अपर्णा रामतीर्थकर फक्त महिलांनाच का देताहेत उपदेशाचे डोस?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्रीसंग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते," या इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा कीर्तनकारांवर चर्चा सुरू झाली. त्यात इंदुरीकरांसोबत आणखी एक नाव चर्चिलं जाऊ लागलं - अपर्णा रामतीर्थकर.

अपर्ण रामतीर्थकरही इंदुरीकरांप्रमाणे लोकप्रिय वक्त्या आहेत. त्याही शास्त्रांचा आधार घेऊन हिंदू धर्म, संस्कृती आणि भारतीय परंपरेबद्दल बोलतात. त्यांचा श्रोताही मुख्यतः ग्रामीण आहे आणि त्यांच्या तारखांचं बुकिंगही अनेक महिने आधीच झालेलं असतं, असं सांगतात. त्यांनाही यूट्यूबवर ऐकणारा मोठा वर्ग निर्माण होतोय. मुख्य म्हणजे त्या इंदुरीकर महाराजांपेक्षाही स्पष्टपणे स्त्रीपुरुष समानतेच्या विरोधात बोलतात.

अपर्णा रामतीर्थकर असं तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं, तर 'चला नाती जपूया', 'सासू-सुनेनी कसे रहावे', 'आई', 'एकत्र कुटुंब पद्धती आणि मुली' या विषयांवरच्या त्यांच्या व्याख्यानांच्या व्हीडिओंची यादी समोर येते. त्यांच्या या व्हीडिओंना लाखो व्ह्यूज आहेत.

पण अपर्णा रामतीर्थकर यांच्या व्याख्यानांमधील वक्तव्यांवर अनेक महिलांनीच आक्षेप नोंदवले आहेत. महिलांवर वर्षानुवर्षं लादलेली बंधनं गैर नाहीत, असं अपर्णा त्यांच्या व्याख्यानांमधून सांगतात. 'स्त्री मुक्ती नाही, तर स्त्री शक्तीवर बोलते,' असं त्या म्हणतात.

कोण आहेत अपर्णा रामतीर्थकर, त्यांची महिलांविषयीची मतं काय आहेत, महिलांनी त्यांच्यावर काय आक्षेप नोंदवले आहेत आणि या आक्षेपांवर अपर्णा रामतीर्थकर यांचं काय म्हणणं आहे, हे आता आपण सविस्तर पाहणार आहोत.

सुरुवातीला पाहूयात अपर्णा रामतीर्थकरांची वादांत सापडलेली किंवा स्त्रीपुरुष समानतेच्या विरोधात जाणारी काही विधानं:

  • "उंबऱ्याची मर्यादा असते मुलगी. बाईनं उंबरा ओलंडायचा नसतो. उंबरा म्हणजे मर्यादा."
  • "एक भारतीय स्त्री नुसत्या शिक्षणामुळे कधीच यशस्वी होऊ शकत नाही."
  • "498 आणि कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा इतका गैरवापर बायका करतात, की या कायद्यामुळे 10 लाख पुरुषांनी आत्महत्या केल्यात."
  • "पोरींनो डॉक्टर व्हा, इंजीनियर व्हा, वकील व्हा, शिक्षक व्हा, अंतराळात जा, पाताळात जा, कुठंपण जा, पण पोरींना भाकरी करता आलीच पाहीजे."
  • "चूल आणि मूल जोखड आहे? चूल आणि मूल जोखड असेल तर भारतीय स्त्रीचं अस्तित्व काय राहतं याचं उत्तर देऊ शकता? चूल हे अन्नपूर्णेचा मान आहे."
  • "चांगल्या घरातल्या लेकी-सुनांनी सूर्य मावळल्यानंतर आरशात बघायचं नसतं."
  • "आमच्या पिढीनं कधी वडिलांच्या अंगाला हात लावला नाही. आणि आज आपले एवढाले टाईट टाईट कपडे घालायचे, थ्री फोर्थ घालायचं, एवढसं वरचं घालायचं, पप्पा म्हणून गळ्यात पडायचं. पप्पा पुरुष आहेत ते लक्षात येत नाही? गाऊन घातल्यानं कसलं मोकळं वाटतं तुम्हाला?"
  • "मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार आहे, असं काहीतरी मुर्खासारखं पालकांच्या मनात असतं. पण मुलगी मुलासारखी वाढवता येते का हो?"
  • "बायकोनं नवऱ्याला चहा देतानाही थरथर कापलं पाहिजे, तीच खरी संस्कृती."
  • "लिव्ह-इन रिलेशनशिपमधील मुला-मुलींनी पुण्यात हैदोस घातलाय."

