अनिल अंबानी: फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीपासून ‘दिवाळखोरी’पर्यंत

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आपल्या डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे पुरेशी संपत्ती नसल्याचं अनिल अंबानींनी या आठवड्यात जाहीर केलं. एकेकाळी फोर्ब्सच्या श्रीमंताच्या यादीत झळकणारं हे नाव दिवाळखोरीपर्यंत कसं आलं?

फोर्ब्सच्या यादीनुसार एकेकाळी म्हणजे फार पूर्वी नाही तर 2008मध्ये अनिल अंबानींची संपत्ती होती 42 अब्ज अमेरिकन डॉलर्स. फोर्ब्सच्या यादीत अनिल अंबानी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. हा अनिल अंबांनीचा सर्वांत श्रीमंतीचा काळ होता.

मुकेश आणि अनिल असे दोन्ही अंबानी बंधू त्यावेळी फोर्ब्सच्या जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये झळकले होते. मुकेश अंबानींची संपत्ती त्यावेळी होती 49 अब्ज डॉलर्स.

2002मध्ये धीरूभाई अंबानींचं निधन झालं. तीन वर्षं मुकेश आणि अनिल अंबानींमध्ये संपत्तीवरून भांडणं झाली आणि त्यानंतर रिलायन्स साम्राज्याची वाटणी झाली.

28,000 कोटींच्या रिलायन्स साम्राज्याच्या या वाटणीमध्ये मुकेश अंबानींना तेल उद्योग मिळाला. RIL आणि इतर पेट्रोकेमिकल्स कंपन्या मुकेश यांच्या ताब्यात गेल्या.

तर अनिल अंबानींना रिलायन्स इन्फोकॉम हा टेलिकॉम बिझनेस मिळाला. याशिवाय त्यांना रिलायन्स एनर्जी, रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस या कंपन्याही मिळाल्या.

अनिल अंबानींच्या वाट्याला आलेल्या सगळ्या कंपन्या या नवीन वा आधुनिक व्यवसायांतल्या होत्या. यानंतर अनिल अंबानींनी स्वतः काही कंपन्या विकतही घेतल्या. 2005मध्ये त्यांनी अॅडलॅब्स फिल्स कंपनी विकत घेतली.

2008मध्ये त्यांनी स्विव्हन स्पीलबर्ग यांच्या ड्रीमवर्क्ससोबत 1.2 अब्ज डॉलर्सचा करार केला. याशिवाय इन्फ्रास्ट्रक्टर क्षेत्रामध्येही अनिल अंबानींनी उडी घेतली.

एकीकडे अनिल अंबानी मॅरेथॉन्स गाजवत होते, दुसरीकडे त्यांची व्यावसायिक घोडदौडही सुरू होती. वाटणीनंतर दोन्ही भावांमध्ये स्पर्धा सुरू झाली होती आणि लहान भाऊ मोठ्या भावाला मागे टाकणार, असा अंदाज उद्योग विश्वातले तज्ज्ञ वर्तवत होते. पण परिस्थिती झपाट्याने पालटली.

रिलायन्स पॉवरचा फसलेला इश्यू

रिलायन्स पॉवरचा पब्लिक इश्यू आणून, अर्थात शेअर्स सार्वजनिक विक्रीसाठी खुले करत त्याद्वारे निधी उभा करण्याचा प्रयत्न अनिल अंबानींनी केला. या IPOची मार्केटमध्ये मोठी चर्चा होती. हा इश्यू 72 पटींनी ओव्हरसबस्कराईब झाला.

मात्र हाच अनिल अंबानींना बसलेला पहिला मोठा धक्का होता.

11 फेब्रुवारी 2008मध्ये या रिलायन्स पॉवरचं लिस्टिंग झाल्यावर शेअर 538च्या मूल्यावर उघडला. इश्यू प्राईस होती 450 रुपये. पण नंतर यात घसरण होऊ लागली आणि दिवसाअखेरीस 372.50 रुपयांवर ट्रेडिंग बंद झालं.

कंपनीने गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी बोनसही दिला, पण गोष्टी सुधारल्या नाहीत. हा शेअर आपल्या इश्यू प्राईसच्या वर ट्रेडिंग दरम्यान कधीही गेला नाही.

आर-कॉमला बसलेले झटके

टेलिकॉम क्षेत्राच्या उभरत्या काळातच अनिल अंबानींच्या हातात ही टेलिकॉम कंपनी आली होती. पण काळासोबत वेग टिकवून ठेवणं कंपनीला जमलं नाही.

आर-कॉमने GTL इन्फ्रासोबत केलेला करार फसला. कंपनीने CDMA 2G, 3G सोबतच पायाभूत तंत्रज्ञानातही गुंतवणूक केली. पण या क्षेत्रातल्या इतर कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहणं आर-कॉमला अवघड गेलं.

शिवाय पुन्हा एअरसेल कंपनीसोबतचा त्यांचा सौदाही फसला.

