दर्शना पवार: एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या 7 घटना

MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणी पोलिसांनी दर्शनाचा मित्र राहुल हांडोरे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.

26 वर्षीय दर्शना पवार हिचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याजवळ 18 जून 2023 रोजी सापडला होता. दुर्दैवाने महाराष्ट्रात अशा घटनांची यापूर्वी मालिकाच घडलेली आहे. त्यातील काही प्रकरणात कौर्याची परिसीमा गाठली गेली होती, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

1. रिंकू पाटील हत्याकांड

30 मार्च 1990ला उल्हासनगरमध्ये रिंकू पाटीलला 10 वीच्या परीक्षा केंद्रातच पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं.

30 मार्च 1990 या दिवशी दहावीची परीक्षा सुरू असतानाच परीक्षा केंद्रात आगडोंब उसळला. हातात तलवार, पिस्तूल आणि पेट्रोलचा कॅन घेऊन 4 जण परीक्षा केंद्रात घुसले, त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवरही हल्ला केला.

त्यानंतर एका वर्गात शिरून त्यांनी दरवाजा आतून बंद केला आणि रिंकू पाटील या 16 वर्षांच्या मुलीला इतरांपासून वेगळं करून तिच्यावर पेट्रोल ओतलं.

रिंकू जिवंतपणी जळत होती, जागेवरच तिचा कोळसा झाला, अशा बातम्या त्यावेळी माध्यमांमध्ये आल्या होत्या.

रिंकूच्या शेजारी राहणाऱ्या 22 वर्षांच्या हरेश पटेलनं हे कृत्य घडवून आणलं होतं. त्याचं रिंकूवर एकतर्फी प्रेम होतं. रिंकूनं लग्नास नकार दिला म्हणून त्यानं असा सूड उगवला होता.

या घटनेनंतर हरेशनं रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली होती.

2. विद्या प्रभूदेसाई हत्याकांड

2000 साली मुंबई सेंट्रल येथे विद्या प्रभुदेसाई या तरुणीची अमानुष हत्या करण्यात आली. भरदिवसा तिला रस्त्यात जाळण्यात आलं.

23 जून 2000ला ही घटना घडली होती.

विद्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करायच्या. त्या त्यांचे कपडे रसिक सोलंकी या टेलरकडून शिवून घेत असत. रसिकचं विद्यावर एकतर्फी प्रेम जडलं होतं. तो विद्याला लग्नासाठी गळ घालत होता. पण तिनं लग्नाला नकार दिला.

23 जून 2000 या दिवशी विद्या ऑफिसला जाण्यासाठी बसची वाट पाहत उभी होती. त्याचवेळी रसिकनं तिच्या अंगावर केरोसीन टाकून तिला जिवंत जाळलं. याप्रकरणी न्यायालयानं रसिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

3. मोनिका किरणापुरे हत्याकांड

नागपूरमध्ये 2011 साली मोनिका किरणापुरे या विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली.

नंदनवनमधील श्रीमती राजश्री मुळक महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे ही 11 मार्च 2011 रोजी सकाळी वसतिगृहातून महाविद्यालयात पायी जात होती. तितक्यात मोटारसायकलवर आलेल्या मारेकऱ्यांनी तिच्या पाठीत खंजीर खुपसला, तिच्या शरीरावर चाकूचे वार करण्यात आले. शस्त्राच्या अनेक घावांनी तिच्या शरीराची अक्षरश: चाळण केली.

काटोलजवळील सावरगावच्या एका तरुण शिक्षकाचं एका विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम होतं. मात्र तिने त्याला दाद न दिल्यानं तो शिक्षक संतापला होता. म्हणून मग शिक्षकानं त्या विद्यार्थिनीस ठार मारण्याचं ठरवलं, त्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दोन जणांना दिली. या दोघांना वसतिगृहात नेऊन त्यानं ती विद्यार्थिनी दाखवली.

पण शिक्षकाची प्रेयसी समजून आरोपींनी मोनिकाला ठार मारलं. याप्रकरणी न्यायालयानं हत्येचा सूत्रधार कुणाल अनिल जैस्वाल, त्याचा मित्र प्रदीप महादेव सहारे आणि मोनिकावर प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या श्रीकांत सोनेकर आणि उमेश मराठे या 4 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

4. प्राची झाडे हत्याकांड

ऑगस्ट 2018मध्ये ठाण्यात भरदिवसा प्राची झाडे या तरुणीवर सपासप वार करण्यात आले. प्राची ही कोपरी कॉलनीतील किशोर नगर परिसरात राहत होती. ठाण्यातील बेडेकर कॉलेजमध्ये बीकॉमच्या दुसऱ्या वर्षाला शिकणारी प्राची नोकरी करत होती.