अपर्णा रामतीर्थकरांची अशी अनेक विधानं यूट्यूबवर सहज उपलब्ध आहेत. काहींना ही विधानं पटतातही. पण ही विधानं महिला स्वातंत्र्याच्या आड येत नाहीत का?

अपर्णा रामतीर्थकरांची अशी विधानं खटकल्यामुळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी त्यांना एक खुलं पत्र लिहिलं होतं. 'अॅड. अपर्णाताई रामतीर्थकर यांना खुलं पत्र' या आशयाचं हे पत्र 'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या मार्च महिन्याच्या (2019) अंकात प्रसिद्ध झालं होतं.

अपर्णा रामतीर्थकर यांच्याविषयी विचारल्यावर तेव्हा विद्या बाळ यांनी बीबीसी मराठीला सांगितलं होतं, "अपर्णा ताई उत्तम वक्त्या आहेत. त्यांच्या भाषणांना चांगली गर्दी जमते. पण त्यांनी सांगितलेल्या मुद्द्यांवर लोकं टाळ्या वाजवतात, हे मला खूप भयंकर वाटतं. याचं कारण असं की, सावित्रीबाई-ज्योतिबा फुले, फातिमा बी, आगरकर इथपासून आंबेडकरांपर्यंत विचारवंतांनी महाराष्ट्रामध्ये स्त्रियांनी शिकावं आणि कशासाठी शिकावं, यासाठी जे जे काही मांडलं, त्याच्यावर पूर्णपणे बोळा फिरवणारं 21व्या शतकातलं हे उत्तम उदाहरण आहे आणि याची मला खूप लाज वाटते."

अपर्णाताईंच्या व्याख्यानांमध्ये काय खटकतं, याविषयी विद्याताई म्हणाल्या होत्या, "ज्योतिबांनी स्त्रियांसाठी शाळा काढली तेव्हा ते असं म्हणाले होते की, स्त्रियांना माणसासारखं जगता येत नाही आणि म्हणून त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. जेणेकरून त्या विचार करतील आणि माणसासारखं जगू लागतील. अपर्णाताई म्हणतात, शिका, अंतराळात जा, पाताळात जा, पण घरात राहा, नवऱ्याची ख्यालीखुशाली बघा. अशा प्रकारचा रोख मला भयंकर धोकादायक वाटतो. याचं कारण असं की, घरही महत्त्वाचच आहे. पण ते फक्त बाईसाठीच महत्त्वाचं आहे का? घर जर दोघांचं आहे, तर घरामधल्या सगळ्या गोष्टी दोघांच्या, ही गोष्ट समतेला पुष्टी देणारी आहे की नाही?

"अपर्णाताई फक्त एकेरी वाहतूक करताना दिसतात. म्हणजे जे काही करायचं, सावरायचं, आवरायचं, बांधून घ्यायचं, मर्यादा पाळायच्या ते फक्त स्त्रियांनी. सगळ्या स्त्रियांनी स्वत:च्या आशा-आकांक्षांचा विचार न करता केवळ पुरुषाच्या सेवेत, पुरुषाच्या आज्ञेत, स्वत:ला बांधून ठेवावं, असं अपर्णाताईंना वाटतं," विद्याताईंनी पुढे सांगितलं.

अपर्णा ताई पुरुषांना कधी काही समजून सांगणार आहेत की नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

"21व्या शतकात स्त्रियांचं शिक्षण यशस्वी व्हावं, यासाठी इतके जोरदार प्रयत्न होत असताना स्त्रियांना मागे ओढून घरात कोंडणारं वक्तव्य कुणी करत असेल, तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे," असं त्या म्हणाल्या होत्या.

या आक्षेपांबद्दल अपर्णा रामतीर्थकरांचं काय म्हणणं आहे, ते आपण पुढे पाहणार आहोतच. पण आधी पाहूया अपर्णा रामतीर्थकर कोण आहेत ते.

कोण आहेत अपर्णा रामतीर्थकर?

अपर्णा रामतीर्थकर व्याख्यात्या असून सोलापूरमध्ये राहतात. महिन्यातून 25 दिवस त्या प्रवासात असतात, असं त्या सांगतात. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना शाळेत पाठवलं नाही, असं त्या सांगतात. त्याबद्दल त्यांनी व्याख्यान करताना दुःखही व्यक्त केलंय. पुढे त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं असं त्या सांगतात.

सोलापूरमधले पत्रकार सिद्धराम पाटील सांगतात, "अपर्णाताईंनी लग्नानंतर मुलासोबतच दहावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मुक्त विद्यापीठात पदवीचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर L.L.Bचं शिक्षण घेतलं. वकिलीची 1 ते 2 वर्षं प्रॅक्टिस केल्यानंतर आपण या व्यावसायिक कामातून महिलांना सामाजिक न्याय देऊ शकत नाही, असं लक्षात आल्यानंतर त्यांनी व्याख्यान द्यायला सुरुवात केली. यासाठी मग सुरुवात म्हणून त्यांनी सोलापूरमध्ये कौटुंबिक वादाच्या बळी ठरलेल्या महिलांसाठी मदत केंद्र सुरू केलं."