घसरण

2011 पर्यंत अनिल अंबानींची संपत्ती घसरून 8.8 अब्ज डॉलर्सवर आली. 2G घोटाळा तेव्हा जगासमोर आला होता आणि स्वान टेलकॉमशी अनिल अंबानींचे असलेले संबंध तपासण्यासाठी CBIची चौकशी सुरू झाली होती.

2013 पर्यंत रिलायन्स पॉवरचा फुगा फुटला आणि अनिल अंबानींची संपत्ती आली 5.2 अब्ज डॉलर्सवर, जवळपास 3 अब्जांनी कमी.

2014 पर्यंत अनिल अंबानींच्या इन्फ्रा आणि पॉवर कंपन्यांनी मोठी कर्जं काढली होती. अनिल अंबानींच्या बहुतेक कंपन्या तोट्यात होत्या. आणि परतफेड करण्यासाठी या कंपन्यांकडे पुरेसा निधी नव्हता. म्हणून मग अनिल अंबानींना आपल्या कंपन्यांच्या मालकीची मालमत्ता विकावी लागली.

यानंतर अनिल अंबानींची झपाट्याने घसरण सुरू झाली.

राफेलचा वाद

राफेल खरेदी करार करताना त्याच्यातल्या 'ऑफसेट क्लॉज'साठी अनिल अंबानींच्या कंपनीची भागीदार म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्यावरून गदारोळ झाला.

भारत सरकार जे 59,000 कोटी रुपये या व्यवहारासाठी देईल, त्यातील 50 टक्क्यांची गुंतवणूक कशी करायची, याच्या काही अटी होत्या. याचाच अर्थ दसॉ एव्हिएशनला 30,000 कोटींची गुंतवणूक भारतात करणं आवश्यक होतं.

फेब्रुवारी 2017मध्ये 'दसॉ रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड' या कंपनीची स्थापन झाली.

रिलायन्सची भागीदार कंपनी म्हणून नेमणूक होणं हा गैरव्यवहार असून यात आर्थिक हितसंबंध असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली. शिवाय रिलायन्स एंटरटेमेंटने माजी राष्ट्रपती फ्रान्सुआ ओलांद यांची जोडीदार ज्युली गायेट यांच्या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठीही गुंतवणूक केली होती.

'जिओ'चा धक्का

त्यातच त्यांना घरातूनच मोठा धक्का बसला. वाटणीच्या वेळी अनिल अंबानींनी भावासोबत भांडून टेलिकॉम कंपनी स्वतःकडे घेतली होती. त्यानंतर या दोन्ही भावांमध्ये टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा न करण्याचंही (Non-compete clause) ठरलं.

2010मध्ये हे कलम काढून टाकण्यात आलं आणि 2016मध्ये 'जिओ' (Jio) द्वारे मुकेश अंबानींनी टेलिकॉम क्षेत्रात उडी घेतली. टेलिकॉम क्षेत्रातल्या सगळ्याच स्पर्धक कंपन्यांना याचा फटका बसला.

एअरटेलचा नफा मोठ्या प्रमाणात कमी झाला तर व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्या एकमेकांत विलीन झाल्या. डळमळीत झालेल्या अनिल अंबानींच्या आर-कॉमसाठी हा शेवटचा तडाखा होता.

अनिल अंबानींच्या अनेक कंपन्या अडचणी होत्या. या कंपन्यांवर मोठं कर्ज होतं आणि त्या सुरू ठेवण्यातही त्यांना अडचण येत होती. रिलायन्स पॉवरच्या मालकीच्या मालमत्तेची विक्री करण्याची पाळी आली. तर देशातल्या त्यावेळच्या टेलिकॉम कंपन्यांशीही स्पर्धा करणं रिलायन्स कम्युनिकेशन्स म्हणजेच आर-कॉमला कठीण जात होतं.

या सगळ्यात अनिल अंबानींच्या संपत्तीचा आकडा होता 2.5 अब्ज डॉलर्स. 2018पर्यंत अनिल अंबानींच्या संपत्तीत काहीशी वाढ होत ती 2.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

कर्जाच्या परतफेडीचा प्रयत्न

आपल्यावरच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आतापर्यंत अनिल अंबानींनी त्यांच्या 'BIG' समूहातल्या काही कंपन्या विकल्या. यामध्ये बिग सिनेमा, रिलायन्स बिग ब्रॉडकास्टिंग, बिग मॅजिक यांचा समावेश आहे.

रिलायन्स निप्पॉन (Reliance Nippon) मधला आपला हिस्साही अनिल अंबानींनी विकला. ही अनिल अंबानींकडील सर्वांत महाग मालमत्ता होती, जिचं मूल्य होतं 13,500 कोटी रुपये.

3 एप्रिल 2019च्या आकडेवारीनुसार अनिल अंबानींची संपत्ती 1.7 अब्ज डॉलर्स आहे.

