You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विद्या बाळ : जाणता संपादक आणि स्त्रीवादी चळवळीच्या खऱ्याखुऱ्या हिरो
- Author, प्राजक्ता धुळप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक, स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं पुण्यात वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं. महाराष्ट्रातल्या स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीविषयी बोलताना विद्या बाळ यांचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि यापुढेही घेतलं जाईल.
सगळेजण त्यांना विद्याताई म्हणून ओळखायचे. त्यांनी सुरू केलेल्या 'मिळून साऱ्याजणी' या मासिकाचं पत्रकारितेत योगदान तर आहेच पण त्यानिमित्ताने सुरू झालेल्या उपक्रमांमधून समाज प्रबोधनाची धुरा विद्याताईंनी उचलली आणि मराठी पत्रकारितेची परंपरा कायम राखली.
मृदूभाषी विद्याताई नेहमीच संवादावर भर द्यायच्या. हा संवाद त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांनी अनुभवला. त्यांचे सहकारी, चळवळीतले कार्यकर्ते, वाचक आणि महत्त्वाचं म्हणजे विरोधकांनीही. स्त्रीमुक्ती चळवळ ही काही फक्त बायाबायांची चळवळ नाही तर स्त्री-पुरुषांची चळवळ आहे, त्यासाठी सतत जसा स्वतःशी संवाद गरजेचा आहे तसाच परस्परांमधला संवादही; यावर त्यांचा भर असायचा.
1989 साली विद्याताईंनी मिळून साऱ्याजणी हे मासिक सुरू केलं तेव्हा त्याच्या कव्हरवर घोषवाक्य लिहिलेलं असायचं- 'स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करणारं मासिक'. कालांतराने 'स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वतःशी आणि परस्परांशी संवाद साधावा यासाठी...' असं लिहिलं जाऊ लागलं. काळानुरूप बदल आणि आधुनिक विचारांची कास धरणाऱ्या विद्याताई कधीच जुनाट वाटल्या नाहीत.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
विद्याताईंचा जीवनप्रवास म्हणजे समतेच्या मार्गाने माणूस म्हणून जगण्यासाठीचा मोहात टाकणारा एक मोठा पल्ला आहे.
स्त्रीवादी विचारांच्या मांडणीत 'Personal Is Political' हे वाक्य नेहमी बोललं जातं. जे-जे वैयक्तिक ते-ते राजकीय. केट मिलेट या पाश्चात्य स्त्रीवादी अभ्यासक कार्यकर्तीने सत्तरच्या दशकात 'Personal Is Political' हा शब्दप्रयोग पहिल्यांदा वापरला.
इथे पॉलिटिकलचा अर्थ राजकीय नसून सत्तासंबंध असा आहे. बाईचं खासगी आयुष्य हे सत्तासंबंध म्हणजेच सध्याच्या पुरूषसत्ताक व्यवस्थेशी जोडलेलं असतं, असा त्याचा अर्थ. यासाठी अधिक तपशीलवार उदाहरण पाहायचं झाल्यास विद्याताईंच्या आयुष्याचा पट पाहणं आणि समजून घेणं महत्त्वाचं ठरेल.
घरात उजव्या विचारांचा पगडा
विद्याताईंनी स्वतःचं खासगी आयुष्य अनेकदा जाहिरपणे सांगितलंय. मध्यमवर्गात वाढलेल्या विद्याताईंचा जन्म 1937 सालचा.
लोकमान्य टिळकांचे सहकारी न. चि. केळकर हे त्यांचे आजोबा हिंदू महासभेमध्ये सक्रिय होते. विद्याताईंकडे उदारमतवादी म्हणून जो संस्कार आला तो या वारश्यातून.
अगदी तरूण वयात वैधव्य आलेल्या आत्या कमलाबाई देशपांडे यांच्या पुनर्विवाहाचा आग्रह आजोबा न. चि. केळकर यांनी धरला. पुढे 1962च्या सुमारास आपल्या आत्येवर 'कमलाकी' हे पुस्तक विद्याताईंनी लिहिलं तेव्हा त्यांना आपल्या आजोबांविषयी अधिक जाणून घ्यायची संधी मिळाली.
'आपले आजोबा लोकशाही मानणारे, पुरोगामी विचारांचे होते, आणि जर ते टिळकांबरोबर नसते तर स्वातंत्र्य लढ्यात मवाळांचे नेते झाले असते,' असं त्या म्हणायच्या.
लग्नापूर्वी आणि लग्नानंतर घरात उजव्या विचारसरणीचा पगडा होता. भाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले. फक्त संसारातच न रमण्याचा विद्याताईंचा पिंड घराबाहेरीर सामाजिक उपक्रमांना जोडून घेऊ लागला.
जनसंघाशी संबंध आल्यावर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी रामभाऊ म्हाळगी यांच्या आग्रहावरुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पण जनसंघ पुरस्कृत उमेदवार म्हणून जिंकू शकल्या नाहीत.
