अमरावती: शिक्षकांचे निलंबन मागे घेण्यासाठी विद्यार्थिनी संपावर

    • Author, हर्षल आकुडे आणि नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या चांदुर रेल्वे येथील एका महाविद्यालयातील प्राचार्य व दोन प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. प्राध्यापकांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्येच आंदोलन सुरू केले.

विदर्भ युथ वेल्फेयर सोसायटी द्वारा संचालित महिला कला, वाणिज्य महाविध्यालय चांदुर रेल्वेत व्हॅलेंटाईनडेच्या पूर्वसंध्येला प्रेम विवाह न करण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या एका कार्यक्रमात प्रेमविवाह करणार नाही अशी शपथ विध्यार्थ्यांना दिली गेली होती. शपथ देण्याच्या बातमीवरून राज्यभरात गदारोळ झाला होता. शपथ देणाऱ्या प्राचार्यांसह दोन प्राध्यापकाची चौकशी लावण्यात आली. दरम्यान प्राचार्य आर हावरे, प्राध्यापक प्रदीप दंदे, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक व्ही. कापसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.दुसरीकडे प्राध्यापकांच्या निलंबनाविरोधात विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातच आंदोलन सुरू करण्यात आलं. आम्ही शपथ स्वतःहून घेतली होती, देण्यात आली नव्हती असं विध्यार्थ्यांचं म्हणणं आहे. शिक्षकांनी शपथ आमच्यावर लादली नसल्याचं विध्यार्थ्यांचं म्हणणं आहे. निलंबनाची कारवाई विरोधात विद्यार्थांनी कॉलेजचं मुख्य द्वाराला कुलूप लावले. प्राध्यापकांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी तासिकेवरही बहीष्कार घातला.

अशा प्रकारची शपथ देणं अयोग्य असल्यामुळे शिक्षकांवरील कारवाई योग्य असल्याचं संस्थेच्या अध्यक्षांनी म्हटलं. "प्रेम विवाह न करण्याची शपथ शिक्षक देऊ शकत नाही. शपथ प्रकरणामुळे संस्थेची मोठी बदनामी झाली. संस्थेला पूर्वसूचना न देता प्राध्यापकांनी दिलेली शपथ योग्य नाही. या संपूर्ण प्रकरणावर आम्ही तीन प्राध्यापकांविरोधात चौकशी लावली. दरम्यान संस्थेमार्फत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अजून आमची चौंकशी सुरू आहे. प्राध्यापकांनी माफीनामा जाहीर केला होता. प्रेम विवाह न करण्याची शपथ देण्याचं समर्थन होऊ शकत नाही त्यामुळं निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. संस्थेची पारदर्शक चौकशी सुरू आहे" असं विदर्भ युथ वेल्फेयर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे म्हणाले.

याआधी काय घडलं होतं?

चांदुर-रेल्वे येथील महिला महाविद्यालय रासेयो पथकाच्या टेंभुर्णी येथील निवासी विशेष शिबिरात (7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी) शिबिरार्थी विद्यार्थिनींना 'प्रेम व प्रेमविवाह न करण्याची' शपथ एका सत्रात देण्यात आली होती. त्यावर मीडिया व सोशल मीडियातून काही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

त्या प्रतिक्रिया लक्षात घेता शिबिरात दिलेली शपथ ही उन्मादी प्रेमाच्या विरोधात होती. तसे प्रास्ताविक आम्ही केले होते असं कॉलेजने म्हटलं आहे.

"मुलींच्या अल्लडपणाचा फायदा घेऊन काही तरुण मुले त्यांना प्रेमाच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढतात आणि नंतर मुलींना त्रास देतात. त्यातून बऱ्याच विपरीत घटना घडतात. त्याचे परिणाम आपल्यासह आपल्या पालकांना सहन करावे लागतात. आपली नाहक बदनामी होते. म्हणून अशा घटनांना वेळीच लगाम लावणे आवश्यक असते. त्यासाठी मुलींनी आधी आपले शिक्षण व आपले करियर घडविण्यासाठी सतत लक्ष दिले पाहिजे, या भावनेने आम्ही ती शपथ विद्यार्थ्यिनींना दिली होती", असं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

