You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई : छोटं घर, मोठं कुटुंब आणि सुखाच्या क्षणांसाठी मुंबईकरांची घुसमट
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"सगळं आहे...अगदी आयतं जेवणही मिळतं. पण, खरं सांगायचं तर नवरा-बायकोला जी प्रायव्हसी लागते ना तीच नाहीये. भांडण्यासाठीसुद्धा आम्हाला सर्वजण झोपण्याची वाट पाहावी लागते. मी स्त्री असल्यामुळे मला बोलताना बंधनं येतात. मला प्रायव्हसी हवी असं बोलता येत नाही," 33 वर्षांच्या मृणाली बारगुडेंचे हे शब्द मुंबईतल्या लाखो महिलांची स्थिती उलगडून सांगतात.
मुंबई एक असं शहर जिथं तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतात. पण जागेची कमतरता हे दुखणं अगदी पहिल्या ते शेवटच्या अशा सर्व माणसांच्या नशिबी आहे.
"मुंबईतल्या कुठल्याही कोपऱ्यात फ्लॅट घेण्यासाठी किमान एक कोटी रुपये खर्च येतो, मग तो बोरिवलीला घ्या, चेंबूरला घ्या किंवा मुलुंडला घ्या. चाळीतल्या घरासाठीसुद्धा 60 ते 90 लाख मोजावे लागतात. झोपडपट्टीतसुद्धा घर घेण्यासाठी 20 ते 50 लाख लागतात," रिअल इस्टेट पत्रकार वरुण सिंग यांनी माहिती दिली. ते स्वेअर फिट इंडिया नावाची वेबसाईट चालवतात.
याच महागड्या मुंबईतला एक भाग आहे सातरस्ता. भायखळा स्टेशनपासून अगदी जवळच. जुन्या चाळी आणि इमारतींच्या या भागात सर्व प्रकारचे लोक राहतात. इथून जवळच मुंबईतलं प्रसिद्ध ऑर्थर रोड जेल आहे. पुढेच धोबी घाट आणि दगडीचाळ आहे.याच दाटीवाटीच्या भागात आता टोलेजंग टॉवर उभे राहत आहेत. एखाद्या जुनाट चाळवजा इमारतीच्या शेजारी टोलेजंग इमारतीचं काम सुरू आहे, असं सध्याचं या भागातलं चित्र आहे.
मोठमोठ्या होर्डिंगची रोषणाई, रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक जॅम, फेरिवाल्यांचा आवाज, लोकांची वर्दळ आणि त्यातच ध्वनी प्रदूषण. या सगळ्या गजबजाटातून मी गुगल मॅपचा आधार घेत शिवदर्शन बिल्डिंग शोधून काढली. ही तशी नवी बिल्डिंग म्हणजे बीबीडी चाळींच्या तुलनेत नवीन. पण परिस्थिती बीडीडी चाळींपेक्षा काही वेगळी नाही. या पाच मजली बिल्डिंगमध्ये 160 स्वेअरफुटांची 126 घरं आहेत.
मी तिथं पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. व्हरांड्यातून आत गेलो.(व्हरांडा कसला ती तर जेमतेम पाच ते सहा फुटांची चिंचोळी गल्ली होती.) व्हरांड्यात दुतर्फा लोकांचे दरवाजे, कुणाची सायकल मध्येच पार्क केलेली. चिंपाटं (टमरेल), कचऱ्याचे डब्बे, चपलांचा रॅक असं बरंच छोटंमोठं सामान ठेवलेलं. त्यातूनच वाट काढत बिल्डिंगच्या कार्यालयात गेलो. 50 स्वेअर फुटांच्या त्या कार्यलयात बिल्डिंगचे सचिव विलास रेडीज यांनी आमचं स्वागत केलं.