त्याच काळात विद्याताईंनी दोन वर्षं पुणे आकाशवाणीसाठीही काम केलं. पण 1964 साली मुकुंदराव आणि शांताबाई किर्लोस्करांच्या 'स्त्री' मासिकातून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करायला सुरूवात झाली आणि वयाच्या पस्तीशीपर्यंतचं आयुष्य वेगळं आणि नंतरचं वेगळं असे सरळ सरळ दोन भाग त्यांच्या वाट्याला आले. खरंतर पस्तीशीनंतरचं आयुष्य त्यांनी स्वतः निवडलं म्हणायला हरकत नाही.
आयुष्याला कलाटणी देणारं 1975
स्त्री मासिकात काम करताना बाईची घरातली भूमिका नेमकी काय आहे याविषयीचं त्यांचं चिंतन एकीकडे सुरू होतं तर दुसरीकडे बाईला खुपणाऱ्या गोष्टी काय आहेत याविषयीचा संवादही सुरू होता.
वाचक, लेखक, संपादक यांचं एकत्रितपणे एक व्यासपीठ असायला हवं यातून मासिकाचा 'स्त्री सखी मंडळ' हा उपक्रम सुरू झाला. त्या सांगायच्या- 'बायका प्रश्न विचारू लागल्या होत्या, स्त्री मासिकात चांगली बायको, चांगली गृहीणी, चांगली आई आणि चांगलं कुटुंब यासाठीचा आधुनिक विचार होता. स्त्री ही या पलिकडे, कुटुंबाच्या आणि समाजाच्या पलिकडचाही एक घटक आहे हे वास्तव आपण स्वीकारत नव्हतो. तेच माझ्यात जागं झालं आणि माझ्या पुढच्या प्रवासाला सुरूवात झाली.'
स्त्री मासिकाच्या संपादकाची धुरा 1983 पर्यंत विद्या बाळ यांनी सांभाळली. त्याच दरम्यान ऐंशीच्या दशकात युनोने 1975 साल आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर केलं होतं. त्यानिमित्ताने स्त्रीमुक्तीच्या चळवळीचा आवाज मध्यमवर्गापर्यंतही पोहचू लागला होता. हे वर्ष त्यांच्या वैयक्तिक आणि संपादकीय जीवनाला वळण देणारं ठरलं.
नारी समता मंच आणि बोलते व्हा
स्त्री मासिकातल्या वाचकांच्या पत्रांना उत्तरं देताना त्यांच्या लक्षात आलं केवळ शब्द पुरेसे नाहीत तर कृतीही महत्त्वाची आहे. त्यातून पुढे 1982 साली नारी समता मंचची सुरूवात झाली.
डॉ. सत्यरंजन साठे यांच्या मदतीने गरजू स्त्रियांना कायदेशीर मदत देणारं 'बोलते व्हा' केंद्र सुरू झालं. यामागे कारणीभूत ठरलेल्या दोन घटनांचा त्या उल्लेख करत.
त्या काळात मंजुश्री सारडा ही केस गाजली होती. मंजुश्रीचा सायनाईड देऊन खून झाला अशी चर्चा होती. तर शैला लाटकर या महिलेचा कौटुंबिक हिंसाचारामुळे मृत्यू झाला होता. स्त्रियांनी घरातल्या अत्याचाराबद्दल बोललं पाहिजे म्हणून विद्याताईंच्या पुढाकाराने नारी समता मंचने गावोगावी जाऊन 'मी एक मंजुश्री नावाचं' प्रदर्शन भरवलं. त्यानमित्तानेही शहरा-गावातल्या स्त्रिया बोलत्या झाल्या.
घरं फोडणारी बाई?
घराबाहेर आणि घरात बाईच्या जगण्याचं भान देणारं बरंच काही घडत होतं. विद्या बाळ शांतपणे घरातून बाहेर पडल्या. नवरा, दोन मुलं आणि मुलगी यांच्याविषयी कोणतीही तक्रार न करता.
विद्याताईंच्याच शब्दात सांगायचं तर- 'नवरा उत्तम शिक्षक, सज्जन माणूस. घरात व्यसन नव्हतं की कोणतीही हिंसा नव्हती. पण जी मानसिक हिंसा करणाऱ्या व्यक्तिला आपण ती करतोय असं वाटत नाही. पण बाईच्या विचारांची घुसमट व्हायला लागली की तिला ती हिंसाच वाटते.'
स्त्रीमुक्तीचं काम करताना त्यांना अनेकदा लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. तेव्हा तर 'घरं फोडणारी बाई', स्त्रीमुक्तीचा संसर्ग होऊन घरं पोखरणारी प्लेगचा उंदीर, स्त्री-चळवळीतला हिजडा असंही संबोधलं गेलं.
घर सोडल्यानंतर तर त्यांची जाहिरपणे बदनामी करण्याचा प्रयत्नही झाला. स्त्रीमुक्तीचं काम करणाऱ्या बाई स्वतःच्या सुनेला छळतात असे खोटेनाटे आरोपही झाले. त्यावेळी विद्याताईंचं वय पन्नास वर्षं होतं. या वयात स्त्रीमुक्तीच्या चळवळीसाठी त्या घर सोडून बाहेर पडल्या होत्या.
