You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईच्या आर्चबिशप यांनी 'अत्याचार पीडितांना निराश केलं'
- Author, प्रियंका पाठक
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कॅथलिक चर्चच्या सगळ्यांत वरिष्ठ कार्डिनलपैकी एक आणि बाल लैंगिक शोषणासंदर्भात व्हॅटिकनतर्फे आयोजित परिषदेच्या संयोजकांमध्ये समावेश असलेले ओसवाल्ड ग्रासिअस यांनी त्यांच्याकडे आलेलं लैंगिक शोषणाचं प्रकरण अधिक योग्य पद्धतीने हाताळता आलं असतं, अशी कबुली दिली आहे.
मुंबईचे आर्चबिशप असलेल्या ओसवाल्ड ग्रासिअस यांनी बीबीसीला सांगितलं की बाल लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणी त्यांनी वेळेवर कारवाई केली नाही तसंच आरोपांसंदर्भात पोलिसांना कल्पना दिली नाही.
देशातील सगळ्यात वरिष्ठ पाद्री आणि व्हॅटकिनच्या बाल लैंगिक शोषणासंदर्भातील परिषदेचे महत्त्वपूर्ण संयोजक कार्डिनल ओसवाल्ड ग्रासिअस यांनी बाल लैंगिक प्रकरणाची तक्रार गांभीर्याने घेतली नाही, असा आरोप पीडित आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींनी केला आहे.
धर्मगुरूंकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत कॅथलिक चर्चमध्ये भीतीचं वातावरण असतं आणि त्याबाबत मौन बाळगलं जातं, असं भारतातील कॅथलिक सांगतात. ज्यांनी याविरोधात बोलण्याचं धाडस दाखवलं आहे, त्यांनी हा भयंकर अनुभव असल्याचं म्हटलं आहे.
पीडितांना योग्य वेळेत मदत तसंच पाठिंबा देण्यात कार्डिनल अपयशी ठरल्याच्या दोन स्वतंत्र घटना बीबीसीच्या हाती लागल्या आहेत. यापैकी पहिली घटना मुंबईतली चार वर्षांपूर्वीची म्हणजेच 2015ची आहे.
त्या संध्याकाळी पीडित व्यक्तीचं आयुष्य पूर्णत: बदललं. त्या आईचा मुलगा चर्चमधील प्रार्थना आटोपून घरी परतला. चर्चमधील पॅरिश प्रीस्टने बलात्कार केल्याचं त्या मुलाने आईला सांगितलं.
"हे ऐकल्यावर काय करावं हे मला समजेना," असं पीडित मुलाच्या आईने सांगितलं. आईला कल्पना नव्हती, पण या घटनेनंतर मुलाची आई आणि भारतातील कॅथलिक चर्च यांच्यात खडाजंगी होणार हे स्पष्ट झालं.
मुलाने त्याच्यावरच्या अत्याचाराबद्दल सांगितल्यानंतर आईने कॅथलिक चर्च व्यवस्थेतील मुंबईतल्या सगळ्यांत अव्वल अधिकारी व्यक्तीशी संपर्क केला. कथित बलात्काराचं समजल्यानंतर तीन दिवसांनी पीडित मुलाचे कुटुंबीय मुंबईचे आर्चबिशप आणि कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसिअस यांना प्रत्यक्ष भेटले. त्यावेळी कार्डिनल ग्रासिअस हे कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया आणि फेडरेशन ऑफ एशियन बिशप्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष होते. ते पुढचे पोप ठरू शकतात, असं अनेकांना वाटायचं.
विशेष म्हणजे त्या आठवड्यात व्हॅटिकनमध्ये लैंगिक शोषणासंदर्भात होणाऱ्या जागतिक परिषदेच्या प्रमुख संयोजकांपैकी ते एक होते
चर्चमधील व्यक्तींकडूनच लैंगिक शोषणाचे प्रकार हा आधुनिक काळातला व्हॅटिकनसमोरचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे. त्या परिषदेचं फलित काय, यावर कॅथलिक चर्चची विश्वासार्हता अवलंबून होती. गेल्या वर्षभरात लैंगिक शोषणाच्या तक्रारींनी कॅथलिक चर्च यंत्रणेला ग्रासलं आहे.
उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या भागांमध्ये कॅथलिक चर्चकडून लैंगिक शोषणाच्या तक्रारींना पुरेशी प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र आशियाई देशांमध्ये अशा तक्रारी आणि प्रकरणं दबलेलीच राहतात. भारतासारख्या देशात चर्चच्या व्यक्तीकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत बोलण्यावर सामाजिक अलिखित प्रतिबंध आहे.
अल्पसंख्याक ख्रिश्चन धर्मीयांची संख्या 2.8 कोटी इतकी आहे. मात्र भीतीचं वातावरण आणि मौन यामुळे प्रश्नाचं गांभीर्य टिपलं जाणं अशक्य आहे.