"ज्या विद्यार्थिनींसमोर आम्ही ही शपथ दिली त्या बहुतांश मुली 'टीन-एजर' वयोगटातील आहेत. त्या वयोगटातील मुलींना प्रेमाची फारशी समज नसते. त्या अल्लड असतात. परंतु प्रेमाच्या नावावर काही आपमतलबी तरुणांकडून त्यांची फसगत होते. म्हणून अशा बाबीं मुलींनी आपल्या पालकांसोबत शेअर कराव्यात. पालक त्यांच्या मुलींच्या भविष्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात. वैचारिक अपरिपक्वतेतून चुकीचा निर्णय घेण्याऐवजी पालकांवर विश्वास ठेवणे नेहमीच हितकारक असते. आपली समज पक्व झाल्यावर आपण स्वतंत्रपणे कुठलाही निर्णय घेतल्यास हरकत नाही, या जाणिवेने ही शपथ देण्यात आली होती. तरीही, त्यामागील हेतू बाजूला पडून वेगळाच आशय लोकांपर्यंत त्यातून पोहचत असेल तर आम्ही पुन्हा एकदा याबाबत मनःपूर्वक माफी मागतो", असं महिला कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे आणि राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.प्रदीप दंदे यांनी म्हटलं आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील विदर्भ युथ वेलफेयर सोसायटीद्वारा संचालित महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना चक्क प्रेमात न पडण्याची शपथ देण्यात आली.

या शपथेतील मजकूर पुढीलप्रमाणे -

"मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पीढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसंच मुलीसाठी हुंडा देणार नाही. समर्थ भारतासाठी, स्वस्थ समाजासाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते."

शाळेतील शपथेत शिक्षकांनी सामाजिक कर्तव्य म्हणून विद्यार्थिनींमध्ये हुंडा देणाऱ्या मुलाशी लग्न करू नका किंवा भावी पीढीला हुंडा न घेण्याबाबत जागृत करा, अशा पद्धतीचं आवाहन केलं असलं तरी याच शपथेत चक्क प्रेम व प्रेमविवाह करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.

'प्रेमाला विरोध नाही, योग्य व्यक्ती निवडावा'

प्रेम करण्याला आपला विरोध नाही. प्रेम वाईट आहे, असंही आपण म्हणत नाही. पण कुमारवयात मुलींना प्रेम आणि आकर्षण यांच्यात फरक कळत नाही. त्यामुळे आपल्यासाठी योग्य व्यक्ती कोण याची त्यांना जाणीव नसते, त्यामुळे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ही शपथ दिल्याचं स्पष्टीकरण महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रदीप दंदे यांनी दिलं.

ते सांगतात, "ही शपथ प्रौढांसाठी नाही. महाविद्यालयातील कुमारवयीन मुलींसाठी ही शपथ होती. दिल्लीतील निर्भया प्रकरण, हैदराबाद प्रकरण, धामणगावला झालेली तरुण मुलीची हत्या, नुकतीच हिंगणघाट येथील जळीतकांड मधील मुलीच्या अंत्यविधीची बातमी वर्तमानपत्रात असताना, त्याच वर्तमानपत्रात तिवसा तालुक्यात 10 दिवसात 10 मुली पळून गेल्याची बातमी होती."

ते पुढे सांगतात, "आधुनिकता म्हणत आपण कोणता समाज निर्माण करीत आहोत? यावर उपाय काय? म्हणून, आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात 'युवकांपुढील आव्हान' या विषयावर उद्बोधन करताना सभोवताल मन सुन्न करणाऱ्या घटना घडत असताना मुलींना माहीत नाहीत का? की त्या पेपर वाचत नाहीत, त्या अशा घटनांपासून अनभिज्ञ आहेत याचं नेमकं कारण काय, आपल्या आईबापावर तुमचा विश्वास नाही का? ते लग्न तुमचे करून देणार नाहीत? असं तर नाही ना? असेल तर मग त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न का करता? असे प्रश्न मुलींना केले."

"अरेंज आणि लव मॅरेज या दोघातही काही दोष आहेत. घरच्यांनी जमवलेले लग्नही कधी-कधी तुटतात. त्यामुळे मुलींनी जागरूक होण्याची गरज आहे. हुंडा हा सामाजिक कलंक आहे, म्हणून हुंडा घेणाऱ्याशी लग्न करणार नाही. एवढंच नाही, तर सध्याच्या स्थितीत माझे लग्न सामाजिक रीतिरिवाज नुसार हुंडा घेऊन झाले तर, भावी पीढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकड़ून हुंडा घेणार नाही आणि मुलीसाठी हुंडा देणार नाही, अशी शपथ दिली."

