You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अहमदनगरमध्ये 'ऑनर किलिंग' : माहेरपणासाठी बोलावलं आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
रुक्मिणी रणसिंग ही 19 वर्षांची मुलगी. सहा महिन्यांपूर्वीच तिनं प्रेमविवाह केला होता. घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं आणि तोच राग मनात धरून तिच्या वडिलांनी तसंच काका आणि मामानं तिला आणि तिच्या नवऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. घरच्यांच्या रागाची किंमत रुक्मिणीला आपला जीव गमावून मोजावी लागली.
अहमदनगरमधल्या पारनेर तालुक्यातील निघोज गावात घडलेल्या या घटनेमुळं 'ऑनर किलिंग'चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सहा महिन्यांपूर्वी रुक्मिणी आणि मंगेश रणसिंग यांचं लग्न झालं होतं. या लग्नाला रुक्मिणीच्या वडिलांचा आणि नातेवाईकांचा विरोध होता. मंगेशच्या कुटुंबियांनी मात्र या नात्याचा स्वीकार केला होता.
लग्नाला रुक्मिणीकडून केवळ तिची आईच आली होती, असं तिचा दीर महेश रणसिंगनं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
लग्नानंतरही विरोध कायम
महेशनं सांगितलं, "लग्न झाल्यानंतरही रुक्मिणीच्या नातेवाईकांचा विरोध कायम होता. ते रस्त्यात अडवून रुक्मिणी आणि मंगेशला धमकी द्यायचे. त्यांच्या धमक्यांना कंटाळून फेब्रुवारी महिन्यात रुक्मिणी तसंच मंगेशनं पारनेर पोलिस ठाण्यात तक्रारही केली होती."
अशा ताण-तणावातच 30 एप्रिलला रुक्मिणीच्या आई-वडिलांनी तिला घरी बोलावून घेतलं. माहेरी आल्यानंतर त्यांनी तिला मारहाण केली. रुक्मिणीनं मध्यरात्री मंगेशला फोन करून 'मला इथून घेऊन जा. मला घरातल्या लोकांनी मारलंय,' असं सांगितलं.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 मे रोजी मंगेश रुक्मिणीच्या घरी गेला. रुक्मिणीचे काका आणि तिचे मामाही उत्तर प्रदेशवरून त्यांच्या घरी आले होते. यावेळी मंगेश आणि रुक्मिणीच्या लग्नावरून भांडणं आणि वादावादी झाली.
रुक्मिणीच्या काका आणि मामांनी तिला तसंच मंगेशला मारहाण केली. नंतर बांधून ठेवलं आणि त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं आणि कुलूप लावून घराबाहेर जाऊन थांबले.
मदतीसाठी आवाज येऊ लागल्यानं शेजारी घरी आले. त्यांनी अँब्युलन्स बोलावली आणि या दोघांनाही पुण्याला नेलं. उपचारासाठी रुक्मिणी आणि मंगेशला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं महेश रणसिंगनं सांगितलं.
तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 5 मे रोजी रुक्मिणीचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा रुक्मिणीची प्रकृती गंभीर होती. ती 60 ते 65 टक्के भाजली होती.
मंगेशवर उपचार सुरू आहेत. मात्र त्याची प्रकृतीही अत्यवस्थ आहे. तो 40 ते 45 टक्के भाजला आहे, असं ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर अजय तावरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
"आम्ही दोन-तीन घरं सोडून बाजूलाच राहतो. दुपारच्या वेळेस घरातून आरडाओरडा ऐकू आला म्हणून धावत गेलो. घरातून धूर येत होता आणि दरवाजाही बंद होता. आम्ही दरवाजा तोडला आणि अॅम्ब्युलन्स बोलावली," असं रुक्मिणीच्या शेजारी राहणाऱ्या संजय बळीद यांनी सांगितलं.
या कुटुंबाबद्दल फारशी माहिती नसल्याचंही संजय बळीद यांनी सांगितलं. ते उत्तर प्रदेशमधून आलेत आणि गेल्या आठ महिन्यांपासून इथं राहताहेत, एवढीच माहिती आजूबाजूच्यांना असल्याचं संजय यांनी म्हटलं. शेजारी राहतोय म्हटल्यावर मदत करायलाच हवी म्हणून आम्ही आवाज ऐकून धावत गेल्याचं संजयनं सांगितलं.
काका आणि मामाला अटक, वडील मात्र फरार
या प्रकरणी पारनेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे मामा घनश्याम, काका सुरेंद्र बाबूलाल भारती उर्फ बिल्लू पंडित यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस मुलीचे वडील रामा रामफल भारतीय यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी पेट्रोलची बाटली आणि अन्य साहित्य जप्त केलं असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती अहमदनगर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी दिली आहे.
दोघांनी केलेल्या अंतरजातिय विवाहाच्या मुद्द्यावरून वादावादी झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना पेटवून दिल्याचं मनीष कलवानीया यांनाी सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगा लोहार जातीचा आहे तर मुलगी 'पासी' समाजाची आहे, जी उत्तर प्रदेशातील अनुसूचित जातींपैकी एक आहे.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच आपल्या कुटुंबावर ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप रुक्मिणीचा दीर महेश रणसिंगने केला आहे.
"रुक्मिणीचे कुटुंबीय धमकावत असल्याची तक्रार आम्ही निघोज आणि पारनेर पोलीस ठाण्यात केली होती. एकदा फेब्रुवारी महिन्यात रुक्मिणीच्या घरच्यांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांबद्दल पोलिसांना सांगितलं होतं. ही घटना घडण्याच्या काही दिवस आधीही पोलिसांत धमक्यांबद्दल तक्रार दिली होती," असं महेश रणसिंगनं म्हटलं.
आपला भाऊ आणि वहिनीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच महेशची अपेक्षा आहे.
मीडियात याबाबतचं वृत्त आल्यानंतर महाराष्ट्रृ राज्य महिला आयोगानं याची दखल घेतली आहे. या प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली आहे याचा अहवाल पाठवण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)