You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तृप्ती देसाई म्हणतात इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे
वाक्यं बोलतील, माफी मागतील, ते चालणार नाही, इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल व्हायलाच हवा, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.
"महाराजांनी पत्रकातून दिलगिरी व्यक्त केली आहे. पण त्याला उशीर झाला आहे. त्यांच्या समर्थकांनी आम्हाला ठोकून काढायाची भाषा केली आहे. कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायलाच हवा," असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय.
"सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तारखेला स्त्री संग केला तर मुलगी होते," या वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या इंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
आपल्या वाक्यांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं, एक पत्रक काढून इंदुराकर यांनी म्हटलं आहे.
त्यावर फक्त माफी मागून चालणार नाही असा पवित्रा तृप्ती देसाई यांनी घेतला आहे.
बीबीसीसाठी प्राजक्ता पोळ यांनी तृप्ती देसाई यांच्याशी बातचीत केली.
"इंदुरीकर महाराज कीर्तनात महिलांचा वारंवार अपमान करतात. महिलांना कमी लेखणं, दुय्यम दर्जाचं लेखणं अशी त्यांची वक्तव्यं असतात. पीसीपीएनडी अक्टचं उल्लंघन केलं. त्यासाठी कोणत्याही ग्रंथाचा आधार नाही. पुराणांमध्ये असा उल्लेख असल्याचं सांगितलं जातं मात्र आपला देश कुठल्या धर्मावर चालत नाही. तो संविधानानुसार चालतो. संविधानानुसार जे कायदे आहेत त्यांचं उल्लंघन आहे. त्यामुळे पीसीपीएनडी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे", असं तृप्ती यांनी सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या, "महिलांचा अपमान करतात त्यासंदर्भातही गुन्हा दाखल करण्यात यायला हवा ही आमची मागणी आहे. कायदेशीर नोटीस बजावली आहे. लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा".
"1994 मध्ये पीसीपीएनडी कायदा तयार करण्यात आला. 2003 मध्ये हा कायदा आणखी कडक करण्यात आला. पुराणाचा आधार देण्यात आला असेल, प्रसिद्धी असेल, त्याची जाहिरात असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. त्यामुळे इंदुरीकर महाराज कुठल्या ग्रंथाचा आधार घेऊन काही सांगत असतील तर पुराणातलं जे आहे, एखादं पान असेल किंवा छायाचित्र असेल त्याची जाहिरात केली, प्रसिद्ध केली तरी तो गुन्हा आहे. त्यांचे समर्थक पुरावे पाठवत असतील तर ते सहआरोपी होऊ शकतात. पुराणाचा दाखला दिल्यामुळे गुन्हा दाखल होणार नाही असं म्हणणं चुकीचं आहे. ग्रामीण भागातली माणसं त्यांचं कीर्तन ठेवतात. ग्रामीण भागातल्या जनतेला वेड्यात काढायची ही कामं आहेत".
महिलांचा अपमान सहन करणार नाही
ते सहा महिन्यांपूर्वी काही बोलले असतील तर त्याची मला कल्पना नाही. आता जेव्हा कळलंय तेव्हा आम्ही त्याप्रकरणाची दखल घेतली. चपल कितीही भारी असली तरी आपण गळ्यात घालत नाही. बायकोला चपलेप्रमाणे वागवा असं ते म्हणतात. महिलांना दुय्यम वागणूक द्यायची ही पुरुषी मानसिकता दिसते आहे. बेटी बचाव, बेटी पढाव अशा योजनांच्या माध्यमातू महिलांच्या सबलीकरणाचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दुय्यम स्थान देण्यासाठी अशी विधानं केली जातात. अनेकदा ते कीर्तनातून सांगतात की गोरी बायको करू नका. अनेकांच्या गोऱ्या बायका पळून गेल्या आहेत. महिलांसंदर्भात अनेक अपमानास्पद वक्तव्यं त्यांनी वारंवार केली आहेत. महिलांचा अपमान आम्ही तरी सहन करणार नाही. महिलांच्या सन्मानासाठी आम्ही काम करत आहोत.
वारकरी संप्रदाय, हिंदू धर्म यांचा आम्ही आदरच करतो. महिलांचा अपमान करणारं वक्तव्य असेल तर मग कोणीही महाराज असोत, त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत हे वारंवार घडतं आहे. एखादी गोष्ट झाली असती तर आम्ही त्यांना माफ केलं असतं. अनेक कीर्तनात हे घडतं आहे. त्यांची काही चांगली कामं आहेत. त्यांनी शाळा काढल्या आहेत. त्यासाठी नक्कीच त्यांचा आदर आहे. तिथे आम्ही त्यांचं अभिनंदन करू. एवढी टीका झाल्यावरही परवाच्या कीर्तनात ते म्हणाले-मी चुकीचं काहीच बोललेलो नाही. स्त्री-पुरुष समानतेचा अधिकार संविधानाने दिला आहे. परंतु त्यांच्याकडून भेदभाव केला जातो.
