महिलांसाठी शबरीमाला मंदिराचे दरवाजे उघडले, आता पुढे काय होणार?

शबरीमाला मंदिराचा पायथा असलेल्या 'पांबा' इथं महिलांची गर्दी वाढू लागली आहे. आज म्हणजेच बुधवारी संध्यकाळी 5 वाजता शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी उघडण्यात आले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आज पहिल्यांदाच 10 ते 50 वयोगटातल्या महिलांना शबरीमाला मंदीराचे दरवाजे उघडले गेलेत.

दुसऱ्या बाजुला महिला प्रवेशाला विरोध करणारे आंदोलक मंदिराच्या पायथ्याजवळ पहारा देत आहेत.

दरम्यान, केरळचे अपक्ष आमदार पी. सी. जॉर्ज यांनी महिला प्रवेशाला विरोध करणाऱ्या आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. "2 कोटी जनतेच्या अस्मितेला या (प्रवेश करू पाहणाऱ्या) महिला धक्का पोहोचवत आहेत," असं ते म्हणाले आहेत.

बुधवारी सकाळपासूनच मंदिराच्या पायथ्याजवळ महिला पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बीबीसी तामिळनं दिलेल्या वृत्तानुसार संध्याकाळी आंदोलकांनी एका पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे.

आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जसुद्धा करावा लागला.

शबरीमाला मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशाला परवानगी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे प्रकरण तापलं आहे.

तब्बल 12 वर्षांच्या संघर्षानंतर 28 सप्टेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं 4-1 अशा बहुमताने स्त्रियांना मंदिर प्रवेश देण्याचा निकाल सुनावला.

दरम्यान, महिला पत्रकारांवर सुद्धा हल्ले झाल्याचं सांगण्यात येत आहे.

"आमचा महिला प्रवेशाला विरोध नाही. 10 वर्षांखालील मुली आणि 50 वर्षांपुढील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जातो. मलाही या प्रक्रियतून जावं लागलं आहे," असं शबरीमाला मंदिराच्या एका माजी पुजाऱ्याची मुलगी असलेल्या देविका अंथारजनम (84) यांनी सांगितलं.

मंदिर प्रवेशाला विरोध केल्याच्या कारणांवरून देविका आणि मल्लिका नांबुथिरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर त्यांची सुटका केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)