इंदुरीकर महाराजांच्या मदतीला संभाजी भिडे : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. इंदुरीकर महाराजांच्या मदतीला संभाजी भिडे

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला तर आंदोलन करू असा इशारा शिवप्रतिष्ठानने दिला आहे. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी इंदुरीकर महाराजांना पाठिंबा दिला आहे.

"सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो, विषम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगी होते. टायमिंग हुकलं की क्वालिटी खराब," असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं होतं.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा अशी भूमिका घेतली आहे. 'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे. तृप्ती देसाई यांनी देखील तशी मागणी केली आहे.

त्यानंतर इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल झाला तर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल असा इशारा शिवप्रतिष्ठानतर्फे देण्यात आला आहे.

2. नागरिकत्व कायद्याला विरोध नाहीच- मुख्यमंत्री

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा विरोध असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र या कायद्याला आपला विरोध नाही याचा ठाम पुनरुच्चार केला. मंगळवारी सिंधुदुर्ग दौऱ्यात ओरोस इथे त्यांनी ही भूमिका मांडली. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

"नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी हे दोन वेगळे विषय आहेत. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी हा तिसरा स्वतंत्र विषय आहे. सीएए लागू झाला तरी आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. एनआरसी हा आलेला नाही, तो येणारही नाही. कारण एनआरसी लागू केला तर मुस्लिमांनाच नव्हे तर हिंदू, आदिवासी आणि इतर वंचितांनाही त्रासदायक ठरेल. एनपीआर ही जनगणना आहे. ती दर दहा वर्षांनी होते आणि त्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही," असं मुख्यमंत्री म्हणालेत.

देशातील अनेक राज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यात येत आहे. ठिकठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. राज्यात शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात या मुद्यावरून एकमत होताना दिसत नसल्याचं मंगळवारी दिसून आलं.

3. उच्च न्यायालयाच्या आदेशाचीच बनावट प्रत

उच्च न्यायालयाच्या आदेशाची बनावट प्रत तयार करून ती वितरीत करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्याची गंभीर दखल घेत या प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीसह अज्ञात व्यक्तीविरोधात फौजदारी कारवाईचेही आदेश न्यायालयाने दिले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी डिसेंबर 2019 मध्ये एका प्रकरणात दिलेल्या आदेशाची बनावट प्रत तयार करण्यात आली. ही प्रत वितरीत केली जात आहे. दोन वकिलांनी यासंदर्भात न्यायमूर्ती पटेल यांच्याकडे तक्रार केली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत कारवाईचा आदेश दिला.

आपल्या बाजूने न्यायालयाचा आदेश आहे हे दाखवण्यासाठी आणि दोन ठेवीदारांचा शोध घेण्यासाठी बनावट आदेशाची प्रत तयार करण्यात आल्याची बाब याप्रकरणाची तक्रार करणाऱ्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

न्यायमूर्ती पटेल यांनी बनावट आदेशाच्या प्रतीची पडताळणी केली. त्यानंतर आदेशाची ही प्रत आपली नसल्याचं आणि ती पूर्णपणे बनावट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आदेशाच्या बनावट प्रतीचा प्रकार उघडकीस येताच संबंधित बँक खाती गोठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने हे प्रकरण मुख्य न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून देण्याचे आदेश महानिबंधक कार्यालयाला दिले आहेत.

4. जम्मू काश्मीरातील पंचायत निवडणुका लांबणीवर

जम्मू काश्मीरमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या पंचायत निवडणुका लांबणीवर टाकत असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी सूचना राज्याच्या गृह खात्याने केल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. 'एनडीटीव्ही'ने ही बातमी दिली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत असल्याचा दावा सरकारकडून केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय परस्परविरोधी आहे.

2018मध्ये जम्मू काश्मीरमध्ये शेवटच्या पंचायत निवडणुका झाल्या होत्या.

5. ट्रंप भेटीत हेलिकॉप्टर डील पक्कं होणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या भारत भेटीदरम्यान 24 MH -60 R हेलिकॉप्टर डीलवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या कराराचा अंतिम मसुदा कॅबिनेटच्या सुरक्षाविषयक समितीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 'द हिंदू'ने ही बातमी दिली आहे.

प्रक्रियेसाठीचे तांत्रिक सोपस्कार झाले आहेत. 24 लॉकहीद हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी 2.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च येणार आहे.

ट्रंप 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी भारतात आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)