2019मध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने दिवाळखोरी जाहीर केली. अनिल अंबानींनी थकबाकी भरावी अन्यथा त्यांना तुरुंगवास भोगावा लागेल असा सज्जड दम सुप्रीम कोर्टाने दिल्यावर त्यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी मदतीला धावले. मुकेश अंबानींनी अनिल यांच्यातर्फे 4.5 अब्ज डॉलर्सची थकबाकी भरली.

चीनी कंपन्यांचा दावा

इंडस्ट्रीयल अँड कमिर्शियल बँक ऑफ चायना (ICBC), चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्स्पोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ चायना या तीन बँकांनी अनिल अंबानींवर खटला भरलेला आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सला देण्यात आलेली कर्ज फेडण्यात आल्याने या तीन बँकांनी ही कारवाई केलीय.

या सुनावणीदरम्यान आपलं 'नेट वर्थ' शून्य असल्याचं अनिल अंबानींनी युकेच्या कोर्टात सांगितलं. अनिल अंबानींनी आपल्याला कर्ज आणि त्यावरचं मिळून 70 कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे 5,000 कोटी रुपये देणं असल्याचा या तीन बँकांचा दावा आहे.

भारतीय सरकारी बँका, चायनीज बँक्स आणि बॉण्ड धारक यांच्याखेरीज इतरांकडेही रिलायन्स कम्युनिकेशन्सची थकबाकी असून एकूण थकबाकीचे दावे 90,000 कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. आर-कॉमच्या ताळेबंदातल्या 46,000 कोटींच्या नोंदींच्या ही रक्कम दुप्पट आहे. दिवाळखोरी जाहीर केलेल्या कोणत्याही कंपनीवरचे हे सर्वात जास्त मूल्याचे थकबाकी दावे असतील.

अनिल अंबानी सांगत आहेत त्यापेक्षा त्यांची संपत्ती आणि उत्पन्न नक्कीच जास्त असल्याचं जस्टिस वेक्समन यांनी म्हटलंय. जस्टिस वेक्समन म्हणाले, "अंबानी स्पष्टपणे खोटं बोलले आहेत. ते सांगत आहेत त्यापेक्षा त्यांची मालमत्ता किंवा उत्पन्न नक्कीच जास्त आहे. माझ्या मते त्यांचे कुटुंबीय त्यांना सहकार्य करू शकतात आणि 715 कोटी रुपये ही रक्कम त्यांना परवडणारी असल्याने त्यांनी ती भरावी.

"मुकेश अंबानी यांची संपत्ती बघता कोर्टाने सांगितलेली रक्कम भरण्यास आपण सक्षम नाही, असं म्हणणं हास्यास्पद ठरेल. हे एक अत्यंत श्रीमंत कुटुंब आहे आणि यापूर्वीही त्यांनी एकमेकांना आर्थिक सहकार्य केलं आहे."

लक्झरी कार्स आणि यॉट

शिवाय चायनीज बँकांचे प्रमुख काऊन्सेल बांकी थांकी क्यूसी यांनीही काही सवाल उपस्थित केले आहेत. आपली मालमत्ता विकून अनिल अंबानी थकबाकी का भरत नाहीत, असा सवाल त्यांनी केलाय.

अनिल अंबानींच्या ताफ्यातल्या लक्झरी कार्सची किंमत 21.4 कोटी रुपये आणि त्यांच्या टिआन (Tian) या लक्झरी यॉटचं मूल्य 400 कोटी रुपये असल्याचा दावा थांकी यांनी केलाय.

अनिल अंबानींकडे लक्झरी कार्स, यॉट, जेट आणि हेलिकॉप्टरही आहे. पण या सगळ्या गोष्टी आपल्या मालकीच्या नसून कंपन्यांच्या मालकीच्या असल्याचं अनिल अंबानींचं म्हणणं आहे.

या खटल्याच्या सुनावणीसाठीची 5 कोटी रुपयांची फी ते कसे झेलत आहेत, असा सवालही चायनीज बँकांचे प्रमुख काऊन्सेल बांकी थांकी क्यूसी यांनी केलाय.

अनिल अंबानींनी सहा आठवड्यांच्या कालावधीत 10 कोटी डॉलर्स जमा करावे, असे आदेश लंडनच्या कोर्टाने दिलेले आहेत. या निर्णयाच्या विरुद्ध अनिल अंबानी याचिका करतील असा अंदाज आहे.

गेल्या खेपेला ते अडचणीत असताना मुकेश अंबानींनी त्यांना मदत केली. पण यावेळी आपण पैसे उभे करण्यात अयशस्वी ठरल्याचं अनिल यांनी कोर्टाला सांगितलंय.

अनिल अंबानींची सध्याची मालमत्ता आहे 0.5 अब्ज डॉलर्स... म्हणजे मुकेश अंबानींचं घर, अंदाजे 1 अब्ज डॉलर्सच्या अॅण्टिलियाच्या मूल्यापेक्षाही कमी.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)