याव्यतिरिक्त त्यांनी पुण्यनगरी या वर्तमानपत्रात 'कुठं तरी चुकतंय' नावाची लेखमाला 3 ते 4 वर्षं लिहिली, असं पाटील सांगतात.

Association of Practicing Pathologists India आयोजित कार्यक्रमात अपर्णा रामतीर्थ यांनी म्हटलं होतं की "2003 सालची माझी डिग्री आहे. आज 2018. गेल्या 15 वर्षांत 1800 ते 2000 घटस्फोट वाचवण्यात मी यशस्वी झालेली आहे."

पत्रकार सागर सुरवसे सांगतात, "अरुण रामतीर्थकर हे अपर्णा रामतीर्थकर यांचे पती होय. ते सोलापूरच्या तरुण भारतमध्ये 'सडेतोड' नावाचं सदर लिहायचे. हे सदर त्याकाळी जहाल हिंदुत्ववादी म्हणून ओळखलं जायचं."

मी नाटकात काम केलं आहे, असा उल्लेख अपर्णा रामतीर्थकर त्यांच्या व्याख्यानांत करतात. मी अनाथाश्रम चालवते, एकेका दिवसाचं बाळ मी सांभाळते. असहाय्य स्थितीत जन्माला आलेली बाळं आम्ही सांभाळतो, असंही म्हणतात.

सुरवसे सांगतात, "अपर्णाताई या उत्तम नाटककार आहेत. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात त्यांनी पारधी समाजातल्या अनाथ मुलांसाठी भारतमाता आश्रमशाळा सुरू केली आहे."

पुढे ते सांगतात, "ग्रामीण महाराष्ट्रात त्यांच्या व्याख्यानांना प्रचंड मागणी असते. तीन-तीन वर्षं त्यांच्या व्याख्यानांची तारीख मिळण्यासाठी वाट पाहावी लागते."

आता पाहूया रामतीर्थकरांच्या व्याख्यानांमध्ये महिलांविषयी काय असतं ते.

रामतीर्थकरांच्या व्याख्यानात महिलांविषयी काय?

1.बाईनं उंबरा ओलांडायचा नसतो, कारण उंबरा म्हणजे मर्यादा, असं रामतीर्थकर एका व्याख्यानात म्हणतात.

त्या सांगतात, "कुटुंबात यशस्वी व्हायचं असेल तर मुलींकडे शिक्षणाशिवाय 5 गुण असले पाहिजेत, असं मला आईनं सांगितलं. आई म्हणाली तू आमच्या दोघांची मुलगी आहेस, श्वास आहेस, चार भींतीचा विश्वास आहे, उंबऱ्याची मर्यादा आहेस आणि तू माझ्या घराची प्रतिष्ठा आहेस. त्यामुळे तू चांगली मुलगी असली पाहिजे. उंबऱ्याची मर्यादा असते मुलगी. बाईनं उंबरा ओलंडायचा नसतो. उंबरा म्हणजे मर्यादा."

त्या विचारतात, "काय करशील मुली शिक्षण घेऊन? फारफार तर नोकरी लागेल, दागिने घेशील, नवऱ्याला घर बांधायला मदत करशील. पण एक भारतीय स्त्री नुसत्या शिक्षणामुळे कधीच यशस्वी होऊ शकत नाही. इंजिनियर झालेल्या मुलीचं घर 5 दिवस टिकत नाही. अशी कित्येक उदाहरणं आहेत. भारतीय स्त्री कुटुंब व्यवस्थेचा पाया आहे, त्यामुळे ती शिक्षणामुळे आर्थिक स्वावलंबी होते. पण यशस्वी कधीच होत नाही."

3. महिलांनी काहीही केलं तरी चालेल, पण त्यांना स्वयंपाक यायलाच हवा, असा रामतीर्थकरांचा आग्रह आहे.

एका ठिकाणी त्या म्हणतात, "पोरींनो डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, शिक्षक व्हा, अंतराळात जा, पाताळात जा, कुठंपण जा, पण पोरींना भाकरी करता आलीच पाहीजे. हा पोरींमधला सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे."

पुढे बोलताना त्या शिकलेल्या पुरुषांना लग्नाविषयी एक सल्ला देतात, "शिकलेल्या पुरुषांनो शिकलेली बायको घरात आणायची असेल, तर एकतर स्वयंपाक शिकून घ्या नाहीतर पार्सल बांधून आणायची तयारी ठेवा. बायकांनी आठवड्यातून एकदा भांडे घासलेच पाहिजेत. त्यामुळे घराला घरपण येतं."

