You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिंगणघाटच्या नांदोरीमध्ये 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं होतं?
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदोरी चौकात पेट्रोल टाकून तरुणीला जाळल्याची घटना 3 फेब्रुवारीला घडली. या घटनेतील पीडिता 40 टक्के भाजली होती, त्यानंतर तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण सोमवारी पहाटे या पीडितेची प्राणज्योत मालवली.
नेमकं प्रकरण काय?
3 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी एका महिलेचा 'वाचवा… वाचवा' असा आवाज आल्याने कुणाचा तरी वाहनाने अपघात झाला असावा याचा अंदाज घेत परिसरातून जाणारे विजय कुकडे यांनी आपली दुचाकी थांबवली.
दुचाकी वळवून मागे गेल्यावर कुकडे यांना एक महिला भर रस्त्यात जळतांना दिसली. क्षणाचाही विलंब न लावता कुकडे यांनी पिडितेच्या अंगावर पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
पण ज्वाळा कमी होत नसल्याने एका शाळकरी मुलीने आपले स्वेटर काढून पिडितेला वाचविण्याचा प्रयत्न केला.
पिडितेच्या शरीरावरील ज्वाळा पूर्णपणे विझल्यावर तिला कार मधून हिंगणघाटच्या सरकारी हॉस्पिटलला नेण्यात आले आणि उपचार सुरू झाले.
"ती वेदनेनं विव्हळत होती. तिचा श्वासोच्छवास संथ झाला होता आणि श्वास घेतानाही तिला त्रास होत होता. आगीच्या ज्वाळांमुळे तिचे डोकं, मान आणि चेहरा जळून गेला होता. अशाच अवस्थेत एका लहान शाळकरी मुलीच्या स्वेटरच्या मदतीनं तिच्या शरीरावरील आग विझवून तिला हॉस्पिटलला नेण्यात आले. ही घटना आयुष्यात कधीही विसरता येणार नाही," विजय कुकडे सांगत होते.
"मी माझ्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलो होतो. परत येत असताना नंदोरी चौकात एक मुलगा उभा होता, त्याच्या हाती पेटता टेंभा होता. हिवाळा असल्यामुळे शेकोटी पेटविण्यासाठी कचरा पेटवण्यासाठी ह्या व्यक्तीने टेंभा हातात घेतला असावा असा अंदाज मी व्यक्त केला. पण मागे गेल्यावर याच टेंभ्याने एका महिलेला पेटविण्यात आल्याच कळले," कुकडे त्या दिवसाबद्दल सांगतात.
प्रवाशांची तत्परता
आरोपीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्यानं अचानक घडलेल्या या घटनेनं पीडिता प्राध्यापिका किंचाळली, ती पेटत्या कपड्यांसह खाली बसली. तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून दहावी अकरावीत जाणारी एक मुलगी धावत तिथे आली.
काही लोक पाणी टाकून पीडितेला वाचविण्याचा प्रयत्न करत असतांना या मुलीने आपले स्वेटर काढून पिडितेच्या अंगावर टाकले आणि आग विझली.
परिसरातील युवक सुशील घोडे यानेही धावून मदत केली. विजय कुकडे यांनी पीडितेला एका कारने हॉस्पिटल मध्ये दाखल केलं.
घटनाक्रम
- सकाळी 7 वाजून 5 मिनिटाने प्राध्यापिका एसटी बसमधून नंदोरी चौकात उतरली.
- सकाळी 7 वाजून 7 मिनिटं - प्राध्यापिका महाविद्यालयाकडे हळूहळू पायी जाण्यास निघाली. त्याच वेळी एसटीच्या मागून दुचाकीने आलेला आरोपी विकेश नंदोरी चौकाजवळ थांबला.
- सकाळी 7 वाजून 10 मिनिटं - गाडीतून पेट्रोल काढून. पेट्रोलने टेंभा भिजवला, नंतर तो प्राध्यापिकेच्या मागे पायीपायी गेला.
- सकाळी 7 वाजून 15 मिनिटे - प्राध्यापिका चालत चालत न्यू महालक्ष्मी किराणा धान्य भांडारापर्यंत पोहोचली. तेव्हा आरोपी विकेश नगराळे याने वेगाने चालत जात प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकले.
- सकाळी 7 वाजून 17 मिनिटे - पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोलने भिजवलेला पेटता टेंभा फेकून तो दुचाकीकडे पळाला.
- सकाळी 7 वाजून 20 मिनिटे- हल्ल्या करण्याआधीच त्याने दुचाकी सुरू ठेवलेली होती. त्यावरून तो पळाला.
- हल्ल्यानंतर एकच गोंधळ उडाला त्यात आरोपी विकेशला पकडण्याचा प्रयत्न एका व्यक्तीनं केला पण तो हाती आला नाही.
- सकाळी 7 वाजून 20 मिनिटे - पीडितेला कारने शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
गृहमंत्र्यांनी घेतली होती पीडितेची भेट
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागच्या मंगळवारी रात्री रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतली होती. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून पीडितेच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
"महिलांविरोधात हिंसक कृत्य करणा-या गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर लवकरात लवकर कायदा करणार आहोत," असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं होतं.
सैतानालाही लाजवेल असा हल्ला - डॉक्टर
"गेली 35 वर्षं मी आकस्मिक अपघात विभागात डॉक्टर म्हणून काम करतोय. पण हैवानालाही लाजवेल अशा पद्धतीनं एका प्राध्यापक महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेमुळे मी व्यथित झालोय," अशी प्रतिक्रिया हिंगणघाट मधील पीडितेवर उपचार करणाऱ्या नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे डॉक्टर अनुप मरार यांनी दिली होती.
"पीडितेच्या शरीरावर थेट पेट्रोल टाकून जाळल्यामुळे तिचा चेहरा, गळा, घसा, कानं, केस तसेच दातही जळून गेले. 35 वर्षांच्या मेडिकल करिअरमध्ये, एक डॉक्टर म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही माझ्या उभ्या आयुष्यात असा हल्ला मी पाहिला नव्हता. हा हल्ला सैतानालाही लाजवणारा होता," असं डॉक्टर मरार पुढे सांगतात.
आज सकाळी अखेर या पीडितेने शेवटचा श्वास घेतला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)