You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'इंदुरीकर महाराजांचं समाजकार्य लाजवाब, पण त्यांनी महिलांचा आदर करावा' - सोशल
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनांवर काही महिलांनी आक्षेप नोंदवले आहेत. या संदर्भातली 'इंदुरीकर महाराजांना महिलांशी काय प्रॉब्लेम आहे?' ही बातमी बीबीसी मराठीनं शुक्रवारी (8 मार्च) प्रसिद्ध केली होती.या बातमीवर विविध स्तरांतील वाचकांनी उत्सफुर्त प्रतिक्रिया नोंदवल्या.
काही वाचकांनी इंदुरीकर महाराज समाजाची सध्याची स्थिती मांडतात, असं मत व्यक्त करत त्यांच्या कीर्तनातील विषयांचं समर्थन केलं आहे. तर अनेक वाचकांना असं वाटतं की चांगले सामाजिक कामं करत असले तरी इंदुरीकर महाराजांनी महिलांचा आदर केला पाहिजे.
या बातमीवर आलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया इथं देत आहोत.
ज्योती ऋषिकेश यांनी फेसबुकवरील प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, "जगात जसं काही सर्व प्रश्न फक्त बायकांशीच संबंधित आहेत. प्रवचनाचे विषय काय तर नवरा-बायको, सासू-सुन इतकंच. महिला सुरक्षा, स्वच्छता , भ्रष्टाचार, कुपोषण, शिक्षण आदी अनेक विषय आहेत, पण इंदोरीकर फक्त बायकांची नक्कल करतात."
ज्योती ऋषिकेश यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना ओंकार इंगवले यांनी म्हटलं आहे की, "इंदोरीकर प्रबोधनकार आहेत. ते ज्या भागात काम करतात तिथल्या परिस्थितीबद्दल बोलतात. तुम्ही शहरी भागात राहून त्यांचे विचार समजू शकत नाही हे वास्तव आहे."
किरण अंभोरे लिहितात की, "महाराज महिलांना जास्त टोमणे मारतात, त्यामुळे सासुरवाशीण महिलांना सासरच्या मंडळींकडून मिळणाऱ्या वागणुकीला प्रोत्साहन मिळते. त्यांच्यामुळे काही लोक महिलांना वेगळ्या दृष्टीने बघतात."
तर पंजाबराव देशमुख यांच्या मते, "कालबाह्य झालेल्या भाकडकथांवर कीर्तन करणाऱ्यांपेक्षा ज्वलंत समस्यांवर भाष्य करणारे इंदोरीकर कधीही चांगले. इंदोरीकर फक्त महिलांवरच नव्हे तर मुलं, पुरुष, राजकारणी, ढोंगी भक्त, वाईट रूढी आणि परंपरा इ. सर्वच गोष्टींवर टीका करतात. त्यांची शैली लोकांना अपील होते. म्हणून टीका ऐकायलाही हजारो महिला कीर्तनाला येतात."
पण पूर्णिमा बेडेकर यांच्या मते, "इंदोरीकरांचे सामाजिक कार्य लाजवाब आहे. ते जरी आपल्या विशेष पठडीतला बाज समाज सुधारणेसाठी वापरत असतील तरी, त्यांना महिलांना टार्गेट करण्याचा काही अधिकार नाही. कीर्तनकारांनी महिलांचा आदर ठेऊन भाष्य करावे ही विनंती."
याला जोडून मृणाली नलावडे-सुर्वे लिहितात, "महाराज असतील चालवत अनाथ मुलांची शाळा आणि इथे असणाऱ्यांना समजत ही नसेल कीर्तन पण म्हणून ते जे स्त्रियांबद्दल अपशब्द वापरतात ते चुकीचेच आहेत आणि जर त्यांना समाज प्रबोधन करायचे असेल तर त्यांनी ते योग्य शब्दांत आणि योग्य उदाहरणे करून करावे. कसे आहे की तुमची बोलण्याची पद्धत सांगते की तुम्ही कसे व्यक्ती आहात."
रोहित भोरे यांना वाटतं की इंदुरीकर महाराजांना "फक्त टिकटॉकच्या माध्यमातून ओळखणाऱ्यांना" त्यांचं कीर्तन कळत नाही. "महाराजांचा जास्त वेळ हा समाज प्रबोधनात असतो.. आई-वडिलांची सेवा करा... घर-गृहस्ती नीट ठेवा, ह्यावर जास्त भर असतो..." असं त्यांना वाटतं.
प्रतीक दगडे यांनी ट्विटरवरील प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, "महाराजांचं बोलणं वेगळ्या पद्धतीचं आहे, पण जे बोलतात ती सत्य परीस्थिती आहे आजच्या समाजाची. गोड बोलून, समज देऊन आजचा समाज समजत नाही, म्हणून ते तशी भाषा वापरत असतील. महिलांना शिकून मोठं व्हायला पण तेच कीर्तनात सांगतात."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)