मग आम्ही तिथंली काही घरं पाहिली. 160 स्वेअर फुटांच्या त्या जागेत बाथरूम, किचनचा ओटा, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, सोफा, टेबल, आरसा आणि इतर गरजेच्या सर्व असं बरंच सामान वेगवेगळ्या घरात मला दिसलं. जेमतेम पाच ते सहा पावलांमध्ये संपतील एवढीच ती घरं होती. काही घरांनी पोटमाळे काढले होते. पण मुळात घरांची उंची कमी असल्यानं त्या माळ्यांचा उपयोग फक्त सामान ठेवण्यासाठीच होतो. काही घरांमध्ये पडद्याचा वापर पार्टीशनसाठी करण्यात आला होता.
या एवढ्याशा घरात लोक नेमकं कसं आयुष्य जगत असतील, कसं अॅडजस्ट करत असतील, मुलं अभ्यास कसा करत असतील, महिला कपडे कुठे बदलत असतील, सामान्य आयुष्यातली 'स्पेस' सोडा पुरेशी झोप तरी मिळत असेल का आणि हो, सर्वात महत्त्वाचं नात्यांमधल्या स्पेसचं किंवा प्रायव्हसिचं काय, असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात पडले. बिल्डिंगचे सचिव विलास रेडीज यांना मी अनेक प्रश्न विचारून हैराण केलं. त्यांनीही मग सांगायला सुरुवात केली.
घरात जागा पुरत नाही म्हणून काही मंडळी रात्री त्याच 5 ते 6 फुटांच्या व्हरांड्यात उभ्या सरळ रेषेत भिंतीला टेकून झोपतात. म्हणजे जास्त लोक झोपले तर झोपलेल्या प्रत्येक माणसाच्या डोक्याला कुणाचे तरी पाय आणि त्याच्या पायाला कुणाचं तरी डोकं लागलंच समजा आणि जास्तच हालचाल केली तर हाताला इतरांचे कचऱ्याचे डबे, चिंपाट(टमरेल), सायकल किंवा इतर गोष्टी लागण्याची शक्यता.
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना वेळ मिळावा म्हणून कित्येकदा मग आई-वडील किंवा घरातली इतर मंडळी अशी व्हराड्यांत झोपतात.
"घरातली वयस्क मंडळी जोडप्यांना समजून घेतात. त्यांना त्यांच्या परीनं वेळ देण्याचा प्रयत्न करतात. कित्येकदा मग काही वयस्क मंडळी तासन्तास बाजारात, मंदिरात किंवा इतर ठिकाणी जातात," रेडीज सांगत होते.
कारण एखादं नवं घर भाड्यानं घ्यायचं म्हटलं तर किमान 20 हजार भाड्यापोटी द्यावे लागतात. हे परवडणारं नसतं मग अशावेळी लोक आहे त्याच घरात अॅडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात.
"नवीन लग्न झालेल्या माझ्या मुलाला प्रायव्हसी मिळावी म्हणून मी याच 160 स्वेअर फुटांच्या घरात 50 फुटांची वेगळी खोली काढली होती, पण पुरेशा जागेअभावी त्यानं काही वर्षांनी दुसरीकडे छोटसं घर भाड्यानं घेतलं," रेडीज यांनी त्यांच्या घरातली स्थिती सांगितली.
रेडीज हे सगळं सांगत असताना माझ्या डोक्यात अचानक रुपेश नावाच्या माझ्या एका मित्रांचं एक वाक्य आठवलं."एका चादरीच्या आत जे काही करता येईल तेवढंच माझं लैंगिक आयुष्य आहे," असं रुपेश मला एकदा बोलला होता. मुंबईतल्या अत्यंत गजबजलेल्या आणि दाटीवाटीनं लोकवस्ती असलेल्या वरळीच्या बीबीडी चाळींमध्ये तोही एकत्र कुटुंबातच राहातो.
तेव्हा मस्करीमध्ये घेतलेलं त्याचं हे वाक्य किती गंभीर आहे याची कल्पना मला आता येत होती. रेडीज यांच्याशी गप्पा करता करता आम्ही त्यांच्या घरी गेलो. रेडीज काकींनी बनवलेला चहा आणि भजी खाताना माझी ओळख त्यांची मुलगी मृणाली यांच्याशी झाली.
