तृप्ती देसाई म्हणतात 'गनिमी काव्याने' शबरीमलात परत येणार

भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी शबरीमला मंदिर प्रवेशाचं आंदोलन घेतलं मागे घेतलं आहे. 14 तास त्या कोची विमानतळावर ताटकळत बसल्या होत्या. विमानतळाबाहेर निदर्शनं होत असल्यामुळे त्या बाहेर पडू शकल्या नाहीत.

त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं, "स्वामी अय्यप्पांचा खरा भक्त असा वागणार नाही. पोलिसांनी मला चांगलं सहकार्य केलं. आमच्या लक्षात आलं की आम्ही पोलिसांसोबत शबरीमलापर्यंत गेलो तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आम्ही त्यासाठी इथे आलो नव्हतो. आम्ही आता दुःखी अंतःकरणाने परत जात आहोत. आम्ही गनिमी काव्याने शबरीमलाला परत येऊ."

शुक्रवारी पहाटे चार वाजता तृप्ती देसाई कोची विमानतळावर पोहोचल्या तेव्हापासूनच वातावरण तापलं. विमानतळाच्या बाहेर आंदोलक मोठ्या संख्यने जमा झाले होते.

तृप्ती देसाईंचं म्हणणं आहे की आंदोलकांनी त्यांना मिळालेल्या टॅक्सी चालकांनाही धमकावलं तसंच त्यांना आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

"आंदोलकांना भीती आहे की एकदा का तृप्ती देसाई विमानतळाच्या बाहेर पडल्या तर त्या मंदिर प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. आंदोलक हिंसक झाले आहेत आणि आम्हाला विमानतळावर अडवलं आहे. याआधी कोणालाच असं अडवलं नव्हतं. मला वाटतं हेच आमच्या आंदोलनाचं यश आहे. फक्त फक्त सात महिलांना लाखो आंदोलक घाबरले आहेत," तृप्ती देसाईंनी बीबीसीला सांगितलं.

त्या आता पुण्यासाठी रवाना होत आहेत.

मंदिर प्रवेशासाठी आंदोलनं

शनिशिंगणापूरच्या मंदिरात, कोल्हापूरच्या मंदिरात आणि हाजी अलीच्या दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश मिळण्यासाठी तृप्ती यांनी यांनी आंदोलनं केली आहेत.

तृप्ती देसाईंनी एकीकडे महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी आंदोलनं केली असताना त्यांच्यावर स्टंटबाजीचा आरोप सनातन संस्थेने केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)