You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुलभूषण जाधव सुनावणी: भारत-पाकिस्तानमधल्या खडाजंगीत कसाबचा उल्लेख
कुलभूषण जाधव यांच्याविरोधातला पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयातला खटला रद्द करून सिव्हिल कोर्टमध्ये याची सुनावणी व्हावी, तसंच भारतीय दूतावासाला त्यांच्याशी संपर्क साधण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी आज भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली.
2016 मध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून अटक करण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. हेरगिरी आणि पाकिस्तानविरुद्ध दहशतवादी कटात सामील असण्याच्या आरोपांखाली पाकिस्तानच्या न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
जाधव यांचा खटला निष्पक्ष चाललाच नाही, असा आरोप करत भारताने त्यांच्या सुटकेसाठी हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर सोमवारपासून ही चार-दिवसीय सुनावणी सुरू आहे. सध्या पुलवामा हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध अधिकच ताणलेले आहेत.
भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली. आंतरराष्ट्रीय सुनावणीच्या पहिल्याच दिवशी साळवे यांनी जाधव यांची फाशीची शिक्षा माफ करावी आणि त्यांना तत्काळ सोडवावं, अशी मागणी केली.
"पाकिस्तानकडे जाधव यांच्याविरोधात बळजबरीने तयार केलेल्या पुराव्यांशिवाय काहीही नाही," असं भारताचं म्हणणं आहे.
"आंतरराष्ट्रीय न्यायालयातल्या चौकशीपासून वाचण्यासाठी पाकिस्तान कुलभूषण जाधव यांचा वापर करत आहे. देशातल्या कायद्याचं कारण देऊन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्यांच उल्लंघन करू शकत नाही," असंही साळवे म्हणाले.
मुंबई हल्ला आणि कसाबचा उल्लेख
"कुलभूषण जाधव प्रकरणातली सुनावणी पाकिस्ताननं 4-5 महिन्यांत पूर्ण केली. मग मुंबई दहशतवादी हल्ल्यात 150 लोकांचा मृत्यू झाला त्याचं काय झालं?" असा सवाल हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात विचारला.
भारताच्या सुप्रीम कोर्टानं अजमल कसाबबाबत दिलेल्या निकालाचाही साळवे यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, "कसाब प्रकरणात सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावताना भारतातल्या कनिष्ठ न्यायलयात दिलेल्या साक्षींचीही चौकशी केली. याला म्हणतात पूर्ण न्यायदान."
दुसऱ्या बाजूला भारताच्या दाव्याला उत्तर देताना, जाधव यांच्य सुटकेची भारताची मागणी 'अजब' आहे, असं म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या असभ्य भाषेवर भारताचा आक्षेप
पाकिस्तान त्यांची बाजू मांडताना वारंवार shameless (निर्लज्ज), nonsense (मूर्खपणा), digraceful (लज्जास्पद) अशा शब्दांचा वापर केला. यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला आहे.
"आंतरराष्ट्रीय न्यायलयात पाकिस्तानने केलेल्या अपमानास्पद भाषेवर भारत तीव्र आक्षेप नोंदवत आहे. भारताची संस्कृती त्यांना त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची मुभा देत नाही."
दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायलायतली ही सुनावणी एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. कुलभूषण जाधव प्रकरणातला आंतरराष्ट्रीय न्यायलयातला निकाल या वर्षी मे-जूनच्या दरम्यान येणं अपेक्षित आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)