4.मुलीनं बंधनात वावरायला हवं आणि तिला मुलासारखं वाढवता येत नाही, असं रामतीर्थकरांचं मत आहे.

"मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार आहे, असं काहीतरी मुर्खासारखं पालकांच्या मनात असतं. मुलगी आहेस मोठ्यानं बोलू नकोस, मुलगी आहेस दारात जाऊन उभी राहू नकोस, मुलगी आहेस खदाखदा हसून नको, मी मुलगी आहे हे माझ्या आईनं मला दिवसातून 100 वेळा सांगितलं. आज आपण याच्या उलट सांगत आहोत. मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार. पण मुलगी मुलासारखी वाढवता येते का हो?"

5. चांगल्या घरातल्या लेकी-सुनांनी सूर्य मावळल्यानंतर आरशात बघायचं नसतं, असं रामतीर्थकर म्हणतात.

"चांगल्या घरातल्या लेकी-सुनांनी सूर्य मावळल्यानंतर आरशात बघायचं नसतं. त्यामुळे केसांना संध्याकाळी मी कधी कंगवा लावत नाही. मी दिरासमोर कधी केस विंचरले नाही, 37 वर्षांचा माझा मुलगा आहे, त्याच्यासमोर कधी केस मोकळे सोडले नाही. मला बाईपणाचं भान नको का? आज कुठंही रस्त्यात केस विंचरताना दिसतात. कुठंही तो कंगवा पर्समधून काढायचा, हातात घ्यायचा, रस्त्यात, बसमध्ये कुठंही केस विचारायचे. आपण स्त्री असल्याचं भान नाही, संस्कारांचं भान नाही," रामतीर्थकर एका व्याख्यानात म्हणतात.

त्या म्हणतात, "498 आणि कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा इतका गैरवापर बायका करतात, की मला याचा अक्षरश कंटाळा आला आहे. या कायद्यामुळे 10 लाख पुरुषांनी आत्महत्या केल्यात. या कायद्यानं सगळी कुटुंबव्यवस्था ढासळायला लागली. सासऱ्या लोकांची आणि नवऱ्याची किंमतच राहिली नाही."

7.महिलांच्या कपड्यांवरही रामतीर्थकरांना आक्षेप आहे.

एका भाषणात त्या म्हणतात, "आयांनो, स्पर्शाचं अंतर मुलींना समजावून सांगा. मी 14 वर्षांची झाल्यावर माझ्या आईनं मला बजावलं होतं, घरात वावरणारे तुझे वडील, काका, मामा, आजोबा, भाऊ हे सगळे पुरुष आहेत. कुणाच्याही अंगाला चुकून हात लावायचा नाही. आमच्या पिढीनं कधी वडिलांच्या अंगाला हात लावला नाही. आणि आज आपले एवढाले टाईट टाईट कपडे घालायचे, थ्री फोर्थ घालायचं, एवढसं वरचं घालायचं, पप्पा म्हणून गळ्यात पडायचं. पप्पा पुरुष आहेत ते लक्षात येत नाही?"

पुढे त्या म्हणतात, "पुण्यातल्या सुना बरमुडा घालून फिरताहेत घरात. काय करायचं या मुलींचं? आजची सून गाऊनवर फिरते. ब्रिटिश रात्री गाऊन घालायचे आणि सकाळी बेडरूममधून बाहेर येताना वेल ड्रेस्ड यायचे. तू भाजी आणायला काय गाऊनवर जाते. गाऊन घातल्यानं कसलं मोकळं वाटतं तुम्हाला?"

8.मुलीच्या करिअरचा अर्थ समजावून सांगताना त्या म्हणतात, "मुलीचं करिअर, मुलीचं करिअर, असं पालक करत बसतात. काय असतं मुलीचं करिअर? स्त्रीमुक्तीचा डांगोरा पिटणाऱ्या बायका एक वाक्य फार चुकीचं बोलतात. चूल आणि मूल या जोखडातून बाई बाहेर काढायची. कशी? चूल आणि मूल जोखड आहे? चूल आणि मूल जोखड असेल तर भारतीय स्त्रीचं अस्तित्व काय राहतं याचं उत्तर देऊ शकता? चूल हे अन्नपूर्णेचा मान आहे.

"त्यामुळे मी आज तुम्हाला करिअरचा खरा अर्थ सांगते. करिअर म्हणजे चूल, मूल, सासरची माणसं, माहेरची माणसं, येणारी-जाणारी माणसं सगळ्यांना सांभाळून आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायंच आहे, तेच असतं करिअर. करिअरचे दुसरे काहीच अर्थ नाहीयेत."