शपथ देण्यापेक्षा सक्षम बनवावं

मुलींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यापेक्षाही त्यांना सक्षम बनवणं ही आजच्या काळातील गरज असल्याचं मत पत्रकार मुक्ता चैतन्य या नोंदवतात.

मुक्ता सांगतात, "केवळ शपथ देणं हा या समस्येवरचा उपाय नाही. शपथ देणं म्हणजे फक्त वरून मलमपट्टी करण्यासारखं आहे. उलट शपथेमुळे पुढे चांगल्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेल्या मुलीची मानसिक ओढाताण होण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यामुळे या समस्येच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे."

त्या पुढे सांगतात, "मुलींच्या लैंगिकतेचा विचार आपल्या समाजात केला जात नाही. मुलींशी लैंगिकतेबाबत बोलणंही अनेकवेळा टाळलं जातं. त्यापेक्षा मुलींना विश्वासात घेऊन त्यांना योग्य लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे. मुलीला सक्षम बनवल्यास, त्यांना स्वतःच्या लैंगिक जाणिवा, नातेसंबंध, स्वतःच्या भावना योग्य प्रकारे कळतील. त्या भावना कशा हाताळाव्यात हे त्यांना समजेल. आपल्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे, याचं ज्ञान त्यांना स्वतःला येईल, अशा प्रकारे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. याबाबत त्यांच्याशी बोललं पाहिजे."

तर शपथ देणं म्हणजे शब्दांच्या लाह्या भाजण्यासारखा प्रकार असल्याचं मत प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब चासकर नोंदवतात.

त्यांच्या मते, "महाविद्यालयांचं कार्य उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचं आहे. पण कधीकधी ते मॉरल पोलिसिंग करू लागतात. शिक्षण संस्थांनी शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या समस्या सोडवायला हव्यात. तसंच विद्यार्थ्यांना शपथ देण्याऐवजी त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी समुदेशनाचा मार्गसुद्धा उपयोगी ठरू शकतो. पण मुलांशी निकोप चर्चा केली जात नाही. ते आजही टाळलं जातं. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे."

हुंडा संस्कृतीला शरण जाऊ नका

सामाजिक परिस्थितीमुळे आता हुंडा दिलं तरी पुढच्या पीढीसाठी हुंडा न देण्याची शपथ देण्यात आली आहे. या विधानाबाबतही आपला दृष्टीकोन मुक्ता चैतन्य यांनी स्पष्ट केला.

त्या म्हणतात, "सामाजिक परिस्थितीमुळे आज हुंडा देऊन लग्न होण्याची शक्यता या शपथेत व्यक्त करण्यात आली आहे. पण याचा अर्थ मुलींना सामाजिक परिस्थितीसमोर शरणागती पत्करणं शिकवण्यासारखं आहे. त्यापेक्षा सध्याच्या मुलींना कोणत्याही परिस्थितीत हुंडा देणं आणि घेणं चुकीचंच असल्याचं सांगायला हवं. जे योग्य आहे, त्याच्या बाजूने उभं राहायला सध्याच्या मुलींना शिकवलं पाहिजे."

समाजाचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. सध्याच्या काळात सामाजिक प्रबोधन होण्याची गरज असल्याची गरज असल्याचं त्यांना वाटतं.

"हिंगणघाटसारख्या घटना समाजात वाढत आहे. हे धोकादायक असून सामाजिक प्रबोधन होणं गरजेचं आहे. केवळ शपथ देऊन उपयोग होणार नाही. तर समाजाचा दृष्टिकोन बदलावा लागेल. स्त्रीकडे एक वस्तू म्हणून न पाहता, एक माणूस म्हणून पाहिलं, तर अशा घटना टाळता येतील. फक्त मुलींना प्रेमविवाह न करण्याच्या शपथा देण्याऐवजी मुलांनाही योग्य-अयोग्य गोष्टींचं शिक्षण द्यायला हवं. मुलांना समाजात जबाबदारीने वागण्याचं शिक्षण देण्याचीही समाजात गरज आहे," असं त्या सांगतात.

तर चासकर यांनाही पुरुषसत्ताक समाज हे या सगळ्या प्रकरणाला कारणीभूत असल्याचं वाटतं.

"समाजात मुलींवर बंधनं घालण्यात येतात. पण तरूणवयात आलेल्या मुलांच्या मनात काय चाललं आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न कुणी करत नाहीत. यात बदल होण्याची आवश्यकता आहे," असं चासकर सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)