एका प्रायव्हेट कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या 33 वर्षांच्या मृणाली मग आमच्या चर्चेत सहभागी झाल्या.
"इथंतरी सगळं ठीक आहे, कमी जागा आहे. पण प्रत्येक घरात चार ते पाचच माणसं आहेत. एका घरात एकच जोडपं आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये तर एकेका घरात दोन-तीन भाऊ आणि त्यांच्या बायका एकत्र राहतात," मृणाली सांगत होत्या.
"माझ्या घरातही वेगळी परिस्थिती नाही. सव्वादोनशे स्वेअर फुटांच्या घरात आम्ही 9 जणं राहतो. मला आई कायम सांगायची, की एकुलत्या एक असलेल्या मुलाशीच लग्न कर," असं बोलता बोलता मृणाली बोलून गेल्या.
शिवदर्शन बिल्डिंगमध्येच लोकांचं जगणं किती कठीण आहे हे कळत असताना मृणाली सांगत असलेली स्थिती त्याहून कठीण असल्याचं माझ्या लक्षात आलं.
मला तुमची बिल्डिंग पाहाता येईल का, तुमच्या घरी येता येईल का, असं मी लागलीच त्यांना विचारलं. त्यांनीही तात्काळ त्याला होकार दिला.
घरात मी पाहुणा आलेला असल्यानं मृणाली यांना शेजारच्या घरात जाऊन कपडे बदलावे लागले. मग मी मुंबईच्या ताडदेव परिसरात असलेल्या त्यांच्या बिल्डिंगकडे माझा मोर्चा वळवला.
ताडदेव परिसरातल्या आलिशान आणि उच्चभ्रू इंपिरिअल टॉवरच्या शेजारीच एक नवीन बिल्डिंग उभी आहे. तिचं नावसुद्धा शिवदर्शन आहे. याच बिल्डिंगमध्ये मृणाली बारगुडे याचं कुटुंब राहातं. सव्वादोनशे स्वेअर फुटाच्या या घरात 9 माणसं राहतात. मृणाली आणि त्यांचे पती मनीष, त्यांचे मोठे दीर-जाऊ, सासू-सासरे, मावस सासू आणि 2 लहान मुलं असा त्यांचा परिवार आहे.
"शिवदर्शन ही एसआरए बिल्डिंग आहे. झोपड्या हटवून तिथं बिल्डिंग बांधण्यात आली आहे. मिळालेल्या एफएसआयमधून बिल्डर मोठा टॉवर बांधतो आणि एसआरएमध्ये मोफत घरं देतो. त्यामुळे मग ती घरं छोटी दिली जातात. आता काही ठिकाणी 260 स्वेअर फुटांची घरं दिली जात आहेत," वरुण सिंग यांनी मला ही माहिती दिली.
एसआरएवाली शिवदर्शन ही कुठल्याही नव्यानं बांधण्यात आलेल्या बिल्डिंगसारखीच आहे. प्रशस्त प्रवेशद्वार मोठा व्हरांडा, लिफ्ट, वॉचवन, इस्त्रीवाला यासारख्या सर्व महत्त्वाच्या सोयीसुविधा तिथं आहेत.
लिफ्टमधून आम्ही पाचव्या माळ्यावरच्या मृणाली यांच्या घरी गेलो. व्हरांडा मोठा होता, पण त्यात लोकांनी सायकल, चपलांची कपाटं आणि इतर साहित्य ठेवलं होतं. बीडीडी चाळ, आधीची बिल्डिंग आणि इथला व्हरांडा काही वेगळा नव्हता. घरात गेल्यावर महिलांची पाणी भरण्यासाठीची लगभग दिसून आली.
लोकांना वावरण्यासाठीची एक खोली, चिंचोळं स्वयंपाकघर आणि त्यालाच लागून संडास आणि बाथरूमची व्यवस्था. मृणाली यांच्या माहेरच्या घरापेक्षा हे घर कणभर मोठं. पण राहाणाऱ्यांची संख्या मात्र दुप्पट.
टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, एसी अशा सर्व गरजेच्या वस्तू घरात आहेत. एवढ्याशा जागेत त्यांनी एक फिशटँक सुद्धा ठेवला आहे. त्याच्या शेजारीच एक सिंगल बेडपेक्षा थोडासा मोठा बेड आणि एक छोटासा शोकेस. त्यातच टीव्ही आणि इतर गोष्टी ठेवलेल्या. त्या शोकेसमध्येच वेगवेगळे कप्पे. अत्यंत छोट्या बाथरूममध्ये 2 पिंप, बादल्या, टब अशा वस्तूंमध्ये पाणी भरून ठेवलेलं.
मृणाली यांना टीव्हीवर लागणारी 'घाडगे आणि सून' ही मालिका पाहायला फार आवडतं. आपल्या कुटुंबाला त्या या मालिकेशी कंपेअर करून पाहातात.
" या सिरिअलमध्ये आणि आमच्या कुटुंबात सर्वकाही एकसारखंच आहे. त्यांचं सुद्धा एकत्र कुटुंब आहे, त्यांच्याही घरातली सर्व माणसं एकमेकांशी प्रेमाने वागतात. एकमेकांना समजून घेतात. फक्त फरक एवढाच आहे, की त्यांचा बंगला आहे आणि आमचं सव्वादोनशे स्वेअर फुटाचं घर आहे," मृणाली सांगतात.
मग तुम्हाला प्रायव्हसी कशी मिळते असा प्रश्न मी त्यांना विचारलं.
"लग्नाला ८ वर्ष झाली, अॅडजस्टमेंट केली. सर्व आहे, पण प्रायव्हसी नाही. काही बोलायचं झालं तर आम्हाला बाहेर जावं लागतं. कधीकधी दोघंही ऑफिसातून येताना बोलतो. कधीकधी सर्व झोपल्यानंतर बोलतो. तेव्हाच भांडतो. पण कुणाला त्याची खबर मिळत नाही की आम्ही भांडतोय. सर्वांच्या झोपेचा अंदाज घेऊनच आम्ही बोलतो किंवा भांडतो. आयुष्यातले छोटेछोटे क्षणसुद्धा आम्ही इथंच शोधतो."
"टीव्ही एकच आहे, प्रत्येकाची आवड वेगळी आहे. म्हणून मग मी मोबाईलवर अॅपवर सिरीअल्स पाहाते. एकत्र कुटुंबात आपण कधीकधी मन मारत असतो. घरात आजारी पडलं तरी बसून राहावं लागतं, झोपून राहात येत नाही, जागाचं नाही ना. चांगला अनुभव आहे हा, प्रत्येकानं एकदातरी अनुभवावा," मृणाली सांगतात.
"आजूबाजूला सर्वांची स्थिती तीच आहे. सर्वांची एकत्र कुटुंब आहेत, तीनतीन भाऊ एकत्र राहतात. चिडचिड होते तेव्हा बिल्डिंगमधल्या इतर बायकांशी बोलणं होतं. बायकांच्या चर्चेचा विषयसुद्धा तोच असतो. पण चार भिंती घेणं सोपं नाही ना. मी स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून पाहाते, त्यामुळे मला नवऱ्यावर दबाव आणायचा नाही."
आपल्याला मिळाली नाही, पण आपल्या मुलीला तरी स्पेस मिळावी, असं मृणाली यांना वाटतं. " माझ्या मुलीचे कपडे 5 वर्षांची होईपर्यंत बास्केटमध्येच आम्ही ठेवत होतो, नवऱ्याच्या बिझनेसच्या वस्तूंचा कप्पा खाली झाला तेव्हा मग तिथं तिचे कपडे ठेवायला लागलो." आपल्यामुळे आपल्या मुलीला पण स्पेस मिळत नाही याची खंत मृणाली यांना वाटते.
झाली ना एक मुलगी आपल्याला आता कशाला पाहिजे प्रायव्हसी, असंही लोक कधीकधी बोलतात. मृणालीचे पती मनीष यांचा इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंचा छोटासा व्यवसाय आहे. पण स्वतःची स्पेस शोधताना फार स्ट्रगल कारवं लागतं हे ते मान्य करतात.