अशा प्रकारची आणखीही अनेक विधानं यूट्यूबवर उपलब्ध आहेत.

'अपर्णाताईंचं महिलांना टार्गेट करणं योग्य'

अलका दराडे यांनी अपर्णा रामतीर्थकर यांच्या भाषणांवर आधारित 'आई की मॉम' हे पुस्तक लिहिलं आहे. अपर्णा रामतीर्थकर यांच्या व्याख्यानांच्या सीडीजचं हे पुस्तक आहे. महिलांवरील संस्कार कसे असावेत, याविषयी हे पुस्तक असल्याचं दराडे सांगतात.

रामतीर्थकर यांच्या महिलांविषयीच्या वक्तव्यांवर त्या सांगतात, "सध्याचं युग हे मॉडर्न आहे. मुली शिकताहेत, नोकरीला लागल्या की 40-50 हजार रुपये त्यांच्या हातात येतात. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य पाहिजे, असं त्यांना वाटायला लागतं. पण अपर्णा ताईंचे विचार भारतीय संस्कृतीप्रमाणे आहेत. या मुलींनी घरामध्ये व्यवस्थित रहावं, चांगले कपडे घालावे, असं ताई सांगतात. ताईंचे विचार खूप महत्त्वाचे आहेत, कारण यातून वाईट घटना घडत नाहीत. मुलींवर चांगले संस्कार निर्माण होईल, एक चांगली पीढी निर्माण होईल, यासाठी ताई हे सांगतात. मॉडर्न महिलेनं घरातले संस्कार विसरले नाही पाहिजेत. ते मनात ठेवूनच तिनं बाहेर पडावं. "

अपर्णा रामतीर्थकरांवरच्या आरोपांबद्दल विचारल्यावर त्या म्हणतात, "महिलांना टार्गेट केलं जातं हेसुद्धा बरोबर आहे. पण महिलांना का टार्गेट केलं जातं, हेसुद्धा पाहायला हवं. नाशिकमध्ये सुला वाईन फेस्टिव्हल झाला. तिथं चित्र-विचित्र कपडे घालून मुली आलेल्या, मुली दारू पीत होत्या. म्हणजे अंगात कमी कपडे घालून मुली दारु पीत होत्या. या संस्काराच्या विरोधात अपर्णाताई आहेत. त्या म्हणतात, मुलींनो असे कपडे तुम्ही घालता, मग का बरं मुलांची नजर तुमच्याकडे जाणार नाही. साडीमध्ये मुलगी जितकी सुंदर दिसते, तितकी कमी कपड्यांमध्ये सुंदर दिसतच नाही. शिवाय मुलींच्या कपड्यांवरून त्यांच्या घरातील संस्कार कळतात.

"आज समाजात मुलींना जे अवास्तव स्वातंत्र्य दिलं जातं, त्याच्यावर पालकांनी नियंत्रण आणावं, असं अपर्णाताईंचं म्हणणं आहे. अपर्णाताईंच्या दृष्टीनं पाहिलं तर त्यांचे विचार बरोबर वाटतात. भारतीय संस्कृती चांगली राहावी, असं ताईंना वाटतं. पण ज्यांना अतिव्यक्तिस्वातंत्र्य पाहिजे आहे, ते म्हणतात की अपर्णाताईंचे विचार बुरसटलेले आहेत," अलका दराडे पुढे सांगतात.

'रामतीर्थकर पुरुषांवर का नाही बोलत?'

सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी पवार 'पितृसत्ता तोड' नावाचा उपक्रम राबवत आहेत. अपर्णा रामतीर्थकर यांची भाषणं महिलांवर बंधन लादणारी आहेत, असा त्यांचा आक्षेप आहे.

त्या म्हणतात, "अपर्णा रामतीर्थकरांचे विचार वेगळे असू शकतात, त्याबद्दल मला काही ऑब्जेक्शन नाही. पण मला वैयक्तिक असं वाटतं की, त्यांची भाषणं महिलांवर बंधन लादणारी आहेत. कारण त्यांच्या प्रत्येक भाषणात त्या पुरुषांवर फारच कमी बोलताना दिसून येतात."

"महिलेला भाकरी यायलाच हवी, तिनं उंबरा ओलांडू नये, असं त्या म्हणतात. पण मला सांगा, महिला उंबऱ्याच्या बाहेर गेल्याशिवाय करियर होतं का? दोघांनीही संसारातल्या जबाबदाऱ्या उचलायला काय हरकत आहे? बदलणारी महिला कशी वाईट आहे आणि जुन्या महिला कशा चांगल्या आहेत, यावरच या बाईंचा फोकस आहे. म्हणून मला त्यांची भाषणं महिलांवर बंधन लादणारं प्रचारतंत्र आहे, असं वाटतं," त्या पुढे सांगतात.

