You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संघाचा भागवत-धर्म : हिंदुत्व, इस्लाम, संस्कृती आणि राष्ट्रवाद
- Author, सुहास पळशीकर
- Role, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामूहिकपणे विचारविनिमय करून निर्णय घेतले जातात असे संगितले जात असले तरी सरसंघचालक असलेल्या व्यक्तीच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा खास प्रभाव पडत असणार हेही खरेच आहे. स्थापनेनंतर अशाप्रकारे संघाला कलाटणी देणारे दोन सरसंघचालक होऊन गेले - एक माधव गोळवलकर गुरुजी आणि दुसरे बाळासाहेब देवरस.
आज संघावर जे आक्षेप घेतले जातात त्यांच्यापैकी अनेक आक्षेपांचे मूळ गोळवलकरांच्या भूमिकांमध्ये आढळते. तर, आज संघाचा जो दबदबा सार्वजनिक आणि खास करून राजकीय क्षेत्रात आहे त्याचे श्रेय प्रामुख्याने देवरसांना द्यावे लागेल.
आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच तीन व्याख्याने दिली आणि त्यातील काही भूमिकांमुळे कदाचित संघाच्या वाटचालीला कलाटणी देणारे तिसरे सरसंघचालक म्हणून त्यांचा उल्लेख भविष्यकाळात होईल का असा प्रश्न सहजच कोणाच्याही मनात येईल.
'आपण प्रसिद्धीच्या मागे नसतो' असे म्हणणारी ही संघटना. पण तिच्या प्रमुखांनी जी भाषणे केली ती मात्र तिच्या सभासदांसाठी नव्हती, तर 'बाहेरच्यांसाठी' आणि खास करून संघाबद्दल मनात शंकाजन्य कुतूहल असलेल्या लोकांसाठी होती.
ती भाषणे दिल्लीतल्या खास राखीव अशा विज्ञान भवनात झाली; त्यांचे वृत्तांत तर सगळ्या वर्तमानपत्रांत भरभरून आलेच, पण त्यांचे अनेक वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण झाले; एकाहून एक प्रतिष्ठित कलावंत, उद्योजक, वगैरेंनी या व्याख्यानांना हजेरी लावली आणि 'प्रसिद्धीपराङ्मुख' संघाने त्याची भरपूर जाहिरात चालवली आहे!
सामाजिक माध्यमांत सध्या त्यांच्याच वक्तव्यांचा सगळीकडे बोलबाला आहे. एवढी प्रसिद्धी संघाला आजवर बहुधा कधीच मिळाली नसेल!
संघ बदलतो आहे?
आता संघ बदलतो आहे किंवा बदलणार आहे अशी भाष्ये लगबगीने सगळेजण देऊ लागले आहेत.
आणखी सहाएक वर्षांनी (2025) रास्वसंघाला शंभर वर्षं पूर्ण होतील. इतका दीर्घ काळ अस्तित्वात असलेल्या एखाद्या अजस्त्र संघटनेमध्ये वेळोवेळी काही स्थित्यंतरं होणं स्वाभाविक असतं आणि संघातही तशी स्थित्यंतरं आधीसुद्धा झाली आहेतच.
संघाचे काही विरोधक ती एक स्थिर आणि अपरिवर्तनीय वस्तू मानतात आणि तिच्या जुन्या वैशिष्ट्यांच्या आधारे तिच्यावर टीका करतात, त्यामुळेच संघावरची टीका काही वेळा गैरलागू आणि संदर्भविहीन ठरते. ते अर्थातच संघाला सोयीचं ठरतं कारण अशा टीकेला समाजात फारशी मान्यता मिळत नाही.
'संघ वेगळाच आहे आणि टीकाकार त्याच्याविषयी गैरसमज बाळगतात' अशी तक्रार किंवा 'संघ आता बदलला आहे' अशी प्रमाणपत्रे, यांच्या पलीकडे जाऊन संघाचे काय चालले आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आता अलीकडे सरसंघचालक मोहन भागवतांनी जी व्याख्याने दिली त्यांमधून सुभाषितांसारखी निवडक अवतरणे (quotable quotes) माध्यमांमधून पेरणे चालले आहे. त्यामुळे सगळी चर्चा या सुभाषितांवर चालली आहे.