लाखो लोक त्यांचं अनुकरण करतात. सम तारखेला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तारखेला स्त्री संग केला तर मुलगी होतो असं ते म्हणाले होते. जनता त्या पद्धतीने वागू लागेल. आता कुठे हजारच्या मागे आठशे असं पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण आहे. लोकांनी इंदुरीकर महाराजांचं अनुकरण केलं तर राज्याला खूप मोठा धोका आहे. मुलींची संख्या पाचशे व्हायला नको. आम्हाला पुढचे धोके दिसत आहेत, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मग ते कीर्तनकार असतील किंवा नेता असेल किंवा सामाजिक संघटनेचा प्रतिनिधी असेल तरी ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही.
वैयक्तिक विरोध नाही पण महिलांसंदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्यांना विरोध
इंदुरीकर महाराजांना मी भेटलेली नाही. त्यामुळे वैयक्तिक विरोध असण्याचं कारण नाही. त्यांची चांगली कामं आहेत. त्याविषयी आदर आहेत. महिलांच्या बाबतीत त्यांनी काही विधानं केली आहेत, त्यांचे समर्थक माझी बदनामी करत आहेत, अश्शील टीका करत आहेत, कपडे काढून मारण्याची भाषा करत आहेत यामुळे त्यांच्या पुरुषी मानसिकतेचे विचार आहेत, भेदभाव करणारे विचार आहेत त्या विचारांना आमचा विरोध आहे. त्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
महाराज असं प्रबोधन करतात का?
कितीही कोणाचे फॉलोअर्स असले तरी गुन्हा दाखल व्हायलाच हवा. चुक करतो त्याला शिक्षा मिळायला हवी. इंदुरीकर महाराजांशी कोणताही संपर्क झालेला नाही. मात्र त्यांच्या समर्थकांनी मला धमक्या दिल्या आहेत, शिवीगाळ केली आहे. तुम्ही नगरला या, आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशी भाषा असते.
माझ्या जीवितालाही धोका असू शकतो. त्यामुळे महाराजांनी नेमकं काय प्रबोधन केलं? त्यांनी तरुणांना चांगलं प्रबोधन केलं असतं तर मला अश्लील कमेंट्स आल्याच नसत्या. त्यांच्या प्रबोधनाचा परिणाम आम्हाला शिविगाळ होण्यात, धमक्या मिळण्यात झाला आहे. आमचे विनाकारण फोटो तयार केले गेले आहेत. खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. चारित्र्यहनन केलं जात आहे.
महाराजांनी सांगितल्यामुळेच समर्थक असं वागत आहेत. हे कुठल्या महाराजांना शोभतं का? वारकरी संप्रदाय परस्त्रीला मातेसमान मानतो. हिंदू धर्म नारीला देवीसमान मानतो. एखादी महिला तुमच्या चुकीच्या वक्तव्यावर टीका करते, महिलांच्या अपमानाचा जाब विचारते- तेव्हा तिला त्रास दिला जातो, चारित्र्यहनन केलं जातं, अश्लील शब्दांत टीका केली जाते. यांना महाराज म्हणणंच हे चुकीचं आहे. वारकरी संप्रदायात अनेक पुरुष आणि महिला कीर्तनकार आहेत जे चांगलं काम करत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र जे चुकीचं वागत आहेत त्यांना आमचा विरोध असेल.
गृह मंत्रालयाने लक्ष घालावं
गर्दी जमवण्यासाठी महाराजांना बोलावलं जातं. अनेक राजकारणी त्यांना बोलावतात. पण हे चुकीचं आहे. जिथे महिला सबलीकरणाच्या बाता मारल्या जातात, जिथे बेटी बचाव, बेटी पढाव सांगितलं जातं, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. महिलांच्या विरोधात बोलणारं कोणीही असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. हे महाविकासआघाडीचं काम होतं, गृहमंत्रालयाने याची तातडीने दखल घ्यायला हवी. परंतु महिलांसाठी फक्त गप्पा मारल्या जातात. कृतीत काही उतरताना दिसत नाही. जर कोणी आवाज उठवला तर त्याला प्रसिद्धी स्टंट म्हणून आरोप करणं, त्यांची बदनामी करणं असे प्रकार घडतात.
'माझं काम देशव्यापी'
इंदुरीकर महाराज राज्यात माहिती असतील पण माझं आंदोलन केरळमध्ये झालं आहे, तेलंगणला झालं आहे. मी कर्नाटकात काम करते. दिल्लीत आमचे अनेक कार्यकर्ते आहेत. चार राज्यात माझं काम सुरू आहे. शनिशिंगणापूर आंदोलनावेळी प्रसिद्धी मिळाली होती. आम्हाला प्रसिद्धीची गरज नाही. माझ्यावर प्रसिद्धीचे आरोप केले जातात. महिला म्हणून आक्रमक भूमिका घेताना कुठेही माघार घेत नाही. त्या पद्धतीने मला उत्तर देऊ शकत नाहीत म्हणून असे आरोप केले जातात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)