You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इथिओपियातल्या सरकारची निम्मी सूत्रं महिलांच्या हाती
इथिओपियाचे पंतप्रधान आबी अहमद यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात निम्म्याहून अधिक महिलांना मंत्रीपद देत नवीन पायंडा पाडला आहे.
इथिओपियाच्या दृष्टीने संरक्षणमंत्री पद निर्णायक आहे. संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी आयेशा मोहम्मद यांच्याकडे देण्यात आली आहे.
संसदेत आबी यांनी भाषण केलं. त्यावेळी ते म्हणाले, "भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये स्त्रियांचा सहभाग नगण्य असतो. देशात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यात त्यांची भूमिका मोलाची असेल."
राष्ट्रीय मंत्रिमंडळात निम्म्याहून अधिक पदं महिलांकडे देणारा रवांडानंतरचा इथिओपिया हा केवळ दुसराच देश आहे.
आबी यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 28 वरून 20वर आणली आहे.
यंदा एप्रिलमध्ये आबी पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर अनेक सुधारणावादी निर्णय घेतले आहेत. सख्खा शेजारी असलेल्या इरिट्रिया या देशाशी सुरू असलेला संघर्षही आबी यांनी संपुष्टात आणला.
देशाच्या अर्थव्यवस्थेवरची सरकारची घट्ट पकड आबी यांच्या काळात ढिली करण्यात येत आहे.
आबी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून हजारो राजकीय कैद्यांची सुटका केली.
संरक्षणासारखं महत्त्वाचं खातं त्यांनी आयेशा मोहम्मद यांच्याकडे सोपवलं आहे. आयेशा अफार या भागाचं प्रतिनिधित्व करतात. याआधी त्यांनी बांधकाम मंत्री म्हणून काम केलं आहे.
संसदेच्या माजी अध्यक्षा मुफेरियात कामिल आता इथिओपियाच्या गृहमंत्री झाल्या आहेत. त्यांच्याकडे देशाच्या गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणाच्या तसंच पोलीस यंत्रणांचंही नियंत्रण आलं आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील इथिओपियाच्या हंगामी उप प्रतिनिधी महलेत हाइलू यांनी नव्या मंत्र्यांची यादी जाहीर केली.
गडबड घोटाळ्यांसाठी अनुकूल आणि डावपेचात्मक तिढे सोडवण्यासाठी सुधारणावादी कार्यक्रमाची नितांत आवश्यकता आहे, असं आबी म्हणाले. देशात शांतता निर्माण होण्यादृष्टीने महिलांची भूमिका निर्णायक आहे. त्यांची कामाबद्दलची बांधिलकी अतुलनीय असते. बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने त्यांची कळीची भूमिका आहे.
इथिओपियाचे पंतप्रधान हालेमरियम देसालेन यांनी अचानक राजीनामा दिल्याने आबी मोहम्मद यांनी एप्रिलमध्ये पंतप्रधानपद स्वीकारलं.
आबी हे ओरोमो समाजाचं प्रतिनिधित्व करतात. सरकार तसंच संस्थांमध्ये प्रतिनिधित्वाची संख्या वाढवावी यासाठी त्यांनी तीन वर्षांहून अधिक काळ आंदोलन केलं होतं.
आबी यांनी नागरिकांना एकमेकांच्या दु:खावर फुंकर घालून विश्वासानं आणि एकजुटी राहण्याचं आवाहन केलं आहे.
इथिओपियाच्या नागरिकांनी आबी यांच्या ध्येयधोरणांचं स्वागत केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)