कार्डिनल ओसवाल्ड ग्रासिअस आणि त्यांचे सहकारी शिकागोचे कार्डिनल ब्लेस कपिच लैंगिक शोषणासंदर्भातील परिषदेच्या चार सदस्यीय संयोजन समितीचे सदस्य आहेत. लहान मुलांच्या हक्कांचं पालन व्हावं आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी रोम येथील परिषदेनंतर लैंगिक शोषणासंदर्भात कार्यवाहीचा मार्ग पक्का करण्यात येईल, असं आश्वासन कार्डिनल यांनी दिलं होतं. चर्चच्या उत्तरदायित्वासंदर्भात परिषदेच्या दुसऱ्या दिवशी कार्डिनल चर्चा करणार आहेत.
अशा संवेदनशील विषयावर बोलण्याची जबाबदारी कार्डिनल ओसवाल्ड यांच्याकडे सोपवण्यात आल्याने देशातील काहीजण नाराज आहेत. लहान मुलं तसंच महिलांचं लैंगिक शोषण होण्यापासून रोखण्यासंदर्भात कार्डिनल ओसवाल्ड यांची कामगिरी वादाच्या भोवऱ्यात आहे. त्यांच्याकडे मदतीसाठी दाद मागणाऱ्या पीडितांनी तसंच त्यांच्या कुटुंबीयांनी कार्डिनल समाधानकारक मदत करत नसल्याचं म्हटलं आहे.
आई म्हणाली, "प्रीस्ट माझ्या मुलासोबत काय वागले याची कल्पना मी कार्डिनल यांना दिली. माझा मुलगा वेदनेने कळवळतो आहे, हेही सांगितलं. हे ऐकल्यावर त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली. त्यांना रोमला जायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी माझं मन दुखावलं गेलं. एका आईची व्यथा घेऊन मी त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने गेले होते. ते माझ्या मुलाचा, त्याच्या आरोग्याचा विचार करतील अशी आशा होती. ते त्याला न्याय मिळवून देतील असंही वाटलं होतं. पण त्यांना आमच्यासाठी वेळच नव्हता. त्यांना रोमला जाण्याचीच चिंता होती."
मुलासाठी वैद्यकीय मदत मिळावी अशी विनंती केल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं मात्र तीही मिळाली नाही. दुसरीकडे ''त्यांच्या मुलाबाबत जे घडलं ते ऐकणं अत्यंत वेदनादायी आहे. त्या मुलाला वैद्यकीय मदतीची गरज आहे याची मला कल्पना नव्हती. त्यांनी मदतीसंदर्भात विचारलं असतं तर मदत नक्कीच मिळाली असती'', असं कार्डिनल यांनी बीबीसीला सांगितलं.
चर्च प्रशासनाला याप्रकरणाची कल्पना न देता रोमला रवाना झाल्याची कबुली कार्डिनल यांनी दिली. पोलिसांना याप्रकरणाची कल्पना न दिल्याने कार्डिनल ग्रेसिअस यांच्याकडून पॉक्सो अर्थात बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन झालं असण्याची शक्यता आहे.
या कायद्यानुसार, कंपनी किंवा संघटनेचे प्रमुख हे त्यांच्या अखत्यारितील व्यक्तीबरोबर झालेल्या शोषणाची माहिती देण्यात अपयशी ठरल्यास, संबंधित व्यक्तीला एक वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
बिशप यांना दुसऱ्या दिवशी दूरध्वनी केल्याचं कार्डिनल यांनी सांगितलं. पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी स्वत:हूनच पोलिसांकडे तक्रार केल्याचं बिशप यांनी कार्डिनल यांना सांगितलं.
पोलिसांना याप्रकरणाची माहिती न दिल्याबद्दल तुम्हाला पश्चात्ताप वाटतो का असं आम्ही कार्डिनल यांना विचारलं. ते म्हणालं, ''मी प्रामाणिक आहे, पण मला शंभर टक्के खात्री वाटत नाही. मी याप्रकरणी कार्यवाही करायला हवी. पोलिसांना याप्रकरणाची कल्पना द्यायला हवी होती."
ज्या व्यक्तीवर आरोप करण्यात आले आहेत, त्यांच्याशी बोलून आरोपांमधली शहानिशा करणं हेही माझं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले.
पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरची भेट घेतली. डॉक्टरांनी मुलाकडे पाहिलं आणि त्याच्याबरोबर काहीतरी अनुचित घडलं आहे असं त्यांनी सांगितलं. हे पोलीस प्रकरण आहे. तुम्ही याप्रकरणी तक्रार करा किंवा मी करतो असं डॉक्टर म्हणाले. म्हणूनच कुटुंबीयांनी त्या रात्रीच पोलीस स्टेशन गाठलं.
पोलिसांनी केलेल्या वैद्यकीय परीक्षणानंतर मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. संबंधित प्रीस्टविरोधात कार्डिनल यांच्याकडे तक्रार दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, असं सध्याच्या प्रीस्ट यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
"या घटनेपूर्वी काही वर्षं आधीच मी संबंधित प्रीस्ट यांना भेटलो. बिशप यांच्या अधिकारक्षेत्रात त्यावेळी हीच चर्चा सुरू होती. आणि तरीही त्यांची एका चर्चमधून दुसऱ्या चर्चमध्ये नियुक्ती होत होती," असं त्या प्रिस्टने मला सांगितलं.