घरातून बाहेर पडल्यावर त्यांनी मासिक काढण्याचा निर्णय घेतला. 9 ऑगस्ट 1989 साली क्रांती दिनाचं औचित्य साधत मिळून साऱ्याजणीचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
या सामाजिक मासिकाचं उद्दीष्ठ होतं- स्त्रियांसाठी अवकाश निर्माण करणं, स्त्री-पुरूष समतेचा विचार पोहचवणं आणि शहरी-ग्रामीण जगण्यातला पूल बांधणं.
विद्याताई मासिकातून 'संवाद' आणि 'मैतरणी गं मैतरणी' या सदरातून पोहचू लागल्या. त्यावेळी मराठीतली मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रं, साप्ताहिकं आणि मासिकं स्त्रियांचं सौंदर्य आणि तिचं गृहिणीपण जपत होती.
मिळून साऱ्याजणीत लेख, कविता, कथेसोबतच अनुभवकथनाला कमालीचं महत्त्व दिलं. त्यात आत्मकेंद्रीपणा टाळून जाणीवजागृतीकडेच कल ठेवला.
पुरुष बदलला तरच..
स्त्रीमुक्तीची चळवळ आधी शारीरिक हिंसाचाराबद्दल बोलत होती, त्यानंतर मानसिक हिंसाचाराबद्दल बोलू लागली. घरात मोकळा श्वास न घेता येणं हा देखील हिंसाचारच आहे, याविषयी देखील मांडलं जाऊ लागलं.
तिच्या आरोग्यबद्दल बोलणं जाणं हा देखील स्त्री मुक्तीचाच विचार होता. बाईला मुळात माणूस म्हणूनच सत्तासंबंध, संस्थेने, व्यवस्थेने नाकारलं आहे, हे देखील अनेक दशकांच्या लढ्यातून पुढे आलं. पुरुष बदलला तरच स्त्रियांचं जगणं बदलेल याविषयीही उघडपणे बोललं जाऊ लागलं
मिळून साऱ्याजणीच्या संपादिका म्हणून विद्याताईंनी याची वेळोवेळी दखल घेतली आणि अनेकांना बोलतंही केलं. स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्क आहेत या विचाराची मांडणीही सतत केली.
यापुढचा त्यांच्या कामाचा टप्पा राहिला तो पुरुषांना सोबत घेऊन स्त्रीमुक्ती चळवळीला जोडण्याचा. पुरुष संवाद केंद्र हा त्यातूनच पुढे आलेला उपक्रम. स्वतःशी नव्यानं संवाद साधणारं मासिक चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी संवाद सांधणारं मासिक झालं.
महाराष्ट्रातल्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि आगरकर या सुधारकांच्या परंपरेशी नातं सांगतांना स्त्रीमुक्तीची चळवळ पाश्चात देशातून आयात केलेली नाही तर इथे आपल्या मातीतच रूजली आहे, हे विद्याताईंचं आवर्जून सांगणं.
महिलांच्या शनी शिंगणापूर मंदिर प्रवेशासाठीच्या न्यायालयीन लढ्यात विद्या बाळ यांचं योगदान मोठं आहे. पण त्याच बरोबर धर्म आणि जातीच्या पातळीवर समानता नाकारणाऱ्या रूढी-परंपरांची चिकित्साही त्यांनी केली.
हळदीकुंकू आणि विद्याताई
दोन वर्षांपूर्वी बीबीसी मराठीशी बोलताना मकरसंक्रातीतल्या हळदीकुंकू या प्रथेविषयी आमच्या गप्पा झाल्या. त्यावर आधारित लेख लिहिल्यावर खूप टोकाच्या आणि काही स्वागतार्ह प्रतिक्रियाही आल्या.
तेव्हा विद्याताई म्हणाल्या होत्या- 25 वर्षांपूर्वी मिळून साऱ्याजणीमध्ये याच विषयावर तुम्ही धर्म बुडवताय, कलंक आहात अशा प्रतिक्रिया आल्या होत्या. आज इतक्या वर्षांनंतरही आपण विचारलेल्या प्रश्नांवर लोक अंतर्मुख होतात हीच आपल्या कामाची पावती आहे.
गेली तीसहून अधिक वर्षं विद्याताई एकट्या राहिल्या. समाजमान्य असलेल्या कुटुंबाबाहेर. पण त्यांना तसं वाटत नव्हतं. त्यांच्यासाठी माणूसपणाच्या वाटेवर चालत असताना विचारांनी जोडलेले सारेजण हेच मोठं कुटुंब होतं. या कुटुंबाविषयी त्यांनी अनेकदा कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रवासात मराठी पत्रकारिता आणि सामाजिक बदलासाठी विद्याताईंनी केलेलं काम अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा देणारं ठरेल.
अशा विद्याताई.. जाणता संपादक आणि स्त्रीवादी चळवळीचा खऱ्याखुऱ्या हिरो होत्या!
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)