सकाळी अकराच्या सुमारास बाईकवरून ती ऑफिसला निघाली होती. पूर्व द्रुतगती मार्गावरून जात असताना ठाण्यातील नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानजीक आकाश पवार (22, रा. भिवंडी) याने तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यानंतर तो तिथून पळून गेला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्राचीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे तिचा मृत्यू झाला.

आकाश आणि प्राची हे दोघे एकमेकांना ओळखत होते. एकतर्फी प्रेमातून आकाशनं तिची हत्या केली होती.

5. अमृता देशपांडे हत्याकांड

सांगलीच्या अमृता देशपांडे हिची हत्यादेखील एकतर्फी प्रेमातून झाली. 2 सप्टेंबर 1998 रोजी अमृता देशपांडे हिच्यावर आरोपी बबन रजपूत याने धारदार चाकूने सपासप वार केले.

सांगलीच्या शास्त्री चौकात संध्याकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी बबन रजपूत हा अमृता देशपांडे हिच्या घरासमोरच राहत होता. एकतर्फी प्रेमातून 26 वर्षांचा बबन अमृताला लग्नासाठी धमकवत होता. त्यावेळी गणेशोत्सव सुरू होता.

अमृता घरातून क्लाससाठी सायकलवरून निघाली होती तेव्हा अवघ्या काही अंतरावर शास्त्री चौकातील गणपती मंडपाच्या मागच्या बाजूला बबनने अमृतावर चाकूने वार केले. या हल्ल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिचा मृत्यू झाला.

Rarest of rare असलेली ही केस सरकारी वकील उज्वल निकम यांनी लढवली होती. यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. बबन रजपूत शिक्षा भोगून बाहेर पडला आहे सध्या तो कोल्ड ड्रिंकच्या दुकानात काम करतो. त्यानं तुरुंगातूनच पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

6. हिंगणघाट जळीतकांड

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदोरी चौकात पेट्रोल टाकून तरुणीला जाळल्याची घटना 3 फेब्रुवारी 2022 रोजी घडली. या घटनेतील पीडिता 40 टक्के भाजली होती, त्यानंतर तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते.

'ती' 25 वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. आपल्या पाठलागावर कोणी आहे, याची तिला जाणीवही नव्हती.

'ती' हिंगणघाटातील नंदेरी चौकात पोहोचली, तेव्हा मागावर असणाऱ्या तरुणानं तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि तिला पेटवून दिलं. त्यानंतर जराही न थांबता हा आरोपी तिथून फरार झाला.

हिंगणघाट चौकात उतरल्यानंतर ही तरुणी काही अंतरावर असलेल्या महाविद्यालयात पायी जात असे. ही घटना घडल्यानंतर आजुबाजूच्या लोकांनी धाव घेतली. आरडाओरडा ऐकून आजुबाजूच्या लोकांनी तातडीने पीडित तरुणीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होतो. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. 10 फेब्रुवारी 2020 रोजी या पीडितेने शेवटचा श्वास घेतला.

या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या घटनेविरोधात अनेक मोर्चे निघाले. राजकीय नेत्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हिंगणघाट तसेच वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरमध्येही नागरिकांनी बंद पुकारत या घटनेचा निषेध करण्यात आला होता.

7. MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरण

MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणी पोलिसांनी दर्शनाचा मित्र राहुल हांडोरे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.

26 वर्षीय दर्शना पवार हिचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याजवळ 18 जून 2023 रोजी सापडला होता.

दर्शना पवार मूळची अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी होती. दर्शनानं MPSC परीक्षेत यश मिळवलं होतं. परिक्षेत पास झाल्यानंतर ती सत्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात आली होती. पण 10 जूनपासून तिचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला.

अखेर, तिचा राजगड किल्ल्यावर खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. यानंतर फरार असलेला तिचा मित्र राहुल हांडोरे याला चार दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे.

दर्शना पवार यांचे वडील दत्ता पवार यांनी पोलीस जबाबात दिलेल्या माहितीनुसार, दर्शना 9 जूनला पुण्यात एका खासगी कोचिंग क्लासच्या सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या कुटुंबीयांच्या संपर्कात होत्या. 10 जूननंतर त्यांचा कुटूंबीयांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे 12 जूनला त्यांचे कुटुंबीय पुण्यात आले आणि कोचिंग क्लासमध्ये जाऊन चौकशी केली.

कोचिंग क्लासमधून कुटुंबीयांना असं कळलं की, दर्शना त्यांच्या एका मित्रासोबत सिंहगड आणि राजगड फिरायला गेल्या होत्या.

यानंतर कुटुंबीयांनी सिंहगड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या सगळ्या घडामोडींनंतर 18 जून रोजी दर्शनाचा मृतदेह सापडला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)