सरसंघचालक नवं काय म्हणाले?
सरसंघचालकांनी जे प्रतिपादन केलं त्यात नवीन काय आहे? संघात खरोखरीच बदल होताहेत किंवा होणार आहेत असं त्याच्या आधारे म्हणता येईल का?
उदाहरणार्थ, गोळवलकर गुरुजींच्या काही प्रतिपादनापासून भागवतांनी कटाक्षाने अंतर राखलं आणि स्पष्टपणे त्यातील काही भाग आता लागू नसल्याचं सांगितलं. एखाद्या संघटनेत स्पष्टपणे पूर्वसुरींचे विचार आता लागू नसल्याचे सांगणे हे नक्कीच धाडसाचे आहे आणि त्याद्वारे भागवत संघाचा दृष्टिकोन बदलू पाहात आहेत असं चित्र नक्कीच उभं राहातं.
पण गोळवलकरांचं 'Bunch of Thoughts' हे पुस्तक संघात या पूर्वीच मागे पडलेलं होतं हेही लक्षात ठेवायला हवं.
दुसरी बाब म्हणजे हिंदू धर्माचा गोळवलकरप्रणीत कर्मठ आणि रूढीजन्य अन्वयार्थ देवरसांच्या काळातच संघाने अलगद मागे सोडून दिला आहे. त्या अर्थाने भागवत हे देवरसांनी सुरू केलेल्या बदलांचा परीघ विस्तारत आहेत असं म्हणता येईल. किंवा देवरसांनी जे फार न बोलता आणि अनौपचारिकपणे केलं त्याला आता भागवत अधिकृत किंवा औपचारिक स्वरूप देत आहेत असं म्हणता येईल.
मुस्लिमांना खरंच स्वीकारलं?
मुस्लिम नकोसे वाटणे हे काही हिंदुत्वात बसत नाही, असेही भागवत म्हणाले. संघाने अशा प्रकारे स्वतःमध्ये काही बदल घडवून आणला तर अर्थातच इथल्या अल्पसंख्यक समाजाला थोडं हायसं वाटेल. पण मग राष्ट्रीय मुसलमान हा शब्दप्रयोग सोडावा लागेल, रथयात्रेच्या दरम्यान भारतात विविध राज्यांमध्ये झालेली हिंसा चुकीची होती असं म्हणावं लागेल, किंवा गुजरातमध्ये 2002मध्ये झालेल्या हिंसेची निर्भत्सना करावी लागेल.
आणि जर सगळे मुस्लिम हे भारतीयच आहेत आणि संघ भारतीयांचा आहे, तर मुस्लिम राष्ट्रीय मंच ही जी आघाडी संघाने उघडली आहे तिचे काय करायचे? पण त्याही पलीकडे जाऊन इस्लामविषयीचं संघाचं आतापर्यंतचं आकलन मूलतः बदलावं लागेल. जर त्याची सुरुवात या भाषणांमधून झाली असेल तर पुढील काळात त्याचं प्रत्यंतर येईलच.
पण शक्यता अशी आहे की मुस्लिम मुळातले हिंदूच आहेत आणि म्हणून ते (जर 'नीट' वागले तर) राष्ट्राचा भाग आहेत या जुन्याच मुद्द्यापाशी संघाची रेकॉर्ड अडकून पडण्याची शक्यताच जास्त आहे.
कारण भागवत असं देखील म्हणाले की इथे (भारतात) आम्हाला अल्पसंख्य हा शब्द पूर्वी माहिती नव्हता. तो ब्रिटिशांनी आणला. ही भूमिका अल्पसंख्य समुदायांच्या अधिकारांविषयी नेहेमी हिंदुत्ववादी वर्तुळातून जी टीका केली जाते त्याच्याशी मिळतीजुळती अशीच आहे. त्यामुळे एकीकडे 'आम्हाला मुसलमान नकोसे नाहीत' अशी आश्वासक भाषा आणि दुसरीकडे सैद्धांतिक पातळीवर अल्पसंख्य या वर्गवारीला विरोध अशा दुहेरी भूमिकेमुळे भागवतप्रणीत समावेशकता संशयास्पद वाटणार.