"खूप स्ट्रगल करावा लागतो. त्याचा विचार आपण प्रेमात असताना कधीच करत नाही. पण प्रेमात असताना त्या गोष्टी कळत नसतात. माझी दुसरं घर घेण्याची तयारी आहे, पण उडी पोहोचत नाहीये. प्रायव्हसीच्या बाबतीत नक्कीच प्रॉब्लेम फेस करावे लागतात," मनीष सांगतात.
"बायको सिरीअलमधल्या गोष्टींशी तुलना करून बोलते. तशा अपेक्षा कधीकधी केल्या जातात. बघ तो कसा बायकोला मनवतोय, असं वगैरे ती बोलते. मग आम्ही अशावेळी फिरायला जाणं, शॉपिंग करणं, बाहेर जेवायला जाणं या गोष्टींतून आनंद शोधतो. त्यातून तिला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतो," मनीष त्यांच्या परीनं त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात.
स्वतःची अशी स्पेस शोधण्यासाठी मी रविवारी क्रिकेटही खेळतो. तेवढाच काय तो वेळ मिळतो, मनिष त्यांच्या भावना व्यक्त करतात.
का आहेत मुंबईत छोटी घरं?
"मुंबईत पूर्वीपासूनच छोट्या घरांची संकल्पना आहे. सुरुवातीपासून 100 ते 150 स्वेअर फुटांची घरं बांधली जात आहेत. जागेची कमतरता हे त्याचं मुख्य कारण आहे. आता तर घरांच्या क्षेत्रफळात आणखी घट होताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी तर मुंबईत घरांच्या आकारात 25 टक्क्यांची घट झाली आहे," वरूण सिंग सांगतात.
बिल्डरही छोटीछोटी घरं का बांधतात, असं विचारल्यावर वरूण सांगतात. "मुंबईत जागेची कमी आहे, त्यात जर घराचा आकार वाढला तर किंमत वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मग बिल्डरसुद्धा किंमत अटोक्यात आणण्यासाठी छोटी घरं बांधतात."
मुंबईत एकूण 18,21,000 घरांचं क्षेत्रफळ पाचशे चौरस फुटांच्या आत आहे.
कशी शोधली जाते प्रायव्हसी?
मुंबईत जुहू चौपाटी, बँडस्टँड, नरिमन पॉइंट ही काही स्थळं आहेत जिथे जोडपी प्रायव्हसी शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रेयसी आणि प्रियकर यांच्या भेटीसाठी ही ठिकाणी प्रसिद्ध आहेत. पण लग्न झालेली जोडपीसुद्धा तिथं एकमेकांना भेटतात.
शिल्पा फडके एक सोशलॉजिस्ट आहेत. त्या मुंबईच्या प्रसिद्ध टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये शिकवतात. त्यांनी Why Loiter? Women and Risk on Mumbai Streets हे पुस्तक लिहिलं आहे. या संदर्भात त्या त्यांचं निरीक्षण नोंदवतात.
त्या सांगतात, "बरेचदा एकमेकांना भेटण्यासाठी प्रियकर किंवा प्रेयसी दूरचा भाग निवडतात. तसंच काही लग्न झालेली जोडपी प्रायव्हसी शोधण्यासाठी दूरच्या भागांमध्ये भेटतात. मुंबईत बँड स्टँड, जुहू चौपाटी किंवा इतर ठिकाणी बसलेल्या जोडप्यांमध्ये काही जोडपी ही लग्न झालेली देखील असतात."
मुंबई शहर 603 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेलं आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार मुंबईत 11,35,514 झोपड्या आहेत. त्यात 52,06,473 लोक राहतात. हे प्रमाण मुंबईच्या लोकसंख्येच्या 41.84 टक्के आहे.
