You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जर्मनीतील ज्यू धर्मियांवर टोपी घालण्यास बंदी, कारण...
सार्वजनिक ठिकाणी ज्यू धर्मियांनी त्यांची टोपी (स्कलकॅप/किप्पा) वापरू नये असं आवाहन जर्मन सरकारच्या अँटी सेमेटिक कमिशनरनी केलं आहे.
जर्मनीमध्ये अँटी सेमेटिक भावना वाढीला लागल्यामुळे कमिशनर फेलिक्स क्लेइन यांनी हे आवाहन केलं आहे.
अँटी सेमेटिक किंवा अँटी सेमेटिझम म्हणजे ज्यू धर्मियांना होणार विरोध.
यावर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियुविन रिवलिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर्मन भूमीवर ज्यू धर्मिय सुरक्षित नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
गेल्या वर्षभरात अँटी सेमेटिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याची नोंद जर्मन सरकारने केली आहे.
ज्यूंचा तिरस्कार करण्याचे 1646 गुन्हे 2018 साली झाले असून त्याआधीच्या वर्षापेक्षा त्यात 10 टक्के वाढ झाली आहे.
याच काळात जर्मनीमध्ये ज्यूंवरील शारीरिक हल्ल्यांतही वाढ झाली आहे. एकूण 62 हिंसक घटना घडल्या असून 2017 साली अशा 37 घटना नोंदवल्या गेल्या होत्या.
हॅंडर्सब्लाट वर्तमानपत्राशी बोलताना कायदामंत्री कॅटरिना बार्ले म्हणाल्या, अँटी सेमेटिक गुन्ह्यांमध्ये वाढ होणं देशासाठी लज्जास्पद आहे.
क्लेइन काय म्हणाले?
जर्मनीमध्ये ज्यूंनी स्कलकॅप सर्वत्र वापरावी अशी शिफारस मी आताच्या स्थितीत करू शकत नाही, अशा शब्दंमध्ये क्लेइन यांनी फ्युंकं माध्यमसमुहाशी बोलताना सांगितलं.
ते म्हणाले, निर्बंध उठवल्यामुळे या अँटी सेमेटिक घटनांमध्ये वाढ झाली असावी. इंटरनेट, सोशल मीडिया आणि 'कल्चर ऑफ रिमेंब्रन्स'वरील सततच्या हल्ल्यांमुळे या घटना वाढत असाव्यात.
अँटी सेमेटिझमच्या प्रकरणात काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्यासाठी पोलीस अधिकारी, शिक्षक आणि वकिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ज्यू धर्मियांबद्दल जर्मन समाजात आजही पूर्वग्रह कायम आहेत, असं मत अँटी सेमेटिझम प्रकरणांतील कायदेतज्ज्ञांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केलं होतं.
इथं अँटी सेमेटिझम नेहमीच होता. पण आता तो अधिक मोठा, आक्रमक आणि उघडपणे दुष्ट भावना दाखवणारा दिसून आल्याचं क्लाउडिया वनोनी यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
इस्रायलाच्या राष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया?
क्लेइन यांनी केलेलं वक्तव्य म्हणडे अँटी सेमेटिझमसमोर पत्करलेली शरमागतीच आहे, असं मत रिवलिन यांनी व्यक्त केलं आहे.
"अँटी सेमेटिझमसमोर आम्ही कधीच मान खाली घालणार नाही, त्या भावनेसमोर कधीच पराभव स्वीकारणार नाही आणि आमच्या सहकारी देशांनीही याच पद्धतीने वागावे," अशी आमची इच्छा आहे. यावेळेस ज्यू समुदायाप्रती जर्मन सरकारच्या प्रयत्नांची दखलही रिवलिन यांनी घेतली.
अँटी सेमेटिझम का वाढत आहे?
संपूर्ण युरोपमध्ये अँटी सेमेटिझमला खतपाणी घालणाऱ्या अतीउजव्या गटांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. तसंच इतर अल्पसंख्यकांविरोधात द्वेष भावना वाढीला लागत आहे, अशी माहिती ज्यू लोकांनी दिली आहे.
2017 पासून अतीउजव्या विचारांचा 'अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी' पक्ष मुख्य विरोधीपक्षाच्या भूमिकेत आहे. या पक्षाने स्थलांतरीतांना उघड विरोध केला आहे. मात्र आपण अँटी सेमेटिक नसल्याचा दावा केला आहे.
मात्र त्यांच्या अनेक नेत्यांनी हॉलोकॉस्ट (दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ज्यूंचे निर्दालन) सह अनेक बाबतीत केलेल्या विधानांमुळे ज्यू धर्मियांची आणि इतर राजकीय नेत्यांची टीका ओढावून घेतली आहे.
गेल्या वर्षी युरोपीयन ज्यू धर्मियांच्या केलेल्या एका सर्वेक्षणात अँटी सेमेटिझममुळे आपल्या चिंतेत वाढ झाल्याचे ज्यू धर्मियांनी सांगितले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)