हिंदुत्वाचा झगा
पण अशा सुट्या एकेका वाक्यांच्या पलीकडे जाऊन भागवतप्रणीत एकंदर भूमिका शोधायला गेलो तर आपल्याला काय दिसतं?
सरसंघचालकांच्या सगळ्या सौजन्यशील उद्गारांचा आणि सद्भावनांचा पुरेसा आदर केला तरीही हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्व यांच्याविषयीचे प्रश्न शिल्लक राहतीलच. उदाहरणार्थ, सर्व वादग्रस्त प्रश्न ते हिंदुत्वाच्या चौकटीतच पाहतात. हिंदुत्व, हिंदू धर्म आणि राष्ट्रीयत्व यांच्या परस्परसंबंधांचा घोळदार झगा झुगारून द्यायला अद्यापही संघ तयार नाही.
हा मुद्दा वैचारिक मतभेदाचा तर आहेच, पण युक्तिवादाच्या किंवा विवादाच्या निरर्थक गोलमालपणाचा आहे.
गोहत्या बंदी आणि गोरक्षण यांचे भागवतांनी समर्थन केले. अर्थातच, जे गोभक्त आहेत त्यांनी गोरक्षण केले तर ते स्वाभाविक म्हणता येईल. पण सगळ्या भारताची ती नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी कशी ठरू शकते?
ज्या हिंदू 'संस्कृती'बद्दल भागवत बोलतात तिच्यात अनेक प्रवाह राहिले आहेत आणि त्यातले काही गायीला पूज्य मानतात तर काही मानीत नाहीत. त्यामुळे गाय हे प्रतीक घेतले तर ते एका विशिष्ट धार्मिक परंपरेचे प्रतिनिधित्व करते, 'भारतीय' संस्कृतीचे नाही. तरीही गोहत्या-प्रतिबंध आणि गोमांसभक्षणाला प्रतिबंध यांचं समर्थन करायचं आणि ते हिंदू धर्माशी नव्हे तर भारतीय राष्ट्राच्या अभिमानाशी जोडायचं याची संगती कशी लावायची?
धर्म आणि संस्कृतीची सरमिसळ
तीच गोष्ट राममंदिराची. भारतातील एका धार्मिक गटाला अयोध्येत राम मंदिर व्हायला हवं असं वाटतं; पण तो मुद्दा अडवणींनी जसा राष्ट्राशी जोडला तसा जोडायचा आणि त्याला धर्माऐवजी संस्कृतीचा हवाला द्यायचा ही गफलत कायम राहते.
संस्कृती आणि धर्म यांची ही गल्लत किंवा सरमिसळ करायची आणि मग राष्ट्र हे संस्कृतीवर आधारित असते, असा युक्तिवाद करीत भारतीय राष्ट्र भारतीय संस्कृतीवर आधारित असेल असे म्हणतानाच भारतीय संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती असं ठासून सांगायचं हे संघाच्या विचारांचं जुनंच वैशिष्ट्य अजून उगाळलं जाताना दिसतं.
धर्म आणि संस्कृती यांची सरमिसळ आणि मग संस्कृती आणि राष्ट्र यांच्या संबंधाची चर्चा हा झाला युक्तिवादाच्या गोलमालपणाचा नमुना.
पण हा प्रश्न नुसता हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा हिंदू विरुद्ध ख्रिश्चन असा नाही, तर एकजीव समाज होण्यासाठी आपण कोणता आधार निवडायचा याच्या निर्णयाचा आहे.
एकदा तो आधार 'इथल्या' परंपरेच्या नावाखाली हिंदू म्हणून ओळखल्या जाणार्या पण प्रत्यक्षात इथल्या बहुविध परंपरांच्या पैकी एकाच विशिष्ट परंपरेचा आहे असा दावा केला की राष्ट्र सर्वसमावेशक होण्यात व्यवहारिकच नाही तर तात्त्विक अडचण येते.