संशय घेण्याचं वाढतं प्रमाण
मुंबईत छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या पुरुषांमध्ये त्यांच्या पत्नीवर संशय घेण्याचं प्रामण बऱ्यापैकी असल्याचं मुमताज शेख सांगतात. मुमताज शेख सामाजिक कार्यकर्त्या आहेत. महिलांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकल्पांवर त्या काम करतात. त्या चालवत असलेल्या सावित्री समस्या नोंद आणि निवारण केंद्रात बलात्कार पीडित आणि घरगुती अत्याचार प्रतिबंधासाठी काम केलं जातं.
त्या सांगतात, " गेल्या काही वर्षांपासून आम्ही घरगुती हिंसाचाराची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अनेक महिलांनी सांगितलं, की नवरा संशय घेतो. छोटी घरं असल्यामुळे अनेक वेळा मुलं किंवा घरातल्या इतर मंडळी आजूबाजूला असताना संबंध ठेवायला महिला नकार देतात. मग नवऱ्याला वाटतं, की महिलेचे कुठेतरी विवाहबाह्य संबंध आहेत आणि त्यातून मग घरगुती अत्याचार होतात."
अभ्यासातून असंही लक्षात आलं आहे, की छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या महिलांचं ब्युटी पार्लरला जाण्याचं प्रमाण सुद्धा जास्त असल्याचं मुमताज सांगतात. "नवरा दुसरीकडे जाऊ नये म्हणून मग महिला पार्लरला जाणं, वेगवेगळी प्रॉडक्ट वापरणं असे पर्याय शोधतात."
मुमताज यांच्या संस्थेनं 'सखी-सहेली' आणि 'यारी दोस्ती' असे दोन सर्व्हे 2004 च्या दरम्यान केले होते. त्यातल्या पाहणीनुसार छोट्या घरात राहणाऱ्या काही महिला मशेरी किंवा गुलच्या (एक प्रकारची नशा) आहारी जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामागे आपल्याला 'भान' राहू नये असा महिलांचा उद्देश असल्याचं मुमजात सांगतात.
जोडप्यांमध्ये संवाद वाढवण्यासाठी वेगवेगळे सण, समारंभ, वेगवेगळे डे साजरे करणं असे उपक्रम आखत असल्याचं मुमताज सांगतात.
मानसिक आरोग्यावर किती परिणाम?
मग लोक त्यांच्यासाठी स्पेस कशी शोधतात, असा सवाल मी मानसोपचार तज्ज्ञ आणि सेक्सॉलॉजिस्ट सागर मुंदडा यांना विचारला.
"खूप छोटी जागा असल्यामुळे लोकांवर फार बंधनं येतात, बरेचदा लोकांना भीतीसुद्धा वाटते. मग अशावेळी कामभावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी पुरूष कधीकधी पॉर्न पाहातात. पॉर्न पाहाण्यासाठी फार जागा किंवा फार प्रायव्हसी लागत नाही. एका क्लिकवर आपली फॅन्टसी पूर्ण होत असल्यानं अनेक पुरुषांचा प्रत्यक्षातल्या लैंगिक संबंधाकडील कल कमी होत आहे," असं डॉ. सागर मुंदडा सांगतात.
काही वेळेला मुलंबाळं होण्यासाठी मग काही कपल्स फर्टाईल पिरिएडच्या काळात हॉटेलमध्ये जातात, तेवढीच काय ती त्यांना प्रायव्हसी मिळते, असं निरीक्षण डॉ. सागर नोंदवतात. त्यांचाकडे येणारे बरेच रुग्ण हे महिलेनं पुढाकार घेतल्यामुळे समुपदेशनासाठी आलेले असतात.
"बरेचदा पुरुष त्यांचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात, त्यातून मग ते कधीकधी व्यसनांच्या आहारीसुद्धा जातात. परिणामी कुटुंबाप्रती वेळ देता येत नसल्यामुळे पुरुषांमध्ये गिल्ट येण्याचं प्रमाणही वाढतं आणि त्यातून तणाव वाढण्याचे प्रकार घडतात. याचा मानसिक आरोग्यावर नक्कीच मोठा परिणाम होतो," असं डॉ. सागर सागंतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)