अपर्णा रामतीर्थकर यांची भूमिका काय?

महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतर आम्ही अपर्णा रामतीर्थकर यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. 6 फेब्रुवारी 2019 या दिवशी झालेल्या संवादाचा महत्त्वाचा भाग इथे देत आहोत:

प्रश्न - तुमच्या व्याख्यानांमध्ये सर्व उपदेश महिलांनाच का दिले जातात? महिलांनाच का टार्गेट केलं जातं?

उत्तर - महिलांना टार्गेट करायचा प्रश्न नाहीये. पण महिलेला तिची ताकद कळत नाहीये. तिनं जवळ असलेल्या ताकदीचा वापर मुलांना घडवण्यासाठी करावा. तिनं तिची बुद्धिमत्ता मुलांना घडवण्यासाठी खर्च करावी. तिनं तिची ताकद आपली कुटुंबव्यवस्था खंबीर बनवण्यासाठी कामाला लावावी. तिनं बाहेर पडायचं आहे, शिकायचं आहे. सगळ्या कार्यक्षेत्रात जायचं आहे. पण तिची पहिली जबाबदारी ही घर आहे.

प्रश्न- घराची जबाबदारी फक्त महिलेवरच असते का?

उत्तर - घर उभारणं ही पुरुषांचीही जबाबदारी आहे. पुरुषांनीही घराकडे लक्ष द्यायला पाहिजे, घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. आता स्त्रियासुद्धा अर्थाजर्नाजनासाठी बाहेर पडल्या आहेत. मग काही ठिकाणी पुरुष या जबाबदाऱ्या स्वीकारायला तयार नाहीत. मग अशा ठिकाणी भांडून उपयोग नसतो. बरोबर घेऊन जायचं असतं.

प्रश्न - एखाद्या स्त्रीने कोणते कपडे घालावेत हा तिचा वैयक्तिक निर्णय नाही का?

उत्तर - आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपल्याकडे जीन्स पँट, टाईट कपडे आरोग्याला घातक आहेत. आपल्याकडे प्रत्येक हवामानानुसार कपडा ठरलेला आहे. आता शालीनता स्त्रीने जपली पाहिजे. कारण आता 2 वर्षांची मुलगीसुद्धा धोक्यात आहे. त्यामुळे तिला झाकण्याची जबाबदारी, सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही सगळ्यांची आहे. त्यामुळे स्त्रीनं तोकडे कपडे घालावे की ना घालावे यापेक्षा तिचं संरक्षण तिनं कसं करावं, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

प्रश्न - या मर्यादा फक्त महिलांनीच का पाळायच्या?

उत्तर - पुरुषांनाही मर्यादा आहेत. इंद्रियसंयमन हा विषय गुरुकुलामध्ये पूर्वीच्या काळात पुरुषांनाही शिकवलाच जायचा. इंद्रियसंयमनाचा विषय आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. स्पर्शाचं अंतर हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. त्यामुळे हे अंतर बाईनंही ठेवलं पाहिजे आणि पुरुषानंही ठेवलं पाहिजे. त्यामुळेच आपल्याकडे शेकहँड करण्याची पद्धत नाहीये. आपल्याकडे नमस्काराची पद्धत आहे.

प्रश्न - वडीलही पुरुष आहेत, त्यांना स्पर्श करू नका, असं म्हणून तुम्ही या नात्यावर अविश्वास दाखवत नाहीत का?

उत्तर - विश्वासाचा प्रश्न नाही. माझी आई काय म्हणायची, तू 14 वर्षांची झालीस ना, आता वडिलांच्या अंगाशी जावू नकोस. वडीलसुद्धा शेवटी पुरुष आहेत. ते वडील असले तरीसुद्धा तू आता पौगांडावस्थेमध्ये या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतात. पुरुषांच्या समोर उभं राहून वेणी घालू नका, असंही आईनं मला सांगितलं होतं. कारण काय, शेवटी किती झालं तरीसुद्धा ते पुरुष असतात. मग तो दीर असो की मुलगा. मुलगा एकदा मोठा व्हायला लागला की त्याच्याही भावना वेगळ्या असतात. ते नातं कोणतं आहे त्याचा प्रश्न नाहीये. आपल्याकडे या सगळ्या गोष्टी मर्यादेच्या आहेत. मर्यादा म्हणून या पाळायच्या आहेत. ज्यांना पाळायच्या नाहीत, त्यांनी नाही पाळल्या तरी चालू शकतं.

प्रश्न - कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा महिला गैरवापर करतात आणि त्यामुळे 10 लाख पुरुषांनी आत्महत्या केल्यात, हा आकडा कुठून आला?

