शरद पवार यंदाची लोकसभा निवडणूक खरंच लढले तर...

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकांआधी त्यांनी आता फक्त राज्यसभेच्या माध्यमातून संसदीय राजकारण करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

"मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. मात्र माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही, पण याबाबत विचार करून सांगू," असं शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवारांची ही नवी खेळी असल्याचं बोललं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला पवारांच्या नेहमीच्याच स्टाइलचा हा 'स्ट्रोक' असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाहीत ते मात्र करतातच, अशी त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात ख्याती आहे.

शरद पवारांच्या या वक्तव्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न राजकीय विश्लेषक करत आहेत. काहींना हे वक्तव्य महत्त्वाचं वाटत आहे तर काही विश्लेषकांना ते अजिबात महत्त्वाचं वाटत नाही.

...तर पवारांचा पराभव

शरद पवार हे निवडणूक लढवणार म्हटल्यावर त्यांच्या विधानाची दखल त्यांच्या विरोधकांनीही घेतली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, "शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये. माढा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यास, भाजप त्यांचा पराभव करेल."

"शरद पवार छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांचा विचार करतात. एक लोकसभा म्हणजे जवळजवळ 600 गावं मतदारसंघात येतात. एवढ्या मोठ्या परिसरात त्यांनी या वयात फिरणं अवघड आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा न लढवलेलीच बरी. पण त्यांनी लोकसभा लढवलीच तर त्यांचा भाजप पराभव करेल," असंही पाटील यांनी म्हटलं आहे. म्हणजे त्यांच्या या विधानाला नक्कीच राजकीय संदर्भ आहेत.

त्यावर "मी आभारी आहे त्यांना माझ्या प्रकृतीची चिंता वाटते, पण विनंती एकच आहे या निवडणुकीत काय होणार आहे त्याची आणि तुमच्या पक्षाची चिंता करा, माझ्या पक्षाची चिंता मी करतो, असं प्रत्युत्तर सांगोल्यात प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं आहे.

पवारांच्या 'त्या' विधानाचा राजकीय अर्थ काय?

पवारांच्या या विधानाचा राजकीय अर्थ काय असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार सुनील गाताडे सांगतात,

"शरद पवार हे गेल्या 50 वर्षांपासून 'इलेक्टोरॉल पॉलिटिक्स' किंवा निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी ठरलेले नेते आहेत. जर नेता स्वतः रिंगणात उतरणार असेल तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारतो. त्यामुळे ते स्वतः निवडणूक लढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक लढवणं आणि जिंकून येणं हे आमच्यासाठी खूप साधं आहे असा संदेश देखील त्यांना विरोधकांना त्यांना द्यायचा असेल. यातून ही महत्त्वपूर्ण निवडणूक आहे आणि आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरत आहोत असंच पवारांना सांगायचं आहे."

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. नेहमीचा फॉर्म्युला 26-22 असा होता. शरद पवारांच्या निवडणूक लढण्यामुळे आघाडीला काय फायदा होऊ शकतो असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात,

"शरद पवार यांनी निवडणूक लढण्याचे संकेत त्यामुळेच दिले आहेत. राष्ट्रवादीचा आकडा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रबळ उमेदवार उभे करणं महत्त्वाचं आहे. जर शरद पवार हे स्वतः उभे राहिले तर निवडणूक ही गंभीर होईल त्याचा फायदा बाजूच्या मतदारसंघांना देखील होईल आणि आघाडीचे जास्त उमेदवार निवडून येतील."

जर त्रिशंकू परिस्थिती आली तर?

"शरद पवारांच्या निवडणूक लढण्याच्या निर्णयामुळे महाआघाडी मजबूत होईल. पक्षाचे प्रमुख हे बहुतेकवेळा जनतेमधून निवडून येणारे नेते असतात. UPAचं सरकार गेल्यानंतर शरद पवार हे स्वस्थ बसले नाहीत तर ते राज्यभर फिरत राहिले. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात ते गेले राजकारणात त्यांनी लक्ष दिलं. त्यांच्या सातत्यामुळे लोकांच्या अद्यापही ते थेट संपर्कात आहेत. याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो," केसरी सांगतात.

शरद पवार

फोटो स्रोत, Twitter/SharadPawar

"पवारांनी जर निवडणूक लढवली तर ते सहज जिंकून येऊ शकतील. जरी चंद्रकांत पाटील म्हणाले असले की पवार पडतील पण पवारांना हरवणं तितकं सोपं नाही हे देखील तितकं खरं आहे. पवार निवडून आले तर आघाडीच्या जागा वाढतील. आणि स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर प्रत्येक खासदाराला किंमत असते," असं ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे सांगतात.

"जर कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि हंग पार्लमेंट किंवा त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर शरद पवारांचं नाव पंतप्रधान म्हणून पुढं येऊ शकतं असं म्हटलं जातं. अर्थात जर पंतप्रधान व्हायचं असेल तर राज्यसभेतला खासदार देखील चालतो. पण जर ते स्वतः लोकसभेतून निवडून आलेले खासदार असतील तर त्यांना एक वजन प्राप्त होईल म्हणून ते निवडणूक लढवू शकतात," परांजपे सांगतात.

'सांगितलं ते करत नाहीत आणि नाही सांगितलं तर...'

"शरद पवार जे बोलतात ते करत नाही आणि नाही बोलत ते करतात अशी त्यांची ख्याती आहे. माढामधून शरद पवार उभे राहिले काय किंवा त्यांच्या मर्जीतला कुणीही कार्यकर्ता उभा राहिला काय? जर तिथल्या निष्टावंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकदा ठरवलं की या उमेदवाराचा विजय घडवून आणायचा तर तो होणारचं. पण शरद पवार जर स्वतः निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना थोडा का होईना पण आपल्या मतदारसंघासाठी वेळ बाजूला काढावाच लागेल," असं ज्येष्ठ पत्रकार राजा माने सांगतात.

"एक गोष्ट म्हणजे अद्याप पूर्ण जागांच्या वाटपाबद्दल चर्चा झालेली नाही इतर ठिकाणी कोणते उमेदवार उभे राहतील हे निश्चित नाही. जर अटीतटीची वेळ असती आणि तेव्हा शरद पवारांनी हे विधान केलं असतं तर ते गांभीर्यानं घ्यावं लागलं असतं, पण आता तरी ते तितकं गांभीर्यानं घ्यायची गरज आहे, असं निदान मला तरी वाटत नाही. ते फक्त विचार करतो म्हणाले आहेत लढतो असं म्हणाले नाहीत ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल," माने सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)