण्यासारखं होईल.
पण हे काही पहिल्यांदाच होतंय असं नाही. झिम्बाब्वेमध्ये जाणं धोकादायक आहे, असं वाटल्यामुळं हरारे येथील सामना दुसरीकडे हलविण्याची इंग्लंडची मागणी होती. मात्र ती पूर्ण न झाल्यामुळं इंग्लंड संघाला खेळण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळं इंग्लंडनं 4 गुण गमावले होते.
पण वर्ल्ड कपमधील सर्वांत मोठा आणि बहुप्रतीक्षित सामना रद्द होणं, यामुळे स्पर्धेचं नुकसान करणारं आहे.
भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा नेहमी पराभवच केला आहे. 1996 साली कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताचा 47 धावांनी विजय झाला होता.
सामन्याच्या दिवशी 6 पाकिस्तानी सैनिक आणि 3 भारतीय अधिकारी कारगिलमध्ये मारले गेले होते.
लेखक आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर म्हणतात, "यंदा सामना न खेळल्यामुळं केवळ दोन गुणांचं नुकसान होईल असं नाही. पण नाही लढलो तर ते शरणागती पत्करल्यासारखं होईल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)