उत्तर - कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा खूप गैरवापर होत आहे. त्यामुळे 498 कलमात मागे दुरुस्ती करण्यात आली की कुणालाही चौकशीशिवाय अटक करू नये. तुम्ही नेटवर जाऊन 'कौटुंबिक हिंसाचार प्रतिंबध कायदा 2005' याचे परिणाम बघा, इंटरनेटवरील आकडे आहेत ते. पुरुष हक्क संरक्षण समितीच्या लोकांना विचारा. हे सर्व आकडे त्यांचे आहेत.

प्रश्न- महिलांवर अनेक शतकं अन्याय होत होता आणि या कायद्यानं महिलांवरील हिंसाचाराला आवाज दिला, हे तुम्हाला मान्य नाही का?

उत्तर - जिच्यावर अन्याय होतो तिनं या कायद्याचा वापर करायचाच आहे. पण जिच्यावर अन्याय होत नाही, तिनं कायद्याचा गैरवापर नका करू. गैरवापरामुळे कुटुंबव्यवस्था ढासळून चाललीय. कुटुंबव्यवस्था आपला गाभा आहे, तो टिकायला हवा.

बायकांना डॉमिनेट करणं, दुय्यम लेखणं, हा माझा विषय नाही. मी असं म्हणते, बायकांमध्ये जी ताकद आहे, ती चांगल्या रीतिनं वापरा, कुटुंब सक्षम करा. आताची जी समाजव्यवस्था आहे, ती कुटुंबव्यवस्था बदलायला नको, कुटुंबव्यवस्था अडचणीत यायला नको, म्हणून माझे प्रयत्न चालू आहेत.

प्रश्न - कुटुंब व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी फक्त महिलांचीच का? यातून महिलांना बंधनात ठेवायचं प्रचारतंत्र तुम्ही राबवता, असा तुमच्यावर आरोप आहे.

उत्तर - मी हे जे काही बोलले होते त्याला त्या काळात काही कारणं होती. हे भाषण 10 वर्षांपूर्वीचं असेल. आता मात्र काळ बदललाय. आता काळानुसार बाहेर पडावं लागतं, नोकऱ्या कराव्या लागतात. आता नाही आहे मला तो आक्षेप. पूर्वीच्या वेळेला आमच्या काळात तो होता.

प्रश्न - या सगळ्या गोष्टी तुम्ही पुरुषांना का नाही सांगत, असं महिला विचारताहेत.

उत्तर - पुरुषांच्या विरोधात सगळेच बोलतात. सध्या पुरुषांच्या बाजूनं कुणीच बोलत नाही. पण पुरुष सगळे वाईट असतात का?

मी पुरुषांना का समजावून सांगू शकत नाही, तर माझ्या भाषणाचा विषयच मुळात असा आहे की, 'मी स्त्री आहे आणि मला कुटुंबव्यवस्था टिकवायची आहे.' पुरुषांनाही मी सांगते की, नात्यांना न्याय द्यायला शिका.

एकत्र कुटुंबपद्धतीची गरज?

अपर्णा रामतीर्थकरांचे विचार अनेकांना मान्य असतील, पण त्यांच्यावर जोरदार टीकाही होते. ते स्त्रीपुरुष समानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. तरीही त्यांची व्याख्यानांचं आयोजन करणारी मंडळी कोण आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.

भास्कर कोठावदे हे नाशिकच्या आशापुरी बहुउद्देशीय संस्थानचे अध्यक्ष आहेत. 20 ऑक्टोबर 2018ला त्यांनी संस्थानतर्फे अपर्णा रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. 'चला नाती जपूया' या विषयावर हे व्याख्यान होतं.

या व्याख्यानाविषयी कोठावदे सांगतात, "अपर्णाताईंचे मुद्दे भारतीय कुटुंबपद्धतीच्या बाजूचे आहेत. सध्या जे वातावरण चालू आहे, त्यात एकत्र कुटुंबपद्धती ऱ्हास होत चाललीय, विभक्त कुटुंब पद्धती जोरात आहे. लोकांना त्यांची भाषणं आवडतात, म्हणूनच ते टाळ्या वाजवतात.

"वातावरण जे बदललंय त्या बदलानुसार समाजानं राहिलं पाहिजे. पण काय असतं, कुणी काय टोचल्याशिवाय माणूस सुधारणार नाही ना. कुणाचा तरी धाक पाहिजे ना. कुणीतरी व्याख्यानामध्ये असे कान टोचले की 2-5 टक्के समाज सुधारतो. निदान हाफ पँटवरून फुलपँटवर महिला येतील, असं आपण समजायचं."

संजय गायकवाड हे बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत दोनदा अपर्णा रामतीर्थकरांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं आहे.

