व्होडाफोन-आयडिया भारतीय बाजाराला रामराम ठोकणार का?

    • Author, अरुणोदय मुखर्जी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

व्होडाफोन आणि आयडियाने 2500 कोटी रुपये सोमवारी आणि 1000 कोटी रुपये शुक्रवारपर्यंत देण्याचा प्रस्ताव दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन-आयडियाची ही याचिका फेटाळली आहे

कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती.

न्या. अरूण मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. यापूर्वीदेखील सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन-आयडियाला कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिला होता.

ही रक्कम सरकारचा अतिरिक्त महसूल म्हणून जमा होणार असली तरी यामुळे संपूर्ण दूरसंचार उद्योगाला मोठा धक्का बसणार आहे.

दूरसंचार क्षेत्र

भारत दूरसंचार क्षेत्रातली सर्वात मोठी बाजारपेठ असली तर इथल्या प्रमुख कंपन्या सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहेत.

या दूरसंचार कंपन्यांना एकूण मिळून 13 अब्ज कोटी एवढी मोठी रक्कम महसूल म्हणून सरकारला द्यायची आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 17 मार्चपर्यंत मुदत दिली आहे.

इतकंच नाही तर वेळेत पैसे न भरल्यास दूरसंचार कंपन्यांवर कोर्टाचा अवमान केल्याचा दावा का ठोकू नये असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.

व्होडाफोन-आयडिया या कंपनीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल नेमका त्यांच्या कठीण काळात आला आहे.

व्होडाफोन-आयडियाचा तोटा

कंपनीला गेल्या आठवड्यात 6453 कोटी रुपयांचा तिमाही तोटा झाला होता. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 4998 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

सरकार किंवा न्यायालयाकडून मदत मिळाली नाही तर कंपनीला आपला गाशा गुंडाळावा लागेल, असं कंपनीचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी जाहीरपणे म्हटलं होतं. यावरूनच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं.

व्होडाफोन-आयडिया आणि त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी असलेली एअरटेल या कंपन्या अशावेळी मदत मागत आहेत ज्यावेळी या दोन्ही कंपन्या घसरलेले कॉल आणि डेटा रेट आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आहेत.

न्यायालयाने पैसे जमा करण्यासाठी 17 मार्चची मुदत दिली आहे. दुसरीकडे सरकार काहीच पावलं उचलताना दिसत नाही. अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की व्होडाफोन-आयडिया खरंच दुकान बंद करणार का?

ब्रिटनची कंपनी असणारी व्होडाफोन भारतीय दूरसंचार बाजारातली सर्वात मोठी आणि सर्वात जुनी कंपनी आहे. कंपनीने भारतातला आपला व्यवसाय बंद केला तर त्याचा मोठा परिणाम होईल. कंपनीचे 30 कोटींहून अधिक ग्राहक आहेत आणि हजारो कर्मचारी आहेत.

इतकंच नाही तर कंपनीला टाळं ठोकण्याचा नकारात्मक परिणाम बाजारातील इतर दूरसंचार कंपन्यांवर होईल.

कंपनीला टाळं लागलं तर....

व्होडाफोन-आयडियाने आपली सेवा बंद केली तर भारतीय दूरसंचार बाजारात केवळ रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोनच कंपन्या उरतील.

भारती एअरटेल कंपनीची परिस्थितीही फार समाधानकारक नाही. गेल्या तिमाहीत कंपनीला 3 अब्ज डॉलरचा तोटा झाला होता. तर कंपनी सरकारला जवळपास 5 अब्ज डॉलर देणं आहे.

दूरसंचार बाजारात सर्वात नवीन खेळाडू असणाऱ्या रिलायन्स जिओसाठी ही फिलगुड स्थिती आहे. दूरसंचार बाजारात या बदललेल्या परिस्थितीसाठी अनेकजण रिलायन्स जिओलाच जबाबदार धरतात.

तीन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात पाय ठेवताच इंटरनेटचे दर इतकी कमी केले की कॉल मार्केट डेटा मार्केटमध्ये बदललं आणि भारत जगात सर्वात स्वस्त डेटा पुरवणारा देश बनला. मात्र, यामुळे व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल यांचं बिझनेस मॉडल पूर्णपणे कोलमडलं.

यानंतर दोन्ही कंपन्यांनी आपले लाखो ग्राहक गमावले. दोन्ही कंपन्यांचं एकूण जवळपास 10 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. आता या दोन्ही कंपन्यांना पुढच्या महिन्यापर्यंत सरकारला मोठी रक्कम द्यायची आहे.

सर्वात जास्त नफा कुणाला?

2019 पर्यंत रिलायन्स जिओकडे 35 कोटी ग्राहक होते. व्होडाफोन-आयडिला टाळं लागलं तर त्याचा सर्वात जास्त फायदा जिओलाच होणार, असं म्हटलं जातं.

2022 सालापर्यंत रिलायन्स जिओचा नफा दुप्पट होईल आणि तोवर कंपनीच्या ग्राहकांची संख्याही 50 कोटींच्या वर असेल, असं दूरसंचार क्षेत्रातल्या जाणकारांचं म्हणणं आहे.

मात्र, पैशांबाबत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी याचा अर्थ काय? कदाचित त्यांच्यासाठी ही चांगली लक्षणं नाहीत. व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांना झालेल्या तोट्यामुळे तिन्ही कंपन्यांनी आपले दर वाढवले आहेत.

अर्थतज्ज्ञ विवेक कौल म्हणतात, "किमती वाढणं वाईट नाही. प्रत्यक्षात हे चांगलंच होईल. कारण बाजारात स्पर्धा टिकवण्याचा हाच सर्वोत्तम पर्याय आहे. भारतात टेलिकॉम कंपन्याचं अस्तित्व टिकवणं आणि त्याच्या भरभराटीसाठी हे गरजेचं आहे."

मात्र, असं झालं तर भारतासारख्या मोठ्या दूरसंचार बाजाराच्या विकासाच्या मार्गात यामुळे अडथळा येईल का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी अजून थोडी वाट बघावी लागणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)