शरद पवार माढामधून निवडणूक लढवणार, पक्षाच्या बैठकीत निर्णय

शरद पवार

फोटो स्रोत, RAVEENDRAN

शरद पवार माढामधून निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी शरद पवारांनी माढामधून लढावं अशी मागणी केली होती. त्यामुळे पक्षानं त्यांना तशी विनंती केली आहे. याची अधिकृत घोषणा मात्र अजून करण्यात आलेली नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली आहे.

राज ठाकरे यांच्या पक्षाला बरोबर घेता येईल का, त्यांच्याबरोबर विचार जुळले तर काय करायचं, याबाबतसुद्धा पक्षाच्या नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

समविचारी पक्षानां एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे अधिकृतपणे कुठलाही उमेदवार घोषित करता येऊ शकत नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ

2008 मध्ये जेव्हा देशातल्या लोकसभा मतदारसंघांची नव्यानं आखणी करण्यात आली तेव्हा माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली.

सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातला भाग त्यामध्य येतो. सोलापुरातील करमाळा, माढा, सांगोला, आणि मारशिळस हे विधानसभा मतदारसंघ त्यात येतात. तर सातारा जिल्ह्यातले फलटण आणि माण मतदारसंघ त्यात येतात.

2009मध्ये माढ्यात पहिली लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी शरद पवार तिथून 3 लाख 14 हजार मतांच्या फरकानं निवडून आले होते. त्यांना एकूण 5 लाख 30 हजार 596 मतं पडली तर त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मतं मिळाली होती.

शरद पवार

फोटो स्रोत, Twitter/SharadPawar

दुसऱ्या म्हणजे 2014 च्या निवडणुकीत इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले आहेत. मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचा हा गड वाचवण्यात यश आलं होतं.

शरद पवारांसाठी माढा का महत्त्वाचा?

"शरद पवार जे बोलतात ते करत नाही आणि नाही बोलत ते करतात अशी त्यांची ख्याती आहे. माढामधून शरद पवार उभे राहिले काय किंवा त्यांच्या मर्जीतला कुणीही कार्यकर्ता उभा राहिला काय? जर तिथल्या निष्टावंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकदा ठरवलं की या उमेदवाराचा विजय घडवून आणायचा तर तो होणारचं. पण शरद पवार जर स्वतः निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना थोडा का होईना पण आपल्या मतदारसंघासाठी वेळ बाजूला काढावाच लागेल," असं ज्येष्ठ पत्रकार राजा माने सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)