ते सांगतात, "ज्या पद्धतीनं अपर्णाताई महिलांच्या बाबतीत, संसाराच्या बाबतीत बोलतात, याबाबतचा त्यांचा जो अभ्यास असतो, तो अगदी काळजाला भिडणारा आणि डोळ्यांत पाणी आणणारा असतो. अशा बाया ज्या संस्कृतीला सोडून एका भौतिक सुखाकडे वळलेल्या आहेत, पाश्चात्य संस्कृती स्वीकारत आहेत, अशा बायका अपर्णाताईंना नावं ठेवतात.

"स्त्री ही पूर्ण कपड्यावरच सुंदर दिसते, तिला देवीचा दर्जा दिलेला आहे. आम्ही जर महिलेला जगदंबेच्या, कालिकेच्या, दुर्गेच्या रुपामध्ये पाहतो, तर ती देवी पूर्ण कपड्यामध्येच देवी दिसते. ज्या बाईच्या अंगात पूर्ण कपडे आहेत, त्या बाईकडे कुणी वाईट नजरेनं पाहत नाही. मी 28 वर्षांपासून नगरसेवक राहिलो आहे, माझ्या अनुभवानुसार मी सांगतो की, पूर्ण कपड्यातल्या महिलेलाच लोक देवी समजतात."

'अपर्णाताईंचे विचार नवी पिढी धुडकावून लावेल'

अपर्णा रामतीर्थकर यांच्या व्याख्यानांना प्रतिसाद मिळतो, कारण समाजातही स्त्रियांबद्दलचा आग्रह त्यांच्यासारखाच असतो, असं मत स्त्री हक्क कार्यकर्त्या किरण मोघे मांडतात.

त्या सांगतात, "अपर्णा रामतीर्थकर यांचा महिलांबद्दल जो आग्रह आहे, तोच समाजातल्या इतर लोकांचाही आहे. या दोन्हींचे महिलांबद्दलचे विचार सारखेच आहेत. स्वत:चे महिलांविषयक विचार सार्वजनिकरीत्या मांडता येत नाही, म्हणून मग अशी माणसं अथवा संघटना अपर्णा रामतीर्थकरांच्या तोंडून ते विचार बोलवून घेतात.

"संस्कृती, परंपरा जपण्यासाठी हे केलं जातं, असं अनेकांचं मत आहे. पण आपल्याकडे आज्ञाधारक स्त्रियांची एक परंपरा आहे, तर दुसरी आहे ती बंडखोर स्त्रियांची. त्यामुळे यांपैकी आपण कोणती परंपरा मानणार आहोत, असा प्रश्न पडतो. पण सगळ्या बाबतीत विज्ञानाची कास धरत विकास करत आहोत, मग स्त्रियांनाच परंपरेच्या नावाखाली बंधनात का ठेवलं जात आहे?"

त्या पुढे सांगतात, "खरं तर जुनी पिढी आणि आताची पिढी या दोन पिढ्यांमध्ये नेहमीच संघर्ष राहिला आहे. नवीन पिढी नेहमीच बंडखोर राहिली आहे. जुन्या पिढीला अपर्णा रामतीर्थकरांचे विचार पटत असतील, पण नवी पिढी ते धुडकावून लावेल, यात शंका नाही. शिवाय असे विचार परतावून लावणं आज आधुनिक विचार करणाऱ्यांसमोर सर्वांत मोठं आव्हान आहे."

आजही बऱ्याच स्त्रियांचा पुरुषप्रधान व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन पारंपरिक आहे. त्यामुळे अपर्णाताईंच्या विचारांना आज समाजात स्थान आहे, असं मत स्त्रीवादी साहित्यात पी.एचडी केलेले डॉ. उदय जाधव मांडतात.

ते सांगतात, "आजही सोशिक नायिकेला आपल्याकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं. अपर्णाताई त्यांच्या व्याख्यानांतून असंच चित्र रंगवतात. सोशिक स्त्री असेल, ती बंड करणार नसेल, तर त्यामुळे नात्यात ताण-तणाव निर्माण होणार नाही, असं चित्र त्या उभं करतात आणि समाजाला ते पटतं.

"असं असलं तरी, अपर्णाताईंचे विचार त्या काळी बरोबर असतीलही, पण आता काळ बदलत चाललाय. नव्या पिढीला त्यांचे विचार पटणार नाहीत. कारण त्यांच्या बौद्धिक, शारीरिक क्षमता वाढत चालल्या आहेत. जुन्या परंपरा नवीन पिढीला जोखड वाटत आहे. कालाय तस्मै नम: याकडे लक्ष द्यायला हवं. काळ जसा बदलत चाललंय, तसतसं वर्तन बदलत चाललंय. यातून स्वत:चा विकास कसा होईल, याकडे स्त्री-पुरुष दोघांनीही लक्ष द्यायला हवं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)