दरम्यान या सगळ्याबद्दल थेट काहीही माहिती नसल्याचं कार्डिनल यांनी बीबीसीला सांगितलं. त्यावेळा झालेला संवाद आठवत नसल्याचं कार्डिनल यांनी सांगितलं. संबंधित प्रीस्ट यांचं नाव वादग्रस्त किंवा संशयास्पदपणे घेतलं जात असल्याचं आठवत नाही, असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
लैंगिक शोषणप्रकरणी कार्डिनल यांनी वेळेत कार्यवाही केली नसल्याची अन्य उदाहरणं आहेत का याविषयी आम्ही शोध घेतला.
दशकभरापूर्वी असंच एक प्रकरण घडल्याचं उघड झालं. कार्डिनल मुंबईचे आर्चबिशप झाल्यानंतर त्यांच्यासमोर हे प्रकरण आलं होतं. मार्च 2009 मध्ये एका महिलेने एका अन्य प्रीस्टने लैंगिक शोषण केल्याची तक्रार कार्डिनल यांच्यासमोर मांडली होती.
संबंधित प्रीस्टविरोधात कार्डिनल यांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्या महिलेने कॅथलिक महिला कार्यकर्त्यांना याची कल्पना दिली. दबाव वाढल्यामुळे कार्डिनल यांनी डिसेंबर 2011 मध्ये चौकशी समितीची स्थापना केली. सहा महिन्यांच्या चौकशीनंतर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि आरोपी प्रीस्ट अजूनही कार्यरत आहे.
कार्डिनल यांना तीन कायदेशीर नोटिसा बजावाव्या लागतील. त्यांनी कार्यवाही केली नाही तर कोर्टात जाऊ असं त्यांना सांगावं लागतं, असं व्हर्जिनिया सलदाना यांनी सांगितलं. सलदाना या गेल्या दोन दशकांपासून विविध चर्चच्या महिला गटाबरोबर काम करत आहेत.
कार्डिनल यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले, "प्रीस्ट माझं ऐकत नाहीत."
यादरम्यान चर्चमधून बाहेर पडल्याचं सलदाना यांनी सांगितलं. हा माणूस चर्चमध्ये लोकांच्या प्रार्थना घेत असल्याचं मी पाहू शकत नाही. तिथे जावं असं मला वाटत नाही, असं सलढाणा म्हणाल्या.
यथावकाश त्या पॅरिशमधून प्रीस्टची हकालपट्टी करण्यात आली. मात्र त्यांना पद का सोडावं लागलं याची माहिती कोणालाही देण्यात आली नाही. कार्डिनल यांनी ऑक्टोबर 2011 मध्ये वैयक्तिक पातळीवर शिक्षा निश्चित केली.
कारवाईसाठी लागलेला वेळ आणि देण्यात आलेली शिक्षा यासंदर्भात कार्डिनल यांना विचारलं असता ते म्हणाले, हे गुंतागुंतीचं प्रकरण आहे. कॅथलिक विद्यालयात वेळ व्यतीत केल्यानंतर आरोपी प्रीस्टना पुन्हा चर्चमध्ये स्वतंत्र पदभार देण्यात आला. शिवाय ते नेहमीप्रमाणे चर्चमधील रोजचे धार्मिक कार्यक्रमही घेऊ लागले.
दरम्यान ज्या संस्थेभोवती अनुभवविश्व जोडलं गेलं आहे त्या चर्चने वाऱ्यावर सोडून दिल्याची भावना पीडित मुलाच्या कुटुंबीयांच्या मनात आहे.
ही आमची एकाकी लढाई आहे. आम्हाला चर्चमधून बहिष्कृत करण्यात आलं आहे. समाजाकडूनही एकाकी पाडण्यात आलं आहे असं पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
"पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, आम्ही जेव्हाही चर्चमध्ये जायचो तेव्हा बाकीची माणसं आमच्याशी बोलत नसत. प्रार्थनेवेळी आमच्याबरोबर बसायलाही ते तयार नसत. मी कुणाच्या बाजूला जाऊन बसले तर ती माणसं तिथून निघून जात," असं पीडित मुलाच्या आईने सांगितलं.
ज्या हीन पद्धतीची वागणूक आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही ते चर्च सोडून जायचा निर्णय घेतला. पण हे एवढं कठीण होऊन बसलं की आम्हाला आमचं घर आणि परिसर सोडावा लागला. आम्ही सगळं मागे ठेऊन बाहेर पडलो.
अशा पद्धतीच्या वागणुकीमुळे पीडित तसंच कुटुंबीयांसाठी लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणं अवघड असल्याचं चर्चच्या सदस्यांनी सांगितलं. समाजाकडून होणारी हेटाळणी आणि धर्मगुरूंकडून न मिळणारा पाठिंबा यामुळे अनेक पीडितांच्या व्यथा अनुत्तरित राहतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)