भागवतांनी या भाषणांदरम्यान हिंदुत्वाची त्यांची व्याख्या दिली आहे: विविधतेमध्ये एकता, त्याग, आत्मसंयम आणि कृतज्ञताभाव हे हिंदुत्वाचे घटक आहेत असे ते म्हणाले.
हे घटक वरकरणी तरी थेट धर्माशी संबंधित नाहीत, पण त्यांच्याच भाषणात आणि नंतर प्रश्नोत्तरांत जे विविध मुद्दे आले तिथे मात्र पुन्हापुन्हा हे अमूर्त हिंदुत्व गायब होऊन हिंदू नावाने ओळखल्या जाणार्या एका धार्मिक समूहाच्या आकांक्षा आणि कल्पना यांचाच पाठपुरावा केलेला दिसतो.
सरसंघचालकांच्या या भाषणांमुळे संघ बदलेल का?
भागवतांनी मांडलेली एकूण भूमिका बाहेरून पाहणार्यांना कितीही सफाईदार आणि परिपक्व वाटली तरी खुद्द संघात—म्हणजे स्वयंसेवकांमध्ये - स्वप्रतिमा अशीच राहिली आहे की आपण आणि आपली संघटना समावेशक, सेवाभावी, आणि अर्थातच राष्ट्रवादी आहोत आणि हिंदू व राष्ट्रीयत्व एकच आहेत.
या दृष्टीने पाहिलं तर भागवतांच्या भाषणांमुळे ना संघात अस्वस्थता निर्माण होईल ना काही मनपरिवर्तन होईल. सगळे भारतीय हिंदूच आहेत आणि तरीही काही भारतीयांना हिंदू बनविण्यासाठी झटापट करावी लागणार अशा दुहेरी भूमिकेत संघ वावरत आला आहे आणि त्या भूमिकेला आताच्या नव्या घडामोडींमुळे कुठेही छेद जाण्याची शक्यता नाही.
हिंदू राष्ट्रवाद आणि त्याच्या मुळाशी असलेला हिंदुत्ववाद यांच्यापासून संघ दूर गेलेला नाही—जाणे अवघडदेखील आहे. भागवतांच्या भाषणामधून तसं कुठेही सूचित होत नाही, होण्याची शक्यता देखील नाही.
सुमारे शतकभर ज्या हिंदुराष्ट्रवादाच्या स्थापनेसाठी संघाने प्रयत्न केले, तोच मुद्दा आता सोडून दिला जाईल ही अपेक्षा व्यर्थ आहे आणि नेमक्या त्याच करणासाठी भागवतांच्या भाषणामधील अनेक सूत्रे संघाच्या जुन्या पठडीपेक्षा वेगळी वाटली तरी त्यातून होणारी फलनिष्पत्ती दिखाऊ किंवा वरवरच्या बदलांची राहणे अपरिहार्य आहे.
मग या भाषणांची फलश्रुती काय?
कठोर भाषेत सांगायचं तर बाहेरच्यांचा बुद्धिभेद ही ती फलश्रुती असेल. पण वैचारिक हस्तक्षेपाला केवळ बुद्धिभेद असे म्हणणे खूप अपुरे आहे. आपला विचार आता अधिक सफाईने आणि आत्मविश्वासाने संघटनेच्या बाहेर देखील प्रचलित केला पाहिजे या भूमिकेतून ही भाषणे दिली गेली.
देवरसांच्या काळापासून संघ आपल्या कोशातून बाहेर येऊन भारताच्या विचारविश्वात हस्तक्षेप करू लागला. भागवतांच्या आताच्या व्याख्यानांनी संघाचे हे वैचारिक हस्तक्षेपाचे राजकारण अधिक सशक्त केले आहे. समाजात आपल्या भूमिकेला अधिक स्वीकारार्हता मिळावी म्हणून उचलेले हे पाऊल आहे. विचारांच्या युद्धात संघाने ही एक नवी वैचारिक आघाडी उघडली आहे.
(लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)